Monday, 19 October 2015

सासुलीचा योगी श्री सावत्या!!!

लाह्या व्हाया, लाह्या व्हाया!!!असा काहीसा आवाज बस मध्ये ऐकायला आला की आम्हास समजायचे बेलापूर आलेले आहे आणि पाच एक मिनिटात ऑफिस मध्ये पोहोचणार,  किंवा अचानक रेड्याचा आवाज ऐकायला यायला लागला की आम्हास समजायचे आता पांडवकडा आलाय . आणि मग आम्ही आमची झोप आवरायला लागायचो.असले उद्योग कोण करणार .सावत्याच.आमचे बस मधले घड्याळच म्हणा.फक्त यांत्रिक घड्याळ आणि हे मानवी घड्याळ ह्यातला फरक की ह्याचा आवाज ऐकला की आमच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर नकळत उमटायची.

सावत्याची आणि माझी ओळख गेल्या २-२.५ वर्षातीलच आणि तशी  ही अनावधानानेच झालेली ....माझ्यावर lead  पणाची नवीन वस्त्र चढवण्यात आली होती आणि त्या प्रोजेक्ट ची सुरवात होती. सिविल मधला एक designer चांडेल म्हणून, त्याचे माझ्याविषयी फार चांगले मत होते (वास्तविक सिविल आणि माझे department  एकमेकांना पाण्यात बघतात). पण तो त्याच्या department  मध्ये नवीन होता आणि तिथे त्याला फारशी कोणाची मदत मिळायची नाही बहुदा. तर त्याच सुमारास हा सावत्या ही रुजू झाला आणि त्या चांडेलने सावत्याशी माझी ओळख करून दिली. सुरवातीला मी त्याच्या कडे दुर्लक्ष करायचो  कारण तो चांडेल मला 'सर' म्हणायचा आणि माझ्या टीम मधले बाकीचे ही आणि हा सावत्या मात्र चक्क अरे तुरे. नाही म्हटलं तरी जो काही खरा खोटा , फुकाचा अहंकार होता तो त्या मुळे डिवचला गेला होता. त्याला गावावरून येउन बहुदा फार महिने उलटले नव्हते. गावचा अघळ पघळ  पणा  आहे तो त्याच्या वागण्याबोलण्यात असायचा आणि मग आपोआप अशा लोकांना आपण परीट घडीचे लोक सहसा जवळ उभं करीत नाही, त्यातलाच तो प्रकार.त्याला फार जाणवू दिलं नाही पण त्यातलेच. त्यात पुन्हा तो बस मध्ये पाठी येउन बसायला लागला आणि माझ्या आधीच्या stop वर चढायचा आणि माझी नेहमीची जागा बळकावायचा. मग खिडकी साठी लोकांच्या मिनतवाऱ्या मला काढाव्या लागायच्या.  आता तो अजूनच डोक्यात गेला होता. पण एकदा संध्याकाळी बस मधून येताना work pressure विषयी आमची चर्चा सत्र घडत होती आणि खूप शॉट लागला होता डोक्याला! तेव्हा मध्ये पडून सावत्याने फारच करमणूक केली आणि वातावरण निवळल. मग  जरा जाणीव झाली की सावत्या हे रसायन काही वेगळं आहे. मग त्या रसायनाचे पृथक्करण करून गुणधर्म जाणून घ्यावेसे वाटू लागले. माझं पृथक्करण सांगत एकदम पारदर्शक माणूस.आत एक बाहेर एक असं असणं शक्यच नाही आणि सदानकदा हसरा  चेहरा. त्याच्या बरोबर असताना dull  वाटणारच नाही. आणि म्हणून कदाचित माणसांचा त्याच्या भोवती गराडा आढळून येईल. एक उत्तम कलाकार, उत्तम वक्ता. पूर्ण गुणधर्म मांडायचे तर कदाचित ग्रंथ लिहावा लागेल पण आवर्जून सांगायचे म्हणजे उपमा देण्याच्या बाबतीत तर त्याचा हात कोणी ही धरू शकत नाही. कोटीच्या बाबतीत तो थोडा कमी आहे ..पण राहिला असता थोडे दिवस माझ्याबरोबर तर ते हि शिकला असता ;). त्याची बडबड ऐकली म्हणजे माणूस उदास राहूच शकत नाही. अचानक आपल्यात ही उर्जा येते .उर्जेचा स्त्रोतच जणू !!!!


हयाच्याकडे सांगण्यासारखे किस्से बरेच असायचे. त्यातून हा कलाकार माणूस , त्यामुळे तो हातवारे करून विलक्षण रीतीने रंगवून सांगायचा (थोडक्यात भूमिकेत शिरला की  आवरणे कठीण जायचे). त्या किस्श्यापैन्की दशावतारी नाटकात घडलेले ;अवंती पुरी नगरीतील राजाचा' आणि 'ठो' हे किस्से तर अजून ही  आठवले तरी हसून दमछाक होते. त्याच्या किस्स्यांमुळे सावत्या एकदम प्रसिद्ध झाला आणि हळू हळू तर अक्खी बस सावत्याचे किस्से ऐकण्यास पाठी गर्दी करू लागली. सावत्याकडचे किस्से हळूहळू संपत आले आणि आमची अजूनची भूक काही मिटत नव्हती मग आम्ही काही न काही (म्हणजे मी, पाटील न गिरीश नामक व्यक्तिमत्व) कारण काढून  किंवा काही विषय काढून सावत्या ला गिऱ्हाईक करू लागलो . ९५-९६% हा  खेळी मेळीने समोर जायचा आणि १ तासाचा कंटाळवाणा आमचा प्रवास  सुखकारक व्हायचा.
रडणं आणि दारुड्याचा अभिनय तर हुकमी.  एकदा असेच आम्ही barbeque  nation  मध्ये जिभेचे चोचले पुरवायला गेलो होतो.  तेव्हा इतर कोणाचा तरी वाढदिवस असावा आणि त्यांनी केक कापल्यावर barbeque  nation  वाल्यांनी  "Happy  Birthday to you " हे गाणं वाजवलं आणि हा भाई अचानक देह भान आणि जागा विसरून नाचायला लागला. लोकांना वाटलं दारूचा अंमल चढला असावा म्हणून विचित्र आणि सहानुभूतीपूर्वक नजरेने लोक त्याच्याकडे आणि कोणत्या ग्रुप बरोबर आलाय म्हणून आमच्याकडे पाहायला लागले आणि आम्हास एकदम मेल्याहून मेल्यासारखे झाले. ते बेअरिंग त्याने शेवट पर्यंत कायम ठेवले आणि ते एवढे हुबेहूब वाटले होते की आम्ही हॉटेलच्या खाली बिल भरून येणार्यांची वाट पाहत होतो आणि एक जोडपे बिल भरून खाली आले आणि त्यातल्या बाप्याला काही विसरल्याने परत वरती जावे लागले आणि तो खाली येईपर्यंत त्या बाईने सावत्याचा अभिनय पाहिला असावा. आम्हाला पास होताना ती बिचारी नवऱ्याला बिलगून आणि सावत्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून पाहत जात होती. माझी हसून हसून वाट लागली आणि जाऊन त्या बाईला सांगावेसे वाटले की अहो त्याने अजिबात घेतली नाहीये फक्त तो अभिनय करतोय. आयुष्यभर हा प्रसंग विसरू शकत नाही.

प्राणीमात्रांविषयी त्याचे प्रेम तर एवढे अफाट आहे की शब्द नाहीत. खास करून त्याच्या गावच्या घराच्या आसपास किंवा त्यांचे पाळीव प्राणी ह्यांच्या विषयी. म्हणजे गाई- म्हशी, रेडे, कुत्रे इत्यादी इत्यादी. ह्यातल्या कुठल्याही प्राण्याला लांबून पाहूनच तो त्यांना काय झालाय किंवा त्यांचा मूड काय आहे वगैरे व्यवस्थित सांगू शकतो. आमच्या ऑफिसच्या जवळच एक टपरी आहे चहाची. तिथे आम्ही कधी चहा प्यायला गेलो की आजूबाजूचे कुत्रे  जमा होतात सावत्याच्या भोवताली (म्हणजे ते भूतदया अंगात भिनवलेले गुज्जू, बिस्कीट घेऊन आले कि जसे जमतात तशातला प्रकार नाही बरं का). प्राण्यांना म्हणे sixth sense  असतो. त्या sixth  sense  मुळेच असेल कदाचित त्यांना त्यांचा स्वामीच आल्यासारखे वाटत असावे ... म्हणूनच आम्हीपण सावत्याला 'दत्तगुरू' म्हणतो. सध्या तो मोरोकको ला गेलाय. त्याला तिथल्या सगळ्याच गोष्टी आवडल्या असणार आणि तिथे तो रुळला ही व्यवस्थित पण तिथली एक गोष्ट त्याला खटकतेय (तो बोलला नाही कोणाला पण मला नक्की माहितेय) की तिथे त्याचे सवंगडी नाहीत.त्यांचा तिथे मुक्त वावर नाही, पण नक्कीच तो पुष्पक मधील कमल हसन प्रमाणे त्यांचे आवाज ऐकत असणार आणि दर्शन घेत असणार.

आम्ही त्याला परोपरीने समजावून सांगतो की त्याचं क्षेत्र चुकलंय .बरेचसे वेगवेगळे option ही सुचवतो पण तो त्याला आमची नेहमीची फालतुगिरी समजतो आणि सोडून देतो. ओमानला आल्यापासून मी मिस करत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सावत्या आणि इतर BAGPACKERS बरोबर केलेली धमाल. बाकीच्या सगळ्यांना प्रत्येक भेटीत भेटणं शक्य झालंय पण सावत्या महाराजांचं काही न काही कारणाने अजून दर्शन झालेलं नाही आणि पुढील भेटीत ही होईल असा वाटत नाही.

सूर्याचे वर्णन काजवा काय करणार. काजव्याचा प्रकाश लिहून लिहून कमी होत चाललाय म्हणून इथेच आटोपते घेतो.


सावत्या महाराजांचा आज प्रकट दिन आहे त्यानिमित्त हा लेख त्यांना समर्पित आणि प्रकट दिनाच्या ह्याच शुभेच्छा की बेलापूर - jacobs प्रमाणे Morocco - Jacobs मध्ये ही सावत्या महाराज प्रसिद्धीस पावतील ..आता त्यांच्यातील मोठे पणास अनुसरून ते म्हणतील  की आता मक्या तू नाही मग मला प्रसिद्धी कोण देणार पण त्यास माझे इतुकेच म्हणणे आहे की 'हिऱ्याची चकाकी काही लपून राहत नाही'