Saturday, 28 November 2015

देऊळ बंद

मस्कत मध्ये पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित (म्हणजे एकमेव शो) होण्याचा मान देऊळ बंद ह्या चित्रपटाला मिळाला. वास्तविक ह्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला जाऊन ह्या उपक्रमास पाठींबा द्यायचं प्रयोजन होतं पण आम्ही काही जाऊ शकलो नाही, पण असो तो काही मुद्दा नाही. देऊळ बंद हा चित्रपट आणि त्या चित्रपटाचा नंतर राहिलेला प्रभाव आणि त्यानंतर केलेली पारायणं ह्या मुळे त्या चित्रपटाविषयीच्या भावना लिहून काढाव्याशा वाटल्या.

मुळात देऊळ बंद ह्या  नावावरून आणि त्याच्या प्रसारासाठी whatsapp  वरून फिरणाऱ्या मेसेजेस मुळे तरी फार कोणी (ज्येष्ट नागरिक आणि श्रद्धावान लोक वगळता) आकर्षित झाले असतील ह्या चित्रपटाकडे असे वाटत नाही. माझा ही साधारण तोच प्रकार.  म्हणजे त्याची प्रिंट आमच्या ऑफिस मधे येउन ही जमाना झाला आणि सरावाने वीकेंड ला पाहण्याच्या उद्देशाने ती मी घरी आणली पण पाहणे काही झाले नाही म्हणजे हा काय चित्रपट पाहायचा असा काहीसा दृष्टीकोन. आणि त्यातून आमचे आई-बाबा  मायदेशात चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहून आले आणि त्यांना फार आवडला.  त्यांना चित्रपट आवडला म्हणजे आपल्यासाठी तर तो नक्कीच नसावा असे माझे गृहीतक (ह्या गृहितका मागे साधारण generation gap कारणीभूत असावी)

पण  एका 'वीकेंड'ला काहीच कार्यक्रम नसल्याने काय करायचे हा प्रश्न होता . म हो नाही करता करता शेवटी देऊळबंद पहायचे ठरले आणि पुढचे ३  तास आम्ही अक्षरशः जागेवरून उठलो नाहीत. ह्याचे कारण सर्वच पात्रांचा अभिनय, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले किंवा सादरीकरण . कथा तर whatsapp  वर फोरवर्ड झाल्या प्रमाणे नासाचा संशोधक (नास्तिक) इस्रोच्या विनंती वरून  दहशतवाद्यांच्या हालचाली (साधारण समुद्री हालचाली) वेळीच टिपून त्यावर वेळीच योग्य ती पावले उचलण्यात मदत हवी ह्या हेतूने त्याने विकसित केलेली frequency  इंस्टाल करण्यासाठी येतो.  त्याची राहण्याची व्यवस्था ज्या संकुलात केलेली असते तिथे स्वामींचे एक देऊळ दाखवलेय आणि तिथे दिवस रात्र त्यांच्या सेवे निमित्त  कार्यक्रम होत असतात ज्याने तो थोडा विचलित झालेला असतो आणि त्यात गुरुपोर्णिमेनिमित्त जे विशेष कार्यक्रम होतात त्याने त्याचा संयम सुटतो आणि तो वरच्या लेवेल ची सूत्र हलवून देऊळ बंद करवतो आणि इथून पुढे चालू होतो आस्तिक आणि नास्तिकाचे द्वंद्व आणि  पुढे काय होणार चा खेळ जो आपल्याला शेवट पर्यंत गुंतवून ठेवतो.

गश्मिर महाजनीने नासा चा संशोधक  अप्रतिम साकारलाय. त्याचे व्यक्तिमत्त्व ही खूप चांगले आहे. मराठीत बऱ्याच दिवसांनी चांगला दिसणारा आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व असणारा आणि चांगला अभिनय करणारा अभिनेता गवसलाय असे म्हणून शकतो. राघव शास्त्री (संशोधक) हे खलनायकी पात्र होऊ शकले असते पण त्याने अजिबात तोल ढासळू दिला नाही. उलट उत्तरार्धात त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. मुळात तो नास्तिक नसून त्याचा स्वामींवर राग असावा असे वाटते आणि त्यांच्या वरील रागातून बाकीच्या देवांचे ही अस्तित्व नाकारतो असे काहीसे असावे.

काही काही गोष्टी चित्रपटात खटकण्यासारख्या आहेत पण त्या दुर्लक्षित करता येण्या सारख्या आहेत. उत्तरार्ध मात्र खूपच उत्कंठावर्धक आहे आणि मोहन जोशींनी स्वामी समर्थ अप्रतिम साकारलेत, म्हणजे आजच्या पिढीशी आजच्या पिढीच्या भाषेत स्वामी समर्थ (पोशाखासाहित) त्यांच्याच भाषेत संवाद साधतात ही कल्पना तर खूप अप्रतिम. तसे बघायला गेले तर एखाद्या विशिष्ट देव-देवतेची महती सांगणारे खूप च चित्रपट येउन गेलेत, येउन जात ही असतात पण त्यांचा दर्जा मात्र तितकासा उत्तम नसतो पण हा चित्रपट मात्र भक्तीपट ह्या पातळीवर राहत नाही आणि एक उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान देतो.


चित्रपट पाहिल्यावर साधारण डोक्यात विचारचक्र  चालू  होते  की दृष्टांत वगैरे  घटना असाव्यात का किंवा  प्रचीती वगैरे अशा गोष्टी शक्य  आहेत  का?  आताच्या काळाला सुसंगत असा विचार केला तर त्याचे उत्तर कदाचित नाही असे असणे शक्य आहे पण हेच जर आपल्या मागच्या पिढीला विचारले तर ते कैक उदाहरणं उभी करतील. माझ्या स्वतःच्या घरात आमचे आई-बाबा ४-५ उदाहरणं बोलता बोलता सांगतील. कारण काही घटना अशक्य कोटीतून घडलेल्या असतात आणि त्याच्या मागे निव्वळ योगायोग असू शकतो पण त्याच्या पाठी काही तर्कसंगती न लावता आल्याने तय योगायोगाला प्रचीती आली वगैरे म्हणणं  शक्य आहे . उदाहरण  द्यायचे झाले तर माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. रात्री २ वाजता ची गोष्ट!!! २ वाजता कुठलेही वाहन मिळण्याची शक्यता दुरापास्त आणि मला कोणाला (शेजारी पाजारी किंवा मित्र) मुद्दाम त्रास देणे सोयीस्कर वाटत नव्हते.  मी खाली काही वाहन मिळते का बघायला उतरलो आणि त्याच वेळेला नेमका बाजूच्या सोसायटीमधे एक कॅब  सोडायला  आली होती आणि तो आम्हाला इस्पितालापर्यंत घेऊन जायला तयार झाला. आता जर तो कॅब वाला नसता आला तर मित्राला वगैरे बोलावणे गरजेचे होते आणि तसे केले गेले ही असते पण योगायोगाने कॅब मिळाली.  आता हे आई - बाबांना विचारल्यास स्वामी पाठीशी होते म्हणून लगेच कॅब मिळाली अशा शब्दात मांडून कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा विचार करता त्यात काही चुकीचे नाही. पण आपण त्याचा अर्थ काय लावावा?  शेवटी बराच विचार केल्यावर मी एक सोप्पे उत्तर शोधले शेवटी श्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ज्याने त्याने आपल्या बुद्धी आणि अनुभवाप्रमाणे त्याचा अर्थ लावावा कारण काही गोष्टीना वैश्विक परिमाण लावता येत नाही हेच खरे!!!!!