Tuesday, 11 September 2018

केनियन सफरनामा - अनपेक्षित दिवस भाग १

मसाई मारातल्या आमच्या (म्हणजे आम्ही दोघं, एक बंगाली कुटुंब आणि १ बांगलादेशी, १ पाकिस्तानी आणि १ श्रीलंकन अशा ३ मुली) जंगल सफारी झाल्या होत्या आणि बऱ्यापैकी मनासारखे प्राणी बघून झाले होते. बऱ्यापैकी म्हणतोय कारण पुन्हा मानवी मन!!!! कितीही काही झाले तरी अजूनची हाव संपत नाही, त्यातून सिंहाने शिकार करताना, चित्ता अगदी जवळून, आयाळ असलेले सिंह, बिबट्या वगैरे वगैरे बाकीच होतं. असो. तर आम्ही मसाई माराच्या जंगलातून सकाळी लेक एलमेंटेटाकडे निघालो. आजचा मुक्काम तिथे असणार होता. लेक एलमेंटेटा हे फ्लेमिंगो पक्ष्यांचं निवासस्थान आहे असे सांगण्यात आले होते आणि ते अंडीही तिथेच घालतात असे सांगितले होते. जाता जाता वाटेत लेक नैवाशाला भेट देऊन, तिथे बोटींग करून तिथले पाणपक्षी आणि हिप्पो बघून  लेक एलमेंटेटाला जेवायला पोहोचायचे होते.

आमची मसाई मारा सफारी बऱ्यापैकी यशस्वी झाली होती (मानाच्या ५ प्राण्यांपैकी ४ दिसले होते म्हणजे यशस्वी म्हणायला हरकत नाही) त्यामुळे आमची गाडी निघाल्या निघाल्या ड्राइव्हर कम गाईडने आधी वचन दिल्याप्रमाणे  jambo bwana हे गाणे आमच्या कडून म्हणवून घेत होता. हे गाणे म्हणजे केनियन  पॉप प्रकारातील स्वाहिली भाषेतील गाणे आहे आणि केनया मध्ये प्रत्येक हॉटेल मध्ये प्रवाशांचे सांगत करण्यासाठी म्हटले जाते. गाण्याचा साधारण अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या केनिया मध्ये आला आहेत तुमचे स्वागत आहे आणि आता कसलीच काळजी करण्याचे कारण नाही (गाणं आणि त्याचे शब्द आणि अर्थ ह्या  लिंक मध्ये https://youtu.be/uQjUlktCDAE). हे गाणे आम्हीही तितक्याच आनंदाने म्हणत होतो कारण आम्हाला कुठे माहित होते की आमचा उर्वरित दिवस काळजी करण्यातच जाईल. एकंदरीतच हसत खेळत आमची सफर सुरु होती.  वातावरण अगदी दिल चाहता है गाण्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे होते,
'जहा रुके हम, जहा भी जाए
जो हम चाहे, वोह हम पाए
मस्ती मे रहे डूबा डूबा हमेशा समा
हमको राहो मे यूही मिलती रहे खुशिया'
Happy We .. Singing Hakuna Matata

मसाई माराहून लेक एलेमेंटेटाला जायला साधारण ५-६ तास लागतात आणि केनिया आपल्यासारखाच मागासलेला (किती वर्ष स्वतःला विकसनशील म्हणवून घ्यायचे विकसनशीलतेची एक ही खूण दिसत नसताना) देश असल्याने रस्ते आपल्यासारखेच आहेत. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न तिथेही बराच भेडसावत असतो. साधारण ३- ३.५ तास प्रवास केल्यावर आम्ही एका पेट्रोल पम्पवर पेट्रोल भरायला थांबलो आणि पुढे अर्धा तास प्रवास झाल्यावर आम्हाला जाणवले की गाडी म्हणावी तशी पळत नाही. म्हणजे जेमतेम २०-३० kmph ह्या स्पीडने जात होती. रस्त्यावरचे हेवी कंटेनर्स अन ट्रक्स ही आमच्या तोंडात मारून पुढे जात होते. ड्रायव्हरला आम्ही विचारलं तसं पण तो हकुना मटाटा (काळजीच कारण नाही) म्हणून वेळ मारून नेण्याचा  प्रयत्न करत होता. आम्ही पिच्छाच सोडला नाही तेव्हा तो म्हणाला की भेसळयुक्त पेट्रोल भरलेय किंवा चुकीचं इंधन भरलेय त्यामुळे कदाचित असं होतंय.  पुढे जे गाव लागेल तिथे मी प्रॉब्लेम सोडवतो. म्हटलं कसं करणार? आहे ते इंधन काढून नवीन भरणार का? त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते कारण पैशाचा प्रश्न होता. ट्रॅव्हल कंपनीने दिलेले पैसे त्याला पूर्ण प्रवासभर म्हणजे आम्हाला नैरोबी विमानतळावर सोडेपर्यंत पुरवायचे होते. त्याला जाणीव करून दिली की चुकीचं इंधन असेल तर इंजिनवर लोड येऊन मोठं ब्रेकडाउन होऊ शकतं. तो जरा विचार करायला लागला आणि गाडी पळत नाही हे जाणवल्यावर तो म्हणाला की पुढे जे शहर लागेल तिथे गॅरेजमध्ये जाऊ. अजूनही लेक नैवाशा काय किंवा लेक एलमेंटेटा काय  कमीतकमी १-१.५ तासावर होते आणि आम्हाला गाडीत बसून जवळजवळ ४-४.५ तास होऊन गेलेले. आमच्या बरोबरची एक गाडी लेक नैवाशाला पोहोचून त्यांनी बोटींग सुरुही केलेले.

एव्हाना आमच्या गाडीतल्या सहप्रवाशांच्या पोटात आगडोंब उठलेला आणि त्यांचा संयम संपलेला. त्यांना चिंता एकाच गोष्टीची की हॉटेलच्या बफेची वेळ संपेल आणि पैसे घालवून जेवावे लागेल. मग सर्वानी चर्चा करून असे ठरवले की आधी लेक एलमेंटेटावर जाऊन उदरभरण करून मग लेक नैवाशाला जाऊ. पण प्रश्न एकच होता की गाडी पोहोचेल का?? कारण गाडी स्पीड पकडायलाच तयार नाही. आमच्या ड्राइव्हरने मग नैवाशा शहरात नेऊन एक टॅक्सी ठरवली आणि आमची गाडी गॅरेज मध्ये टाकली. टॅक्सी आम्हाला लेक एलमेंटेटाला हॉटेल मध्ये नेऊन सोडणार आणि ड्राइव्हर त्या टॅक्सिने परत येऊन दुरुस्त केलेली गाडी घेऊन येणार असा काहीसा जुगाड केला. ठरल्याप्रमाणे आम्ही लेक एलमेंटेटाला हॉटेल वर आलो तिथे आमचे स्वागत ही व्यवस्थित झाले पण ते आम्हाला म्हणत होते की आधी जेऊन घ्या मग चेक इन करा. कदाचित आम्ही उशिरा येणार ह्या हिशोबाने आमच्या रूम्स त्यांनी तयार नव्हत्या ठेवल्या.  पण शेवटी सगळ्या औपचारिकता पूर्ण करून त्यांनी रूमच्या चाव्या ताब्यात दिल्या कारण कोणी डायनिंग हॉल मध्ये जातच नव्हते. आमचा ड्राइव्हर आसू लगेच टॅक्सी वाल्याबरोबर हकुना मटाटा म्हणत गाडी घ्यायला गॅरेज मध्ये गेला. पण खरंच सगळ्या मटाटा संपल्या होत्या का?

लेक एलेमेंटेटा प्रथमदर्शनी छान वाटलं पण फ्लेमिंगो कुठेच दिसत नव्हते. हॉटेलच्या स्टाफ कडे चौकशी केल्यावर तो म्हणाला सकाळी येतील कदाचित. आमच्या रूम मधून खूप सुंदर लेकच दृश्य विहंगम दिसत होतं. निवांत दिवस घालवायला सुंदर जागा आहे. तळ्याकाठी निवांत पहुडत फोटोग्राफी करत छान दिवस घालवू शकलो असतो पण आता आम्हाला पक्षी निरीक्षण करायचे होते लेक नैवाशाला. त्यातून दुसऱ्या गाडीतले प्रवासी जेवताना आले आणि त्यांनी लेक नैवाशा चांगले आहे असा निर्वाळा दिला. त्यांनी असं म्हटल्याबरोबर आम्हाला आता पक्षी निरीक्षण करायचेच होते (आम्ही आणि बंगाली कुटुंब). मुली सुरवातीला नाही म्हणाल्या होत्या पण मध्ये जरा आराम झाल्यावर त्याही यायला तयार झाल्या. तसंही पॅकेज मध्ये आहे ते सगळे वसूल करावं असा एक अट्टाहास असतोच.

क्रमशः

केनियन सफरनामा - एक अनपेक्षित दिवस भाग २

केनियन सफरनामा - अनपेक्षित दिवस भाग २

गाडी अजून ही दुरुस्त झाली नव्हती पण आसू त्याच्या कंपनीचीच दुसरी गाडी घेऊन आला आणि ड्राइवरही. लेक नैवाशा वरून परत येईपर्यंत त्याची गाडी दुरुस्त होईल आणि ते मध्ये वाटेत नैवाशा टाउनमध्ये गाडी आणून देतील आणि आम्ही गाडी बदलू असं काहीसं त्यांचं ठरलेलं (आणि हा सगळं खर्च आसू करणार होता, आमच्या कडून त्याला काही अतिरिक्त कमाई आणि टीप मिळेल ह्या आशेवर). दुपारचे ३.३० वाजले होते आणि आसू अजून जेवला नव्हता आणि त्या हॉटेलला सांगून ही त्यांनी त्याच्यासाठी पार्सल तयार नव्हतं ठेवलं पण तो ठरवल्या प्रमाणे न जेवता आमच्या बरोबर आला.नैरोबी - मम्बासा ह्या शहरांना जोडणारा महामार्ग असल्याने बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं रस्त्याला आणि त्यातच चुकीच्या लेन मधून गाडी पुढे काढण्याच्या प्रयत्नात एका ट्रकचा अपघात झाला. रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी वाढली पण आमच्या सुदैवाने म्हणा आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही, आम्ही १० एक मिनटात तिथून निघून पुढे गेलो. लेक नैवाशा बऱ्यापैकी लांब होते आणि नाही म्हणता म्हणता आम्हाला लेक वर पोहोचायला ५.३० झाले. १ तास बोटींग करून पक्षी निरीक्षण केले आणि बाहेर पडलो. लेक नैवाशा पेलिकन पक्ष्यांसाठी आणि हिप्पो साठी प्रसिद्ध आहे पण वातावरण ढगाळ असल्याने फार मनसोक्त निरीक्षण नाही करता आले. पेलिकन पक्षीही झाडावर येऊन झोपायच्या तयारीत चोच पंखात लपवून बसले होते. पिवळ्या चोचीचा करकोचा, पेलिकन आणि इजिप्शियन बदकं सुरेख रांगेत पोहताना दिसली. आसूच्या प्रयत्नाने एवढे तरी दिसले नाही तर दिवस आराम करण्यात हॉटेलवरच घालवायला लागला असता असं विचार केला आणि परतीच्या वाटेला लागलो.


 वाटेत एका पेट्रोल पंप वर आमची गाडी परत मिळणार होती तिथे आम्ही थांबलो.गाडी अजून काही आली नव्हती. पण आमच्यातल्या काही जणांना मॉल मध्ये जायचे असल्याने आणि वाटेत ट्रॅफिक ही असल्याने आसूने आमच्यासाठी ७ बाईक्स  करून दिल्या आणि आम्हाला मॉल मध्ये जाण्यास सांगितले . गाडी मिळताच तो मॉल मध्ये येऊन आम्हाला भेटणार होता (केनिया मध्ये बाइक्सचा वापर रिक्षांसारखा पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी होतो).
केनियाच्या गल्ल्यांमधून बाईकने जाताना मजा  आली. कधी स्वप्नात ही विचार नव्हता केला केनिया मध्ये बाईक वरून फिरू म्हणून. सगळे एकत्रच होतो आणि अंतर ही फार नव्हते, रस्त्यांवरून जाताना आम्हाला बाईक्स वर बघून स्थानिक लोक आणि लहान मुलांना जरा जास्ती उत्सुकता वाटत होती. मॉल मधली खरेदी वगैरे झाली, आसूही गाडी घेऊन ठरल्या वेळेप्रमाणे आला आणि मुख्य म्हणजे त्याचीच गाडी घेऊन आला. साधारण ८ वाजत आले होते.

प्रस्थान करतानाच जाणवलं की आता रस्त्यावर वाहनांची लांबलचक रांग लागलीय. स्ट्रीट लाईट्सचा आपल्यासारखाच प्रश्न म्हणजे महामार्गावर ही नाहीत. मोठ-मोठे ट्रक्स आणि कंटेनर्स ह्यांच्या मध्ये आमची टुरिस्ट व्हॅन. आसूने अजून कोणता मार्ग आहे का हे ढुंढाळून पाहिले पण पर्यायी मार्ग कच्ची सडक प्रकारचे होते आणि आजूबाजूला मदतीला काही नाही किंवा कोणीच नाही. जंगल म्हणावे तर तसा भाग नव्हता पण अगदीच अंधारी रास्ता आणि निर्मनुष्यही. म्हणजे वन्य प्राण्यांची भीती वगैरे असं काही नव्हतं पण वन्य प्राण्यांपेक्षा भयानक अशा मनुष्य प्राण्याची भीती होती. आसूला स्वतःलाही तो पर्याय फार सुरक्षित वाटला नाही. केनियामध्ये नैरोबी सारख्या शहरातही बंदुकीच्या धाकाने लुटतात असे ऐकून होतो आणि असा प्रवास करणे म्हणजे तर माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखा प्रकार. त्याने असे म्हटल्यावर आम्ही काही सांगण्याचा प्रश्नच मिटला. ती  वाहनांची रांग बघून अजून ३-४ तास तरी बाहेर पडू असे वाटत नव्हते. साधारण १५-२० मिनीटांनी आसूला काय वाटले कुणास ठाऊक पण त्याने गाडीतून बाहेर पडून समोर एक हॉटेल दिसतेय तिथे तुम्ही बसा असे सांगितले. आम्ही आत्तापर्यंत सगळे आसूवर सोडून दिलेले कारण वाहनांची लांबच लांब रांग आणि गाडीत किती वेळ बसणार हे प्रश्नच होते. हॉटेल कसले बार आणि परमिट रूमच होते ते. पण तो आग्रही होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्या मोठ्या कंटेनर्स किंवा ट्रक ड्राइवर ह्यांचा कोणाचाच भरवसा देता येत नव्हता. त्यांना माहित होते की हे पर्यटक आहेत म्हणजे त्यांच्या कडे पैसे आणि किमती ऐवज असणार, कोणी बंदूक काढून लुटले तर कळणार ही नाही. मी तर मदत करूच शकणार नाही आणि कोणी मदतीला येण्याची शक्यता कमीच. आणि त्यातून रस्त्यावर अंधार म्हटल्यावर कोणी काय केलं काय कळणार?  त्याच्या ऐवजी हॉटेल मध्ये म्हणजेच बार मध्ये तुम्ही सुरक्षित असाल असे त्याचे म्हणणे पडले. प्राप्त परिस्तिथीत ते योग्य ही होते. त्याने तिथल्या मॅनेजरला विनंती करून बारच्या वरच्या मजल्यावर बसण्यास नेले. वर एखाद्या टिपिकल बारचे उदासीनतेने भरलेले वातावरण आणि ती उदासीनता अधिकच गहरी करणाऱ्या डिम लाईट्सचा अंधुकसा प्रकाश. आम्ही बसलेलो तिथे नशिबाने फार कोणी गिऱ्हाईक नव्हते. वरून खालच्या ट्रॅफिक कडेही लक्ष ठेवता येत होते.  आसूने मधल्या वेळेत त्याच्या कंपनीला फोन करून सांगितले ट्रॅफिक मध्ये अडकलोय ते आणि हॉटेल मध्ये सांगून ठेवले की उशीर झाला तर आम्ही जेवायला येऊ पण ९.३० झाले तरी रांग काडीमात्र हलली नाही तेव्हा आम्ही तिथेच जेवायचा निर्णय घेतला.
In Bar & Restaurant - Still Smiling


जेवताना आम्ही आसूला प्रश्नांचा मारा करून भंडावून सोडले ज्याची उत्तरं त्याच्या कडेच काय कोणाकडेही असण्याची शक्यता नव्हती. पण त्याचा मेंदू दिवसभराच्या त्रासानेही अजून काम करत होता. त्याच्या डोक्यात आमच्या सुरक्षिततेचिषयीच विचार चालू होते. मला मात्र आम्ही हॉटेलला पोहोचून आमचे सामान घेऊ शकू की नाही की उद्या इथूनच एअरपोर्टला जावे लागते? असे सारखे वाटत होते. आसूने आता टुरिस्ट कंपनीलाही सांगितले होते आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्याही लक्षात आले होते.  मध्ये १-२ वेळा त्या टुरिस्ट कंपनीचेही  फोन  आले आणि ते चौकशी करून धीर देत होते. आम्ही ७ जण एकत्र असल्याने भीती अशी फार वाटत नव्हती किंवा कोणी फार पॅनिक नव्हते झाले. त्यामुळे गप्पा - टप्पा चालू होत्या आणि विषय ही वातावरणाला साजेसा सुपर नेचरल गोष्टी किंवा त्याचे अनुभव असाच होता. पण गणित वेळेशी होते आणि काही झाले तरी वेळेवर कोणाचाच कंट्रोल नसतो.

त्या बायकर्सना गाठून त्यांच्या बरोबर जावे का हा प्रश्न आता डोक्यात यायला लागला. सुरवातीला सगळ्यांनीच तो पर्याय नाकारला होता कारण सोप्पे होते १ तास बायकर्सबरोबर म्हणजे अपरिचित व्यक्तीबरोबर ते ही अंधाऱ्या महामार्गावरून प्रवास. कितीही म्हटले तरी ७च्या ७ जण १ तास एकत्र राहण्याची शक्यता कमीच आणि आमच्या बरोबर ज्या मुली होत्या त्यांना हा पर्याय सुरक्षित वाटत नव्हता. त्यात वातावरण ही थंड होते आणि आमच्याकडे जॅकेट्सही नाहीत.  परत वाऱ्याची भर म्हणजे १ तासात पूर्ण गारठून हाडं आखडून गेली असती. पण जस जशी रात्र वाढायला लागली तस तसा तो पर्याय पुन्हा डोक्यात घोळायला लागला आणि आता मुलीही कशाबशा तयार झाल्या होत्या. पण दुर्दैवाने किंवा आमच्या सुदैवाने म्हणा कोणी ही बायकर्स आता यायला तयात नव्हते. मग आसूने त्या हॉटेल मध्ये झोपता का असा पर्याय दिला आणि खोल्या बघून घ्या. पटल्या तर इथेच झोपा, मी कंपनीशी बोलून त्यांची संमती घेतो असे सुचवले. पण खोल्या कसल्या परमिट रूमच असल्याने त्या पटण शक्यच नव्हतं.

आता जवळ जवळ ११ वाजले होते आणि आता मात्र पेशन्स संपत होते.  दुसऱ्या दिवशी जे आम्ही ठरवले होते ते जिराफ सेन्टर,  मम्बा व्हिलेज वगैरे काही बघता येते की नाही की सरळ एरपोर्टलाच जावे लागते ह्या विचाराने बैचेन व्हायला झाले. परत एकदा सगळ्यांशी चर्चा केल्यावर बाइक्ससाठी पुन्हा प्रयत्न  करूया असे ठरले. कारण ट्रॅफिक सुटण्याची काहीच चिन्हं नव्हती, दुसऱ्या देशात असा एखादा प्रसंग गुजरणे म्हणजे कठीणच आणि तो देश केनियासारखा देश असेल तर अजूनच कठीण. व्यवस्था नावाचा काहीच प्रकार नाही किंवा ते ट्रॅफिक सोडण्यासाठी काही प्रयत्न होताहेत ह्याची काहीच माहिती आमच्यापर्यंयत नाही. आसू काही बाइक्स मिळतात का पाहायला गेला आणि परत येऊन सांगायला लागला की आता १० मिनटात ट्रॅफिक सुटेल, त्यामुळे आपण वाट बघू.  सुरवातीला आमचा विश्वास बसला नाही. आम्हाला वाटले की आसूला आम्हाला बायकर्स बरोबर पाठवायचे नसावे म्हणून तो असाच काही तरी सांगतो आहे आमचे मनोधैर्य राखायला.  पण सुदैवाने तो म्हटल्याप्रमाणे १५ मिनिटात ट्रॅफिक सुटले.  ११-११.१५ च्या सुमारास हळू हळू निघालो आणि ११.३० च्या सुमारास बराचसा मार्ग मोकळा झाला. साधारण १२ ला आम्ही हॉटेल वर पोहोचलो. तिथे तो टुरिस्ट कंपनीचा मॅनेजर आलाच होता. त्याने ख्याली खुशाली विचारली आणि हॉटेलच्या स्टाफला जेवण वाढायला सांगितले पण आमची खायची इच्छा नव्हती, जेवण ही गरम करेस्तोवर वेळ लागणार होता म्हणून रूम वरच पार्सल पाठवायला सांगितले. लेक एलेमेंटेटावर आम्हाला २ दिवसाच्या जंगलातील दगदगीने आराम मिळावा म्हणून ठेवण्यात आले होते पण कसला आराम नि कसलं काय आम्हचा मुक्काम तिथे जेमतेम रात्रीच्या झोपेपुरताच झाला.

आम्हाला एरपोर्टला घ्यायला आलेला चार्ल्स म्हणाला होता की आज एरपोर्टला ट्रॅफिक नाहीये म्हणून पटकन सुटतोय नाही तर ५-६ तास ही अडकून रहावे लागते. तेव्हा विश्वास नव्हता बसला पण आता अनुवभवले होते आणि ट्रॅफिकची धडकीच भरली होती.

ट्रॅफिक कशामुळे होते हे सांगायचेच राहिले का? त्या वेळेस आम्ही १० मिनिटात सुटलो होतो पण तेच ट्रॅफिक नंतर एवढे वाढले की जवळ जवळ ६ तास फक्त एक दिशा मार्गच चालू ठेवण्यात आला होता आणि दुर्दैवाने तो मार्ग आमच्या हॉटेल च्या विरुद्ध दिशेचा होता. पण तिथल्या लोकांचं कौतुक वाटला की ट्रॅफिक मध्ये अडकल्यावरही कोणी विरुद्ध दिशेने गाड्या घालण्याचा प्रयत्नही नाही केला (त्या बाबतीत त्यांना आपल्यापेक्षा पुढारलेले म्हणावे का?). पण आता आम्हाला आमच्या ट्रिप्स मध्ये येणाऱ्या ह्या रोमांचक अनुभवांची इतकी सवय झाली आहे की त्या शिवाय आमची ट्रिप पूर्णत्वास गेल्यासारखेच वाटत नाही.

नंतर सहज डोक्यात विचार येत होते की अशा परिस्थितीत आम्ही एक-एकटे सापडलो असतो तर कसे तोंड दिले असते. आम्ही आणि बंगाली कुटुंबच जास्ती उत्साही असल्याने आम्हीच अशा परिस्थिती सापडायची शक्यता जास्ती होती पण तरीही, जो संयम आम्ही बाळगला किंवा परिस्थिती ज्या प्रकारे शांत चित्ताने हाताळण्यात आली त्याचे कारण हे कदाचित आमच्या एकत्र असण्याला होते. संकटात आपण एकटेच नाही आपल्याबरोबर बाकीचेही आहेत ही भावनाच कदाचित जास्ती सुखद असावी. आणि आसू, एक सामान्य माणूस विपरीत परिस्थिती किती शांततेने हाताळू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या कर्तव्यवृत्तीची परिसीमा म्हणजे सकाळी मारा मध्ये नाश्ता केल्यानंतर तो थेट रात्री त्या बार मधेच जेवला जेव्हा आम्ही बऱ्यापैकी सुरक्षित आहोत ह्याची काळजी घेतली गेल्यावर. त्याच्या ह्या वृत्तीला सलाम.

कैसा अजब यह सफ़र है, सोचो तो हर इक ही बेखबर है
उसको जाना किधर है, जो वक़्त आये, जाने क्या दिखाए??? 

एकंदरीतच दिल चाहता है च्या गाण्याप्रमाणे सुरु झालेला त्या दिवसाचा प्रवास संपला देखील तसाच!!!!!


Link for Photos of Lake Naivasha

Link for Photos of Lake Elemntaita

Sunday, 19 August 2018

नदाल - द अल्टिमेट वॉरियर

खेळातल्या काही रायवलऱीज अगदी परमोच्च दर्जाच्या असतात आणि दोन्ही प्रतिस्पर्धी अगदी तुल्यबळअसले तरी कौतुक, प्रसिद्धी मात्र एकाच्याच वाट्याला तुलनेने जास्ती येते. टेनिस मधलीच  फेडरल - नदाल ही जवळपास गेल्या दशकभरातील सुप्रसिद्ध रायवलऱी. पण नदाल पेक्षा फेडरर जास्ती प्रसिद्ध आणि लोकप्रिय. त्याच्या खेळातील सहजता,  स्विस अचूकता आणि त्यास लाभलेली नजाकतीची साथ, त्याची मैदानातील वागणूक, आणि जिंकल्यानंतर व्यक्त होण्याची पद्धत सगळे सभ्यता आणि शालीनतेला धरून. त्याचा खेळ बघताना हरखून जायला होते आणि त्यामुळे फेडरर आवडत नसलेला  टेनिसचा चाहता तसा दुर्मिळच. पण ह्यातले काहीच नसलेला,  एखाद्या योद्धयाप्रमाणे भासणारा, निर्दयी खेळ वाटणारा , जिंकण्यासाठी सर्वस्व देणारा आणि कधीही हार न मानणारा (अगदी चेअर मध्ये बसलेला पंच फायनल स्कोर सांगत नाही तो पर्यंत आशा न सोडणारा) तेवढाच तोडीस तोड नदाल मात्र काही प्रमाणात कमी लोकप्रिय, कमी प्रसिद्ध !!!

नदालच्या अस्तित्वाची टेनिस विश्व दाखल घ्यायला लागले तेव्हा फेडरर पहिल्या क्रमांकावर स्थिरस्थावर झाला होता आणि कोणीही त्याला आव्हान देऊ शकेल असे वाटत नव्हते इतक्या प्रचंड फॉर्म मध्ये होता तो! त्याच्या 'आर्टिस्टिक' खेळामुळे आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे लोकांच्या मनात स्थान मिळवले होते. सॅम्प्रास पोकळीही त्याने भरून काढली होती. आणि अशातच २००५ च्या फ्रेंच ओपन मध्ये त्याने फेडररला सेमी फायनल मध्ये हरवले आणि पुढे २ दिवसांनी फायनलही जिंकली ते ही अवघ्या १९व्या वर्षी (सॅम्प्रास नंतर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिलाच टीनएजर होण्याचं मान मिळवला). पुढे मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धात त्याला लक्षणीय कामगिरी करता नाही आली तरी त्याने वर्षअखेरीस २ ऱ्या स्थानावर झेप घेतली होती. पण तरीही त्याची दखल गांभीर्याने घेतली जात नव्हती. पुढच्या वर्षीही परत त्याने फेडररला फायनल मध्ये नमवत फ्रेंच ओपन जिंकली आणि विम्बल्डनच्या फायनल मध्ये फेडररला आव्हान दिले. आता मात्र तो सगळ्यांच्या नजरेत भरला होता मात्र मला तो कुठेतरी आवडायला लागला होता कारण प्रस्थापिताला सातत्याने आव्हान देणारा नदाल कुठे तरी आपल्या बॉलीवूड हिरोसारखा वाटत होता. अर्थात प्रस्थापित असला तरी फेडरर काही आपल्या बॉलीवूड फिल्म्स प्रमाणे व्हिलन नव्हता/नाही.  . विम्बल्डन फायनल मध्ये फेडररला आव्हान म्हणजे त्याच्याच राज्यात अगदी सिंहासनाला दिलेलं आव्हान वाटायला लागलेले कारण तोपर्यंत फेडरर विम्बल्डनचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. पण ती फायनल नदाल हरला पण पुढच्या वर्षीची फ्रेंच ओपन नियम असल्याप्रमाणे जिंकला होता. म्हणजे फेडरर ग्रास कोर्टचा अनभिषिक्त सम्राट तर नदाल क्ले कोर्टचा राजा असे सरळसरळ मालकी हक्क प्रस्थापित झाले होते. २००८ मात्र वेगळेच होते. त्या वर्षीही नदालने फेडररला फ्रेंच ओपन फायनल मध्ये सरळ सेट्स मध्ये हरवले आणि आता पुढच्या विम्बल्डन  फायनल मध्ये परत फेडरर आणि नदाल समोरासमोर आले. नदाल आता जास्त परिपक्व झाला होता, नुकतंच क्विन्स क्लब मध्ये त्याने आर्टोईस चॅम्पिअनशिप जिंकत ग्रास कोर्ट वरचं पहिला विजेतेपद पटकावलं होतं त्यामुळे आत्मविश्वास ही उंचावला होता. दबाव आता फेडरर वर होता त्याचं ग्रासकोर्ट वरचं सम्राटपद डावावर लागलं होतं. आणि ते दोघं  विम्बल्डनच्या इतिहासातली अजरामर, अद्वितीय अशी फायनल खेळले. दोन्ही खेळाडू शब्दशः जीवाचा रान करून खेळत होते.  सामना संपल्यावर त्यांना
स्ट्रेचरवरूनच घेऊन जावे लागेल की काय असे वाटावे एवढे दोघेही दमले होते पण नियतीच दान मात्र नदालच्या बाजूने पडले आणि नादालने ग्रास कोर्टलाही आपलेसे केले. एका प्रस्थापिताला बाजूला सारून तो सर्वोच्च पदावर  पोहोचला होता. (प्रस्थापितांना तुलनेत नवोदिताने आव्हान देण्याराला पाठिंबा देणं हा कदाचित आपल्या भारतीय मानसिकतेचा भाग असावा. अगदी ९० च्या दशकांपासून ते साधारण २१व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत आपले साहित्य म्हणा, आपले सिनेमे म्हणा थोडयाफार फरकाने ह्याच कथासूत्राभोवती फिरत असत अगदी लगान पर्यंत हेच असायचा. दिल चाहता है ने मात्र भारतीय सिनेमा बदलला. आपला क्रिकेट संघ विश्वविजेता असला तरी कसोटी मध्ये कधीच प्रस्थापित नव्हती म्हणून गांगुलीचा संघ जेव्हा परदेशात यजमान संघाना आव्हान द्यायला लागला तेव्हा सामना निश्चिती प्रकरणापासून दूर गेलेले क्रिकेट चाहते पुन्हा क्रिकेट कडे वळले. एवढाच कशाला नुकत्याच संपलेल्या फ़ुटबाँल विश्वचषक अंतिम सामन्यात बहुतांश जणांचा पाठिंबा क्रोएशियाला होता). हा तडाखा एवढा जबरदस्त होता की एका ग्रँडस्लॅम (महत्वाच्या ४ स्पर्धात) नदालला हरवण्यासाठी पुढचे जवळपास १० वर्ष फेडररला (२०१७ - ऑस्ट्रेलियन ओपन) वाट पाहावी लागली. फेडरर सारखं प्रतिभेचं देणं, बिनतोड म्हणावी अशी हुकुमी सर्विस नसताना जवळपास १५ वर्ष टेनिस विश्व गाजवत ठेवण्यासारखं काय आहे नदाल मध्ये???

द अल्टिमेट वॉरियर

टेनिस हा खरा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, प्रेक्षकांना दाद द्यायला, पाठिंबा दर्शवायला किंवा चीअर अप करण्यासाठी फक्त दोन पॉइंट्सच्या मधली वेळ आहे. एकदा खेळाडूने सर्विस साठी स्टान्स घेतला की पुन्हा शांतता. खेळाडूही तसे सभ्य असतात, सहसा जास्ती उत्तेजित होत नाहीत किंवा फ्रस्टरेशन ही फार दाखवत नाहीत (मॅकेन्रो, इवानसावीच असे काही अपवाद वगळता). सगळं कसा सभ्यतेला धरून. कपडे ही अगदी सभ्य लोकांना साजेसे (वेगवेगळ्या फॅशन करायचा तो काय आगास्सीचं). अशा खेळात बिन बाह्यांचे टी-शर्ट घालून स्वतःचे बायसेप्स दाखवणारा, गुडघ्यापर्यंत टाईट शॉर्ट्स घालणारा, डोक्याला हेडबँड बांधणारा नदाल एखाद्या योद्धयाप्रमाणे भासतो आणि त्याच्या फोरहँडच्या फटक्याची जी  फिनिशिंग मोव्हमेन्ट आहे त्याने तर तलवारबाजीचा भास होतो. त्याचे फटके ही बऱ्याचदा पाशवी असतात, समोरच्याचे मनोधैर्य कदाचित खच्ची करू शकणारे विशेषतः फोरहँड. एकंदरीत त्याचे व्यक्तिमत्व पाहता चुकीच्या जागी आलाय का तो असे वाटायचे. पण नदाल हे रसायनच वेगळे आहे. अगदी शेवटच्या पॉईंट पर्यंत तो त्याच जोमाने, त्याच जोशाने खेळत राहतो. प्रत्येक पॉईंटचा जिवाच्या आकांताने पाठलाग करत राहतो, कुठलाच पॉईंट सोडून दिलाय असे नादालच्या बाबतीत झालेले मला आठवत नाही. कितीही त्रास होवो, कितीही वेदना असो असे त्याने सामना सोडून दिलाय असे फार फार क्वचित बघायला मिळते. एखादा थकलेला शॉट किंवा रिटर्न त्याने दिलाय असे होतच नाही , रॅली हा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, रॅली खेळत राहून समोरच्याला दमवणे आणि त्याला चूक करायला भाग पडणे ही त्याची साधारण स्ट्रॅटेजि आहे आणि म्हणून 40 शॉटची एखादी रॅली झाल्यावरही एक्केचाळिसावा शॉट घेण्यासाठी तो तेवढाच फ्रेश वाटतो. तो जर पडला नसेल तर कोर्टच्या कोणत्याही कोपऱ्यातला पॉईंट धावून घेण्यावाचून त्याला कोणी अडवू शकत नाही. जर रोमन ग्लॅडिएटर्स कधी अवतरले तर नक्कीच त्याला ते पाठिंबा देतील असे मला वाटते किंबहुना त्यांच्यातलाच तो एक वाटतो.

 २०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनल मध्ये तो फेडररपेक्षा तब्बल ४ तास जास्ती खेळून फायनल मध्ये आला होता (हे त्याच्या हरण्याचं समर्थन नाही आणि नदाल स्वतः हे कारण कधी देईल असे वाटत नाही) . अंतिम सामन्यात ही तिसऱ्या सेट मध्ये फेडररने नदालचा ६-१ ने पाडाव केला होता, ते फक्त सेट जिंकणं नसतं, मानसिक खच्चीकरण असतं. नदाल सामन्यात पुनरागमन करेल असा कोणालाही वाटलं नव्हतं? पण सहजासहजी सामना सोडेल तो नदाल कसला? नदाल पुढचा सेट जिंकला आणि सामना पाचव्या सेट पर्यंत गेला.

अशी आख्यायिका त्याने स्वतःच्या बाबतीत करून ठेवलीय गेल्या दशकभरात. वेळोवेळी पिछाडीवर असताना सामन्यात दमदार पुनरागमन करत आणि काही काही वेळा तर अशक्यप्राय परिस्थितीतून विजयश्री खेचून आणलीय त्याने. २ सेट ची पिछाडी त्याच्यासाठी फार महत्वाची नाहीच. संख्या फलक ही फार महत्वाचा नाहीच. सामना निर्णायक पॉईंट वर असताना देखील तो त्याचे कुठेले फटके म्यान करत नाही की फटका साईड लाईनजवळ टाकत नाही असे होत नाही. तो आणि विजय ह्यात कोणीच उभे नाही असे वाटण्याजोगा एकदम बिनधास्त खेळात राहतो.

सध्या दुखापतींनी त्रस्त केलाय त्याला. त्याच्या रॅली गेम्स मुळेच त्याच्या शरीराला जास्ती कष्ट पडतात आणि प्रत्येक पॉईंट घेण्याच्या अट्टाहासाने काही काही वेळा शरीर असे  काही ट्विस्ट होते की ज्याची कधी सवय नसते. एखादा पॉईंट त्याच्या शरीराने सोडलेला असतो पण मनाने सोडलेला नसतो आणि मेंदू जेव्हा शरीरावर वर्चश्व गाजवायला लागतो तेव्हा शरीर त्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण करू शकत. ज्याप्रमाणे तुटलेला आरसा पुन्हा नाही सांधू शकत त्याप्रमाणे एखादी सांध्याला झालेली दुखापत नेहमीच कमकुवत राहते. त्याची बोटं टेप मध्ये गुंडाळलेली असतात. बाह्य दुखापत टेप ने झाकू शकतो पण दुखावलेले स्नायू किंवा tissues, ना टेप ने झाकू शकत ना कोणतं मलम आराम देत. पण ह्यातली एक ही गोष्ट खेळताना त्याच्या चेहऱ्यावर येत नाही, खेळताना फक्त मेंदू त्याला सूचना करत एखाद्या कुशल सारथ्य प्रमाणे शरीराला ड्राईव्ह करतो. वेदना फक्त आतमध्ये दबलेल्या राहतात. त्याचं शरीर वेदनांना कदाचित शरण जाईल ही पण  कणखर मनामुळे तो समोरच्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडतो.

आता फेडरर आणि नदाल दोघेही कदाचित त्यांच्या कारकिर्दीच्या मावळतीकडे आहेत (वय नदालचा प्लस पॉईंट आहे , पण शरीरावर पडलेल्या अतिरिक्त ताणामुळे ते किती साथ देईल सांगता येत नाही). अशातच त्यांच्यातल्या रायवलरिच्या इतिहासात अजून एक धडा लिहिला गेला असता नुकत्याच संपलेल्या विम्बल्डन मध्ये. दोघेही व्यवस्थित फॉर्म मध्ये होते आणि अंतिम सामना त्या दोघातच खेळवला जाईल असं वाटत होतं पण फेडरर चवथ्या फेरीत बाद झाला तर नदाल उपांत्य फेरीत. पण उपांत्य फेरीत बाद होण्याआधी तो विम्बल्डनच्या इतिहासातला अजून एक उत्कृष्ट सामना खेळूनच बाहेर गेला, त्याच्या स्वभावाला साजेसं शेवटपर्यंत निकराने लढून. नियतीने ह्या वेळेस जरी त्यांचा सामना होऊन नसेल दिला तरी त्यांच्या आयुष्याची गाठ मात्र कायमची घालून दिलीय. टेनिसच्या इतिहासात त्यांचं नाव एकत्र घेतलं जाईल, त्यांचे सामने स्पोर्ट्स वाहिन्यांवर क्लासिक म्हणून दाखवले जातील. फेडरर २०१७ ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतर म्हणलं होता की ही फायनल बरोबरीत सोडवण्यास मी आनंदाने संमती दिली असती. फेडररने नादालच्या खेळास ही दिलेली दादच म्हणावी लागेल. पण ज्याने नदालची चिकाटी आणि हिम्मत पाहिलीय त्याला माहित असेल की जर टेनिस मध्ये बरोबरी हा पर्याय असता तर नदाल कदाचित टेनिस खेळला नसता. विजय हा एकमेव मार्ग आहे आणि लक्ष्य ही नदालसाठी.

तळटीप - नादालची वृत्तीच कुठेतरी कोहली मध्ये असल्यासारखी वाटते आणि म्हणूनच नदाल इतकाच मे कोहलीचाही प्रचंड फॅन आहे.  

Friday, 22 June 2018

अजी म्या वाघ (male tiger) पाहीला


A tiger is a large-hearted gentleman with boundless courage and that when he is exterminated - as exterminated he will be unless public opinion rallies to his support - India will be the poorer by having lost the finest of her fauna. - Jim Corbett

कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे तर निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती बघण्याचा छंदच लागलाय सध्या. (माझे छंद ही चंचल आहेत, आधी ट्रेकिंगचा छंद होता, मग लॉन्ग ड्राईव्हचा आणि खादाडीचा मग पक्षी निरीक्षणाचा असे बरेच). व्याघ्र दर्शनाला जायचे म्हटलं की आनंद पोटात माझ्या माईना असं होतं. ह्या डोळ्यांची भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांची भटकंती सुरु असते. आतापर्यंत कान्हा, बांधवगड असे महाराष्ट्राच्या बाहेरचे व्याघ्र प्रकल्प फिरून झाले होते अन वाघांचे मनसोक्त असे नाही म्हणता येणार पण समाधानकारक दर्शन झाले होते (मन कधी भरेल व्याघ्र दर्शनाने असे वाटतच नाही. दर वेळी भरून झाले तरी अजून असे वाटत राहते). ह्या सगळ्यात उणीव एका गोष्टीची होती. मेल टायगरची.

एवढ्या सगळ्या सफारी करून अजून मेल टायगर (male tiger) काही दिसला नव्हता किंवा कुठे त्याचा मागमूस ही नव्हता. नाही म्हणायला रणथंबोरला सकाळी प्रवेश करता करता एका नराच्या पावलाचे ठसे आढळलेले. ते ताजे असले तरी तो दिसायची शक्यता नव्हती. मेल टायगर न दिसण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची टेरिटरी किंवा हद्द. साधारण ६० तो १०० चौ. किमी. ची हद्द एका मेल टायगरची असते आणि त्या पूर्ण territory चे रक्षण त्याला करावयाचे असते त्या उलट मादी. तिची territory फक्त २० चौ. किमी एवढीच असते आणि त्यात जर ती लेकुरवाळी असेल तर तिच्या परिसरातल्या पाणवठ्यावर जास्ती वावर असतो तिचा. त्यामागचे कारण ही सहजसुलभ म्हणजे  पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांपैकी एखाद्याला भक्ष्य करायचे म्हणजे फारसे प्रयास पडत नाहीत आणि दुसरे म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी त्यांना पाण्याची फारच गरज असते. त्यामुळे एखाद्या झोन मध्ये प्रवेश केल्यास आणि त्या परिसरात वाघीण आणि तिचे बछडे असल्यास निवांत पाणवठ्यावर बसून राहायचे. पाणवठ्यावर ते हमखास येणारच. पण नराचे तसे काही सांगता येत नाही एकतर तो एकटाच राहणे पसंत करतो आणि पूर्ण हद्द नियंत्रित करायला फिरत राहतो. फिरता फिरता मधेच कुठेह दाट झुडपे आणि थंडगार जागा आढळली की बसतो फतकल मारून किंवा लोळत पडत राहतो आणि एकदा पडला की किती काळ पडून राहील काही सांगता येत नाही. आणि वाघ झोपला असल्यास किंवा नुसता बसून राहिला असल्यास वानरं किंवा चितळ काही अलार्म कॉल्स देत नाहीत. त्यामुळे अगदी दृष्टीपथात असला तरी नजरेस पडत नाही!!!

तर ह्या उन्हाळ्यात our very own अशा महाराष्ट्रातल्या ताडोबात  जायचा बेत आखलेला. ताडोबा कधीच निराश नाही करत म्हणतात (पण असे सगळेच व्याघ्र प्रकल्पातले गाईड आणि ड्रायव्हर्स म्हणतात). ह्या वेळी मात्र लेडी लक आमच्यावर अक्षरशः फिदा होते.३ सफारी आणि तिन्ही वेळा वाघ दिसला होता आणि नुसतेच ओझरते दर्शन नाही तर  त्याचे मनसोक्त निरीक्षण करता आले होते.  पहिल्या वेळी शर्मिलीचा बच्चा जंगलात शिरत नाही तोच पाणवठ्यावर दिसला. अगदी समोर होता. आधी झुडपात बसून नुसतंच समोर लागलेल्या गाड्यांचं निरीक्षण चालू होतं. मग तहान लागली तास पाण्यात आला. मग बाहेर गेला, पुन्हा पाण्यात डुंबायला आला आणि तिथून सगळ्या गाड्यांवर कटाक्ष फिरवत होता. १ गवा जरा लांबून दिसला तास उठून पुन्हा आत झुडपांमध्ये गेला. बाहेर पडत पडत बिबळ्याचे ही ओझरते दर्शन झाले (बिबळ्या जंगलात सहसा दृष्टीस पडत नाही. फारच बुजरा प्राणी आहे तो पण त्याचेही ओझरते का होईना दर्शन  आले ते आमच्या ड्रायव्हरच्या कौशल्यामुळे. जंगलात वाघ दिसावायचा असल्यास तुमच्या नशिबाबरोबरच तुमचा ड्राइवर किंवा गाईड  तेवढाच निष्णात आणि अनुभवी असावयास लागतो, त्यावर पुन्हा कधीतरी). दुसऱ्या सफरीत लारा जस्ट मिस झाली पण माधुरीचा बछडा दिसला होता आणि तिसऱ्या सफरीत तर लारा अगदी हेड ऑन दिसली व माझ्या जिप्सीच्या बाजूने गेली अगदी म्हणतात तसे टचिंग डिस्टन्स वर होती. मनात आणले असते तर ती माझी तिच्या रात्रीच्या जेवणासाठी सहज निवड करू शकली असती पण पोट भरलेले असावे बहुदा :). (पुन्हा इथे ही वाघीण आणि बच्चेच, मेल टायगर नाहीच. माणसाने असमाधानी म्हणजे किती असावे ?? )

चौथी सफारी आमची कोअर झोन मध्ये होती. कोअर झोन शुष्क पानझडी वनाचा आहे आणि आम्ही कडक उन्हाळ्यात गेलेलो असल्याने सकाळी ७-७.१५ लाच उन्हाची तीव्रता जाणवू लागलेली आणि बफर प्रमाणे दाट वृक्षराजी नसल्याने रखरखाट जाणवू लागलेला. शिरस्त्याप्रमाणे जामनी, पंढरपौनी, एनबॉडी, ताडोबा लेक असे पाणवठे घेत चाललेलो पण पंढरपौनी लेक १ आणि लेक २ इथे मायाच्या पावलांचे ठसे वगळता फार कुठे खाणाखुणा दिसल्या नाहीत. पुढे पंचधारा म्हणून जागा आहे, रखरखीत प्रदेशात घनदाट वृक्षराजी आणि एक ओहोळ वाहत असलेली शांत आणि थंड जागा. भर दुपारी ही तिथे थंड आणि खूप शांत वाटतं.
त्या जागी चक्कर मारून येत असताना एकाला काही हालचाल जाणवली.  आम्हाला वाटलं बिबट्या असावा कारण बिबट्यासाठी आदर्श अशी जागा होती असा अंदाज. ड्रायव्हरला गाडी थोडी पाठी घ्यायला सांगितली आणि गाईडने मित्राने दिशेला न्याहाळत मटकासूर एवढेच म्हणाला मात्र आणि गाडीतले सगळे 'attention' पोझिशन मध्ये पंचधारा डोळ्यात प्राण आणून स्कॅन करायला लागले. आणि एकदाचा तो दिसला आणि ते राजबिंडे रूप आणि ती ऐटदार चाल बघत असताना आजी म्या ब्रह्म पहिले अशी अवस्था झाली. आजूबाजूच्या सगळ्या जगाचा विसर पडला. फक्त एकच गोष्ट डोक्यता होती, ती म्हणजे मटकासूर डोळ्यात आणि जमेल तितका कॅमेरा मध्ये  साठवून घ्यावा. अगदी धम्मक अशी नसली तरी पिवळी कांती, काळे पट्टे आणि रुबाबदार चाल असे हे सुंदर रूप पाहत असता नजरेस आणिक काही येत नव्हतं.फार धष्ट पुष्ट  नसावा, साधारण मध्यम साईझ म्हणता येईल असा पण त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राट असल्याच्या खाणाखुणा त्याच्या एकंदर हालचालीत जाणवत होत्या. अचानक शांत असलेल्या पंचधारा परिसराला जाग आली आणि घिसाडघाई जाणवायला लागली. आजूबाजूला एवढे सगळे होत असताना मटकासुर मात्र स्वतःच्या तंद्रीत आजूबाजूच्या जगाची तम ना बाळगता काही तरी मिशनवर असल्यासारखा पुढे पुढे येत होता. एवढ्या वेळ  पंचधारेत वावरत असलेल्या चितळांना ही मटकासूरची जाणीव झाली आणि शेपूट घालून पळून सुरक्षित अंतरावर जाऊन बघत बसले. एका पाण्याच्या ओहोळावर मटकाने थोडे पाणी प्यायले आणि तो तिथेच रेंगाळत बसेल असे वाटत असताना त्याला त्याच्या मिशनची आठवण झाले असावी आणि तो परत आजूबाजूच्या मर्त्य प्राण्यांकडे न पाहता पुढे निघाला. पंचधारेच्या पलीकडचा रस्ता पार करून तो आत झाडीत जाईल अशी जाणीव ड्राइवरला जाळी आणि त्याने गाडी पटकन पंचधारेच्या पलीकडे नेली. त्याचा अंदाज बरोबर निघाला. मटका रस्त्यावर आला. बाजूच्या २-३ गाड्यांकडे थोडे कुतूहलपूर्वक पहिले आणि परत मिशन वर निघाला आणि काही क्षणातच जसा आला तास अंतर्धान पावला. एवढे सगळे फार तर ५-७ मिनिटात घडले असेल पण हा प्रसंग मात्र आयुष्यभर लक्षात राहील असा. आमचा ड्राइवर आणि गाईडही म्हणाले ४-५ दिवस झाले मटकासूर दिसला नव्हता आणि आज दिसेल अशी अपेक्षा ही नव्हती  हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच आणि एवढे रोज वाघांना बघणारे ते ही मटकासूर पाहून हरखून गेले. (मेलचा aura  काही औरच असतो). आपण तर कधीतरी जाणारे, आपला आनंद काय वर्णावा? तो तर पोटात मावणारच नाही.
Royal Walk of Matkasur - Panchdhara

Matakur Crossing The Road

Matkasur - Looking Curiously towards Gypsies



आज ही इतक्या दिवसानंतर ताडोबातील हायलाईट म्हणून मटकासुराचे धावते दर्शनच आठवते. रणथंबोरची मछली किंवा ताडोबाची माधुरी ह्या सुपर मॉम म्हणून प्रसिद्ध आहेत.  गूगलरावांना त्यांच्या विषयी विचारल्यास मोस्ट फोटोग्राफ्ड टायग्रेस म्हणून ही त्या प्रसिद्ध आहेत असे जाणवते. सहज एक विचार आला, तसे ही स्त्री वर्गालाच फोटो काढून घ्याची हौस जास्ती असते आणि त्यातून मेल टायगर दिसायचेच नाव घेत नाहीत तर फोटो काढणे लांबच राहिले आणि मोस्ट फोटोग्राफ्ड असे बिरुद  मिरवणे म्हणजे तर अशक्यप्रायच!!