Sunday, 19 August 2018

नदाल - द अल्टिमेट वॉरियर

खेळातल्या काही रायवलऱीज अगदी परमोच्च दर्जाच्या असतात आणि दोन्ही प्रतिस्पर्धी अगदी तुल्यबळअसले तरी कौतुक, प्रसिद्धी मात्र एकाच्याच वाट्याला तुलनेने जास्ती येते. टेनिस मधलीच  फेडरल - नदाल ही जवळपास गेल्या दशकभरातील सुप्रसिद्ध रायवलऱी. पण नदाल पेक्षा फेडरर जास्ती प्रसिद्ध आणि लोकप्रिय. त्याच्या खेळातील सहजता,  स्विस अचूकता आणि त्यास लाभलेली नजाकतीची साथ, त्याची मैदानातील वागणूक, आणि जिंकल्यानंतर व्यक्त होण्याची पद्धत सगळे सभ्यता आणि शालीनतेला धरून. त्याचा खेळ बघताना हरखून जायला होते आणि त्यामुळे फेडरर आवडत नसलेला  टेनिसचा चाहता तसा दुर्मिळच. पण ह्यातले काहीच नसलेला,  एखाद्या योद्धयाप्रमाणे भासणारा, निर्दयी खेळ वाटणारा , जिंकण्यासाठी सर्वस्व देणारा आणि कधीही हार न मानणारा (अगदी चेअर मध्ये बसलेला पंच फायनल स्कोर सांगत नाही तो पर्यंत आशा न सोडणारा) तेवढाच तोडीस तोड नदाल मात्र काही प्रमाणात कमी लोकप्रिय, कमी प्रसिद्ध !!!

नदालच्या अस्तित्वाची टेनिस विश्व दाखल घ्यायला लागले तेव्हा फेडरर पहिल्या क्रमांकावर स्थिरस्थावर झाला होता आणि कोणीही त्याला आव्हान देऊ शकेल असे वाटत नव्हते इतक्या प्रचंड फॉर्म मध्ये होता तो! त्याच्या 'आर्टिस्टिक' खेळामुळे आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे लोकांच्या मनात स्थान मिळवले होते. सॅम्प्रास पोकळीही त्याने भरून काढली होती. आणि अशातच २००५ च्या फ्रेंच ओपन मध्ये त्याने फेडररला सेमी फायनल मध्ये हरवले आणि पुढे २ दिवसांनी फायनलही जिंकली ते ही अवघ्या १९व्या वर्षी (सॅम्प्रास नंतर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिलाच टीनएजर होण्याचं मान मिळवला). पुढे मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धात त्याला लक्षणीय कामगिरी करता नाही आली तरी त्याने वर्षअखेरीस २ ऱ्या स्थानावर झेप घेतली होती. पण तरीही त्याची दखल गांभीर्याने घेतली जात नव्हती. पुढच्या वर्षीही परत त्याने फेडररला फायनल मध्ये नमवत फ्रेंच ओपन जिंकली आणि विम्बल्डनच्या फायनल मध्ये फेडररला आव्हान दिले. आता मात्र तो सगळ्यांच्या नजरेत भरला होता मात्र मला तो कुठेतरी आवडायला लागला होता कारण प्रस्थापिताला सातत्याने आव्हान देणारा नदाल कुठे तरी आपल्या बॉलीवूड हिरोसारखा वाटत होता. अर्थात प्रस्थापित असला तरी फेडरर काही आपल्या बॉलीवूड फिल्म्स प्रमाणे व्हिलन नव्हता/नाही.  . विम्बल्डन फायनल मध्ये फेडररला आव्हान म्हणजे त्याच्याच राज्यात अगदी सिंहासनाला दिलेलं आव्हान वाटायला लागलेले कारण तोपर्यंत फेडरर विम्बल्डनचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. पण ती फायनल नदाल हरला पण पुढच्या वर्षीची फ्रेंच ओपन नियम असल्याप्रमाणे जिंकला होता. म्हणजे फेडरर ग्रास कोर्टचा अनभिषिक्त सम्राट तर नदाल क्ले कोर्टचा राजा असे सरळसरळ मालकी हक्क प्रस्थापित झाले होते. २००८ मात्र वेगळेच होते. त्या वर्षीही नदालने फेडररला फ्रेंच ओपन फायनल मध्ये सरळ सेट्स मध्ये हरवले आणि आता पुढच्या विम्बल्डन  फायनल मध्ये परत फेडरर आणि नदाल समोरासमोर आले. नदाल आता जास्त परिपक्व झाला होता, नुकतंच क्विन्स क्लब मध्ये त्याने आर्टोईस चॅम्पिअनशिप जिंकत ग्रास कोर्ट वरचं पहिला विजेतेपद पटकावलं होतं त्यामुळे आत्मविश्वास ही उंचावला होता. दबाव आता फेडरर वर होता त्याचं ग्रासकोर्ट वरचं सम्राटपद डावावर लागलं होतं. आणि ते दोघं  विम्बल्डनच्या इतिहासातली अजरामर, अद्वितीय अशी फायनल खेळले. दोन्ही खेळाडू शब्दशः जीवाचा रान करून खेळत होते.  सामना संपल्यावर त्यांना
स्ट्रेचरवरूनच घेऊन जावे लागेल की काय असे वाटावे एवढे दोघेही दमले होते पण नियतीच दान मात्र नदालच्या बाजूने पडले आणि नादालने ग्रास कोर्टलाही आपलेसे केले. एका प्रस्थापिताला बाजूला सारून तो सर्वोच्च पदावर  पोहोचला होता. (प्रस्थापितांना तुलनेत नवोदिताने आव्हान देण्याराला पाठिंबा देणं हा कदाचित आपल्या भारतीय मानसिकतेचा भाग असावा. अगदी ९० च्या दशकांपासून ते साधारण २१व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत आपले साहित्य म्हणा, आपले सिनेमे म्हणा थोडयाफार फरकाने ह्याच कथासूत्राभोवती फिरत असत अगदी लगान पर्यंत हेच असायचा. दिल चाहता है ने मात्र भारतीय सिनेमा बदलला. आपला क्रिकेट संघ विश्वविजेता असला तरी कसोटी मध्ये कधीच प्रस्थापित नव्हती म्हणून गांगुलीचा संघ जेव्हा परदेशात यजमान संघाना आव्हान द्यायला लागला तेव्हा सामना निश्चिती प्रकरणापासून दूर गेलेले क्रिकेट चाहते पुन्हा क्रिकेट कडे वळले. एवढाच कशाला नुकत्याच संपलेल्या फ़ुटबाँल विश्वचषक अंतिम सामन्यात बहुतांश जणांचा पाठिंबा क्रोएशियाला होता). हा तडाखा एवढा जबरदस्त होता की एका ग्रँडस्लॅम (महत्वाच्या ४ स्पर्धात) नदालला हरवण्यासाठी पुढचे जवळपास १० वर्ष फेडररला (२०१७ - ऑस्ट्रेलियन ओपन) वाट पाहावी लागली. फेडरर सारखं प्रतिभेचं देणं, बिनतोड म्हणावी अशी हुकुमी सर्विस नसताना जवळपास १५ वर्ष टेनिस विश्व गाजवत ठेवण्यासारखं काय आहे नदाल मध्ये???

द अल्टिमेट वॉरियर

टेनिस हा खरा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, प्रेक्षकांना दाद द्यायला, पाठिंबा दर्शवायला किंवा चीअर अप करण्यासाठी फक्त दोन पॉइंट्सच्या मधली वेळ आहे. एकदा खेळाडूने सर्विस साठी स्टान्स घेतला की पुन्हा शांतता. खेळाडूही तसे सभ्य असतात, सहसा जास्ती उत्तेजित होत नाहीत किंवा फ्रस्टरेशन ही फार दाखवत नाहीत (मॅकेन्रो, इवानसावीच असे काही अपवाद वगळता). सगळं कसा सभ्यतेला धरून. कपडे ही अगदी सभ्य लोकांना साजेसे (वेगवेगळ्या फॅशन करायचा तो काय आगास्सीचं). अशा खेळात बिन बाह्यांचे टी-शर्ट घालून स्वतःचे बायसेप्स दाखवणारा, गुडघ्यापर्यंत टाईट शॉर्ट्स घालणारा, डोक्याला हेडबँड बांधणारा नदाल एखाद्या योद्धयाप्रमाणे भासतो आणि त्याच्या फोरहँडच्या फटक्याची जी  फिनिशिंग मोव्हमेन्ट आहे त्याने तर तलवारबाजीचा भास होतो. त्याचे फटके ही बऱ्याचदा पाशवी असतात, समोरच्याचे मनोधैर्य कदाचित खच्ची करू शकणारे विशेषतः फोरहँड. एकंदरीत त्याचे व्यक्तिमत्व पाहता चुकीच्या जागी आलाय का तो असे वाटायचे. पण नदाल हे रसायनच वेगळे आहे. अगदी शेवटच्या पॉईंट पर्यंत तो त्याच जोमाने, त्याच जोशाने खेळत राहतो. प्रत्येक पॉईंटचा जिवाच्या आकांताने पाठलाग करत राहतो, कुठलाच पॉईंट सोडून दिलाय असे नादालच्या बाबतीत झालेले मला आठवत नाही. कितीही त्रास होवो, कितीही वेदना असो असे त्याने सामना सोडून दिलाय असे फार फार क्वचित बघायला मिळते. एखादा थकलेला शॉट किंवा रिटर्न त्याने दिलाय असे होतच नाही , रॅली हा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, रॅली खेळत राहून समोरच्याला दमवणे आणि त्याला चूक करायला भाग पडणे ही त्याची साधारण स्ट्रॅटेजि आहे आणि म्हणून 40 शॉटची एखादी रॅली झाल्यावरही एक्केचाळिसावा शॉट घेण्यासाठी तो तेवढाच फ्रेश वाटतो. तो जर पडला नसेल तर कोर्टच्या कोणत्याही कोपऱ्यातला पॉईंट धावून घेण्यावाचून त्याला कोणी अडवू शकत नाही. जर रोमन ग्लॅडिएटर्स कधी अवतरले तर नक्कीच त्याला ते पाठिंबा देतील असे मला वाटते किंबहुना त्यांच्यातलाच तो एक वाटतो.

 २०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनल मध्ये तो फेडररपेक्षा तब्बल ४ तास जास्ती खेळून फायनल मध्ये आला होता (हे त्याच्या हरण्याचं समर्थन नाही आणि नदाल स्वतः हे कारण कधी देईल असे वाटत नाही) . अंतिम सामन्यात ही तिसऱ्या सेट मध्ये फेडररने नदालचा ६-१ ने पाडाव केला होता, ते फक्त सेट जिंकणं नसतं, मानसिक खच्चीकरण असतं. नदाल सामन्यात पुनरागमन करेल असा कोणालाही वाटलं नव्हतं? पण सहजासहजी सामना सोडेल तो नदाल कसला? नदाल पुढचा सेट जिंकला आणि सामना पाचव्या सेट पर्यंत गेला.

अशी आख्यायिका त्याने स्वतःच्या बाबतीत करून ठेवलीय गेल्या दशकभरात. वेळोवेळी पिछाडीवर असताना सामन्यात दमदार पुनरागमन करत आणि काही काही वेळा तर अशक्यप्राय परिस्थितीतून विजयश्री खेचून आणलीय त्याने. २ सेट ची पिछाडी त्याच्यासाठी फार महत्वाची नाहीच. संख्या फलक ही फार महत्वाचा नाहीच. सामना निर्णायक पॉईंट वर असताना देखील तो त्याचे कुठेले फटके म्यान करत नाही की फटका साईड लाईनजवळ टाकत नाही असे होत नाही. तो आणि विजय ह्यात कोणीच उभे नाही असे वाटण्याजोगा एकदम बिनधास्त खेळात राहतो.

सध्या दुखापतींनी त्रस्त केलाय त्याला. त्याच्या रॅली गेम्स मुळेच त्याच्या शरीराला जास्ती कष्ट पडतात आणि प्रत्येक पॉईंट घेण्याच्या अट्टाहासाने काही काही वेळा शरीर असे  काही ट्विस्ट होते की ज्याची कधी सवय नसते. एखादा पॉईंट त्याच्या शरीराने सोडलेला असतो पण मनाने सोडलेला नसतो आणि मेंदू जेव्हा शरीरावर वर्चश्व गाजवायला लागतो तेव्हा शरीर त्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण करू शकत. ज्याप्रमाणे तुटलेला आरसा पुन्हा नाही सांधू शकत त्याप्रमाणे एखादी सांध्याला झालेली दुखापत नेहमीच कमकुवत राहते. त्याची बोटं टेप मध्ये गुंडाळलेली असतात. बाह्य दुखापत टेप ने झाकू शकतो पण दुखावलेले स्नायू किंवा tissues, ना टेप ने झाकू शकत ना कोणतं मलम आराम देत. पण ह्यातली एक ही गोष्ट खेळताना त्याच्या चेहऱ्यावर येत नाही, खेळताना फक्त मेंदू त्याला सूचना करत एखाद्या कुशल सारथ्य प्रमाणे शरीराला ड्राईव्ह करतो. वेदना फक्त आतमध्ये दबलेल्या राहतात. त्याचं शरीर वेदनांना कदाचित शरण जाईल ही पण  कणखर मनामुळे तो समोरच्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडतो.

आता फेडरर आणि नदाल दोघेही कदाचित त्यांच्या कारकिर्दीच्या मावळतीकडे आहेत (वय नदालचा प्लस पॉईंट आहे , पण शरीरावर पडलेल्या अतिरिक्त ताणामुळे ते किती साथ देईल सांगता येत नाही). अशातच त्यांच्यातल्या रायवलरिच्या इतिहासात अजून एक धडा लिहिला गेला असता नुकत्याच संपलेल्या विम्बल्डन मध्ये. दोघेही व्यवस्थित फॉर्म मध्ये होते आणि अंतिम सामना त्या दोघातच खेळवला जाईल असं वाटत होतं पण फेडरर चवथ्या फेरीत बाद झाला तर नदाल उपांत्य फेरीत. पण उपांत्य फेरीत बाद होण्याआधी तो विम्बल्डनच्या इतिहासातला अजून एक उत्कृष्ट सामना खेळूनच बाहेर गेला, त्याच्या स्वभावाला साजेसं शेवटपर्यंत निकराने लढून. नियतीने ह्या वेळेस जरी त्यांचा सामना होऊन नसेल दिला तरी त्यांच्या आयुष्याची गाठ मात्र कायमची घालून दिलीय. टेनिसच्या इतिहासात त्यांचं नाव एकत्र घेतलं जाईल, त्यांचे सामने स्पोर्ट्स वाहिन्यांवर क्लासिक म्हणून दाखवले जातील. फेडरर २०१७ ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतर म्हणलं होता की ही फायनल बरोबरीत सोडवण्यास मी आनंदाने संमती दिली असती. फेडररने नादालच्या खेळास ही दिलेली दादच म्हणावी लागेल. पण ज्याने नदालची चिकाटी आणि हिम्मत पाहिलीय त्याला माहित असेल की जर टेनिस मध्ये बरोबरी हा पर्याय असता तर नदाल कदाचित टेनिस खेळला नसता. विजय हा एकमेव मार्ग आहे आणि लक्ष्य ही नदालसाठी.

तळटीप - नादालची वृत्तीच कुठेतरी कोहली मध्ये असल्यासारखी वाटते आणि म्हणूनच नदाल इतकाच मे कोहलीचाही प्रचंड फॅन आहे.