Tuesday, 11 September 2018

केनियन सफरनामा - अनपेक्षित दिवस भाग १

मसाई मारातल्या आमच्या (म्हणजे आम्ही दोघं, एक बंगाली कुटुंब आणि १ बांगलादेशी, १ पाकिस्तानी आणि १ श्रीलंकन अशा ३ मुली) जंगल सफारी झाल्या होत्या आणि बऱ्यापैकी मनासारखे प्राणी बघून झाले होते. बऱ्यापैकी म्हणतोय कारण पुन्हा मानवी मन!!!! कितीही काही झाले तरी अजूनची हाव संपत नाही, त्यातून सिंहाने शिकार करताना, चित्ता अगदी जवळून, आयाळ असलेले सिंह, बिबट्या वगैरे वगैरे बाकीच होतं. असो. तर आम्ही मसाई माराच्या जंगलातून सकाळी लेक एलमेंटेटाकडे निघालो. आजचा मुक्काम तिथे असणार होता. लेक एलमेंटेटा हे फ्लेमिंगो पक्ष्यांचं निवासस्थान आहे असे सांगण्यात आले होते आणि ते अंडीही तिथेच घालतात असे सांगितले होते. जाता जाता वाटेत लेक नैवाशाला भेट देऊन, तिथे बोटींग करून तिथले पाणपक्षी आणि हिप्पो बघून  लेक एलमेंटेटाला जेवायला पोहोचायचे होते.

आमची मसाई मारा सफारी बऱ्यापैकी यशस्वी झाली होती (मानाच्या ५ प्राण्यांपैकी ४ दिसले होते म्हणजे यशस्वी म्हणायला हरकत नाही) त्यामुळे आमची गाडी निघाल्या निघाल्या ड्राइव्हर कम गाईडने आधी वचन दिल्याप्रमाणे  jambo bwana हे गाणे आमच्या कडून म्हणवून घेत होता. हे गाणे म्हणजे केनियन  पॉप प्रकारातील स्वाहिली भाषेतील गाणे आहे आणि केनया मध्ये प्रत्येक हॉटेल मध्ये प्रवाशांचे सांगत करण्यासाठी म्हटले जाते. गाण्याचा साधारण अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या केनिया मध्ये आला आहेत तुमचे स्वागत आहे आणि आता कसलीच काळजी करण्याचे कारण नाही (गाणं आणि त्याचे शब्द आणि अर्थ ह्या  लिंक मध्ये https://youtu.be/uQjUlktCDAE). हे गाणे आम्हीही तितक्याच आनंदाने म्हणत होतो कारण आम्हाला कुठे माहित होते की आमचा उर्वरित दिवस काळजी करण्यातच जाईल. एकंदरीतच हसत खेळत आमची सफर सुरु होती.  वातावरण अगदी दिल चाहता है गाण्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे होते,
'जहा रुके हम, जहा भी जाए
जो हम चाहे, वोह हम पाए
मस्ती मे रहे डूबा डूबा हमेशा समा
हमको राहो मे यूही मिलती रहे खुशिया'
Happy We .. Singing Hakuna Matata

मसाई माराहून लेक एलेमेंटेटाला जायला साधारण ५-६ तास लागतात आणि केनिया आपल्यासारखाच मागासलेला (किती वर्ष स्वतःला विकसनशील म्हणवून घ्यायचे विकसनशीलतेची एक ही खूण दिसत नसताना) देश असल्याने रस्ते आपल्यासारखेच आहेत. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न तिथेही बराच भेडसावत असतो. साधारण ३- ३.५ तास प्रवास केल्यावर आम्ही एका पेट्रोल पम्पवर पेट्रोल भरायला थांबलो आणि पुढे अर्धा तास प्रवास झाल्यावर आम्हाला जाणवले की गाडी म्हणावी तशी पळत नाही. म्हणजे जेमतेम २०-३० kmph ह्या स्पीडने जात होती. रस्त्यावरचे हेवी कंटेनर्स अन ट्रक्स ही आमच्या तोंडात मारून पुढे जात होते. ड्रायव्हरला आम्ही विचारलं तसं पण तो हकुना मटाटा (काळजीच कारण नाही) म्हणून वेळ मारून नेण्याचा  प्रयत्न करत होता. आम्ही पिच्छाच सोडला नाही तेव्हा तो म्हणाला की भेसळयुक्त पेट्रोल भरलेय किंवा चुकीचं इंधन भरलेय त्यामुळे कदाचित असं होतंय.  पुढे जे गाव लागेल तिथे मी प्रॉब्लेम सोडवतो. म्हटलं कसं करणार? आहे ते इंधन काढून नवीन भरणार का? त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते कारण पैशाचा प्रश्न होता. ट्रॅव्हल कंपनीने दिलेले पैसे त्याला पूर्ण प्रवासभर म्हणजे आम्हाला नैरोबी विमानतळावर सोडेपर्यंत पुरवायचे होते. त्याला जाणीव करून दिली की चुकीचं इंधन असेल तर इंजिनवर लोड येऊन मोठं ब्रेकडाउन होऊ शकतं. तो जरा विचार करायला लागला आणि गाडी पळत नाही हे जाणवल्यावर तो म्हणाला की पुढे जे शहर लागेल तिथे गॅरेजमध्ये जाऊ. अजूनही लेक नैवाशा काय किंवा लेक एलमेंटेटा काय  कमीतकमी १-१.५ तासावर होते आणि आम्हाला गाडीत बसून जवळजवळ ४-४.५ तास होऊन गेलेले. आमच्या बरोबरची एक गाडी लेक नैवाशाला पोहोचून त्यांनी बोटींग सुरुही केलेले.

एव्हाना आमच्या गाडीतल्या सहप्रवाशांच्या पोटात आगडोंब उठलेला आणि त्यांचा संयम संपलेला. त्यांना चिंता एकाच गोष्टीची की हॉटेलच्या बफेची वेळ संपेल आणि पैसे घालवून जेवावे लागेल. मग सर्वानी चर्चा करून असे ठरवले की आधी लेक एलमेंटेटावर जाऊन उदरभरण करून मग लेक नैवाशाला जाऊ. पण प्रश्न एकच होता की गाडी पोहोचेल का?? कारण गाडी स्पीड पकडायलाच तयार नाही. आमच्या ड्राइव्हरने मग नैवाशा शहरात नेऊन एक टॅक्सी ठरवली आणि आमची गाडी गॅरेज मध्ये टाकली. टॅक्सी आम्हाला लेक एलमेंटेटाला हॉटेल मध्ये नेऊन सोडणार आणि ड्राइव्हर त्या टॅक्सिने परत येऊन दुरुस्त केलेली गाडी घेऊन येणार असा काहीसा जुगाड केला. ठरल्याप्रमाणे आम्ही लेक एलमेंटेटाला हॉटेल वर आलो तिथे आमचे स्वागत ही व्यवस्थित झाले पण ते आम्हाला म्हणत होते की आधी जेऊन घ्या मग चेक इन करा. कदाचित आम्ही उशिरा येणार ह्या हिशोबाने आमच्या रूम्स त्यांनी तयार नव्हत्या ठेवल्या.  पण शेवटी सगळ्या औपचारिकता पूर्ण करून त्यांनी रूमच्या चाव्या ताब्यात दिल्या कारण कोणी डायनिंग हॉल मध्ये जातच नव्हते. आमचा ड्राइव्हर आसू लगेच टॅक्सी वाल्याबरोबर हकुना मटाटा म्हणत गाडी घ्यायला गॅरेज मध्ये गेला. पण खरंच सगळ्या मटाटा संपल्या होत्या का?

लेक एलेमेंटेटा प्रथमदर्शनी छान वाटलं पण फ्लेमिंगो कुठेच दिसत नव्हते. हॉटेलच्या स्टाफ कडे चौकशी केल्यावर तो म्हणाला सकाळी येतील कदाचित. आमच्या रूम मधून खूप सुंदर लेकच दृश्य विहंगम दिसत होतं. निवांत दिवस घालवायला सुंदर जागा आहे. तळ्याकाठी निवांत पहुडत फोटोग्राफी करत छान दिवस घालवू शकलो असतो पण आता आम्हाला पक्षी निरीक्षण करायचे होते लेक नैवाशाला. त्यातून दुसऱ्या गाडीतले प्रवासी जेवताना आले आणि त्यांनी लेक नैवाशा चांगले आहे असा निर्वाळा दिला. त्यांनी असं म्हटल्याबरोबर आम्हाला आता पक्षी निरीक्षण करायचेच होते (आम्ही आणि बंगाली कुटुंब). मुली सुरवातीला नाही म्हणाल्या होत्या पण मध्ये जरा आराम झाल्यावर त्याही यायला तयार झाल्या. तसंही पॅकेज मध्ये आहे ते सगळे वसूल करावं असा एक अट्टाहास असतोच.

क्रमशः

केनियन सफरनामा - एक अनपेक्षित दिवस भाग २

केनियन सफरनामा - अनपेक्षित दिवस भाग २

गाडी अजून ही दुरुस्त झाली नव्हती पण आसू त्याच्या कंपनीचीच दुसरी गाडी घेऊन आला आणि ड्राइवरही. लेक नैवाशा वरून परत येईपर्यंत त्याची गाडी दुरुस्त होईल आणि ते मध्ये वाटेत नैवाशा टाउनमध्ये गाडी आणून देतील आणि आम्ही गाडी बदलू असं काहीसं त्यांचं ठरलेलं (आणि हा सगळं खर्च आसू करणार होता, आमच्या कडून त्याला काही अतिरिक्त कमाई आणि टीप मिळेल ह्या आशेवर). दुपारचे ३.३० वाजले होते आणि आसू अजून जेवला नव्हता आणि त्या हॉटेलला सांगून ही त्यांनी त्याच्यासाठी पार्सल तयार नव्हतं ठेवलं पण तो ठरवल्या प्रमाणे न जेवता आमच्या बरोबर आला.नैरोबी - मम्बासा ह्या शहरांना जोडणारा महामार्ग असल्याने बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं रस्त्याला आणि त्यातच चुकीच्या लेन मधून गाडी पुढे काढण्याच्या प्रयत्नात एका ट्रकचा अपघात झाला. रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी वाढली पण आमच्या सुदैवाने म्हणा आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही, आम्ही १० एक मिनटात तिथून निघून पुढे गेलो. लेक नैवाशा बऱ्यापैकी लांब होते आणि नाही म्हणता म्हणता आम्हाला लेक वर पोहोचायला ५.३० झाले. १ तास बोटींग करून पक्षी निरीक्षण केले आणि बाहेर पडलो. लेक नैवाशा पेलिकन पक्ष्यांसाठी आणि हिप्पो साठी प्रसिद्ध आहे पण वातावरण ढगाळ असल्याने फार मनसोक्त निरीक्षण नाही करता आले. पेलिकन पक्षीही झाडावर येऊन झोपायच्या तयारीत चोच पंखात लपवून बसले होते. पिवळ्या चोचीचा करकोचा, पेलिकन आणि इजिप्शियन बदकं सुरेख रांगेत पोहताना दिसली. आसूच्या प्रयत्नाने एवढे तरी दिसले नाही तर दिवस आराम करण्यात हॉटेलवरच घालवायला लागला असता असं विचार केला आणि परतीच्या वाटेला लागलो.


 वाटेत एका पेट्रोल पंप वर आमची गाडी परत मिळणार होती तिथे आम्ही थांबलो.गाडी अजून काही आली नव्हती. पण आमच्यातल्या काही जणांना मॉल मध्ये जायचे असल्याने आणि वाटेत ट्रॅफिक ही असल्याने आसूने आमच्यासाठी ७ बाईक्स  करून दिल्या आणि आम्हाला मॉल मध्ये जाण्यास सांगितले . गाडी मिळताच तो मॉल मध्ये येऊन आम्हाला भेटणार होता (केनिया मध्ये बाइक्सचा वापर रिक्षांसारखा पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी होतो).
केनियाच्या गल्ल्यांमधून बाईकने जाताना मजा  आली. कधी स्वप्नात ही विचार नव्हता केला केनिया मध्ये बाईक वरून फिरू म्हणून. सगळे एकत्रच होतो आणि अंतर ही फार नव्हते, रस्त्यांवरून जाताना आम्हाला बाईक्स वर बघून स्थानिक लोक आणि लहान मुलांना जरा जास्ती उत्सुकता वाटत होती. मॉल मधली खरेदी वगैरे झाली, आसूही गाडी घेऊन ठरल्या वेळेप्रमाणे आला आणि मुख्य म्हणजे त्याचीच गाडी घेऊन आला. साधारण ८ वाजत आले होते.

प्रस्थान करतानाच जाणवलं की आता रस्त्यावर वाहनांची लांबलचक रांग लागलीय. स्ट्रीट लाईट्सचा आपल्यासारखाच प्रश्न म्हणजे महामार्गावर ही नाहीत. मोठ-मोठे ट्रक्स आणि कंटेनर्स ह्यांच्या मध्ये आमची टुरिस्ट व्हॅन. आसूने अजून कोणता मार्ग आहे का हे ढुंढाळून पाहिले पण पर्यायी मार्ग कच्ची सडक प्रकारचे होते आणि आजूबाजूला मदतीला काही नाही किंवा कोणीच नाही. जंगल म्हणावे तर तसा भाग नव्हता पण अगदीच अंधारी रास्ता आणि निर्मनुष्यही. म्हणजे वन्य प्राण्यांची भीती वगैरे असं काही नव्हतं पण वन्य प्राण्यांपेक्षा भयानक अशा मनुष्य प्राण्याची भीती होती. आसूला स्वतःलाही तो पर्याय फार सुरक्षित वाटला नाही. केनियामध्ये नैरोबी सारख्या शहरातही बंदुकीच्या धाकाने लुटतात असे ऐकून होतो आणि असा प्रवास करणे म्हणजे तर माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखा प्रकार. त्याने असे म्हटल्यावर आम्ही काही सांगण्याचा प्रश्नच मिटला. ती  वाहनांची रांग बघून अजून ३-४ तास तरी बाहेर पडू असे वाटत नव्हते. साधारण १५-२० मिनीटांनी आसूला काय वाटले कुणास ठाऊक पण त्याने गाडीतून बाहेर पडून समोर एक हॉटेल दिसतेय तिथे तुम्ही बसा असे सांगितले. आम्ही आत्तापर्यंत सगळे आसूवर सोडून दिलेले कारण वाहनांची लांबच लांब रांग आणि गाडीत किती वेळ बसणार हे प्रश्नच होते. हॉटेल कसले बार आणि परमिट रूमच होते ते. पण तो आग्रही होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्या मोठ्या कंटेनर्स किंवा ट्रक ड्राइवर ह्यांचा कोणाचाच भरवसा देता येत नव्हता. त्यांना माहित होते की हे पर्यटक आहेत म्हणजे त्यांच्या कडे पैसे आणि किमती ऐवज असणार, कोणी बंदूक काढून लुटले तर कळणार ही नाही. मी तर मदत करूच शकणार नाही आणि कोणी मदतीला येण्याची शक्यता कमीच. आणि त्यातून रस्त्यावर अंधार म्हटल्यावर कोणी काय केलं काय कळणार?  त्याच्या ऐवजी हॉटेल मध्ये म्हणजेच बार मध्ये तुम्ही सुरक्षित असाल असे त्याचे म्हणणे पडले. प्राप्त परिस्तिथीत ते योग्य ही होते. त्याने तिथल्या मॅनेजरला विनंती करून बारच्या वरच्या मजल्यावर बसण्यास नेले. वर एखाद्या टिपिकल बारचे उदासीनतेने भरलेले वातावरण आणि ती उदासीनता अधिकच गहरी करणाऱ्या डिम लाईट्सचा अंधुकसा प्रकाश. आम्ही बसलेलो तिथे नशिबाने फार कोणी गिऱ्हाईक नव्हते. वरून खालच्या ट्रॅफिक कडेही लक्ष ठेवता येत होते.  आसूने मधल्या वेळेत त्याच्या कंपनीला फोन करून सांगितले ट्रॅफिक मध्ये अडकलोय ते आणि हॉटेल मध्ये सांगून ठेवले की उशीर झाला तर आम्ही जेवायला येऊ पण ९.३० झाले तरी रांग काडीमात्र हलली नाही तेव्हा आम्ही तिथेच जेवायचा निर्णय घेतला.
In Bar & Restaurant - Still Smiling


जेवताना आम्ही आसूला प्रश्नांचा मारा करून भंडावून सोडले ज्याची उत्तरं त्याच्या कडेच काय कोणाकडेही असण्याची शक्यता नव्हती. पण त्याचा मेंदू दिवसभराच्या त्रासानेही अजून काम करत होता. त्याच्या डोक्यात आमच्या सुरक्षिततेचिषयीच विचार चालू होते. मला मात्र आम्ही हॉटेलला पोहोचून आमचे सामान घेऊ शकू की नाही की उद्या इथूनच एअरपोर्टला जावे लागते? असे सारखे वाटत होते. आसूने आता टुरिस्ट कंपनीलाही सांगितले होते आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्याही लक्षात आले होते.  मध्ये १-२ वेळा त्या टुरिस्ट कंपनीचेही  फोन  आले आणि ते चौकशी करून धीर देत होते. आम्ही ७ जण एकत्र असल्याने भीती अशी फार वाटत नव्हती किंवा कोणी फार पॅनिक नव्हते झाले. त्यामुळे गप्पा - टप्पा चालू होत्या आणि विषय ही वातावरणाला साजेसा सुपर नेचरल गोष्टी किंवा त्याचे अनुभव असाच होता. पण गणित वेळेशी होते आणि काही झाले तरी वेळेवर कोणाचाच कंट्रोल नसतो.

त्या बायकर्सना गाठून त्यांच्या बरोबर जावे का हा प्रश्न आता डोक्यात यायला लागला. सुरवातीला सगळ्यांनीच तो पर्याय नाकारला होता कारण सोप्पे होते १ तास बायकर्सबरोबर म्हणजे अपरिचित व्यक्तीबरोबर ते ही अंधाऱ्या महामार्गावरून प्रवास. कितीही म्हटले तरी ७च्या ७ जण १ तास एकत्र राहण्याची शक्यता कमीच आणि आमच्या बरोबर ज्या मुली होत्या त्यांना हा पर्याय सुरक्षित वाटत नव्हता. त्यात वातावरण ही थंड होते आणि आमच्याकडे जॅकेट्सही नाहीत.  परत वाऱ्याची भर म्हणजे १ तासात पूर्ण गारठून हाडं आखडून गेली असती. पण जस जशी रात्र वाढायला लागली तस तसा तो पर्याय पुन्हा डोक्यात घोळायला लागला आणि आता मुलीही कशाबशा तयार झाल्या होत्या. पण दुर्दैवाने किंवा आमच्या सुदैवाने म्हणा कोणी ही बायकर्स आता यायला तयात नव्हते. मग आसूने त्या हॉटेल मध्ये झोपता का असा पर्याय दिला आणि खोल्या बघून घ्या. पटल्या तर इथेच झोपा, मी कंपनीशी बोलून त्यांची संमती घेतो असे सुचवले. पण खोल्या कसल्या परमिट रूमच असल्याने त्या पटण शक्यच नव्हतं.

आता जवळ जवळ ११ वाजले होते आणि आता मात्र पेशन्स संपत होते.  दुसऱ्या दिवशी जे आम्ही ठरवले होते ते जिराफ सेन्टर,  मम्बा व्हिलेज वगैरे काही बघता येते की नाही की सरळ एरपोर्टलाच जावे लागते ह्या विचाराने बैचेन व्हायला झाले. परत एकदा सगळ्यांशी चर्चा केल्यावर बाइक्ससाठी पुन्हा प्रयत्न  करूया असे ठरले. कारण ट्रॅफिक सुटण्याची काहीच चिन्हं नव्हती, दुसऱ्या देशात असा एखादा प्रसंग गुजरणे म्हणजे कठीणच आणि तो देश केनियासारखा देश असेल तर अजूनच कठीण. व्यवस्था नावाचा काहीच प्रकार नाही किंवा ते ट्रॅफिक सोडण्यासाठी काही प्रयत्न होताहेत ह्याची काहीच माहिती आमच्यापर्यंयत नाही. आसू काही बाइक्स मिळतात का पाहायला गेला आणि परत येऊन सांगायला लागला की आता १० मिनटात ट्रॅफिक सुटेल, त्यामुळे आपण वाट बघू.  सुरवातीला आमचा विश्वास बसला नाही. आम्हाला वाटले की आसूला आम्हाला बायकर्स बरोबर पाठवायचे नसावे म्हणून तो असाच काही तरी सांगतो आहे आमचे मनोधैर्य राखायला.  पण सुदैवाने तो म्हटल्याप्रमाणे १५ मिनिटात ट्रॅफिक सुटले.  ११-११.१५ च्या सुमारास हळू हळू निघालो आणि ११.३० च्या सुमारास बराचसा मार्ग मोकळा झाला. साधारण १२ ला आम्ही हॉटेल वर पोहोचलो. तिथे तो टुरिस्ट कंपनीचा मॅनेजर आलाच होता. त्याने ख्याली खुशाली विचारली आणि हॉटेलच्या स्टाफला जेवण वाढायला सांगितले पण आमची खायची इच्छा नव्हती, जेवण ही गरम करेस्तोवर वेळ लागणार होता म्हणून रूम वरच पार्सल पाठवायला सांगितले. लेक एलेमेंटेटावर आम्हाला २ दिवसाच्या जंगलातील दगदगीने आराम मिळावा म्हणून ठेवण्यात आले होते पण कसला आराम नि कसलं काय आम्हचा मुक्काम तिथे जेमतेम रात्रीच्या झोपेपुरताच झाला.

आम्हाला एरपोर्टला घ्यायला आलेला चार्ल्स म्हणाला होता की आज एरपोर्टला ट्रॅफिक नाहीये म्हणून पटकन सुटतोय नाही तर ५-६ तास ही अडकून रहावे लागते. तेव्हा विश्वास नव्हता बसला पण आता अनुवभवले होते आणि ट्रॅफिकची धडकीच भरली होती.

ट्रॅफिक कशामुळे होते हे सांगायचेच राहिले का? त्या वेळेस आम्ही १० मिनिटात सुटलो होतो पण तेच ट्रॅफिक नंतर एवढे वाढले की जवळ जवळ ६ तास फक्त एक दिशा मार्गच चालू ठेवण्यात आला होता आणि दुर्दैवाने तो मार्ग आमच्या हॉटेल च्या विरुद्ध दिशेचा होता. पण तिथल्या लोकांचं कौतुक वाटला की ट्रॅफिक मध्ये अडकल्यावरही कोणी विरुद्ध दिशेने गाड्या घालण्याचा प्रयत्नही नाही केला (त्या बाबतीत त्यांना आपल्यापेक्षा पुढारलेले म्हणावे का?). पण आता आम्हाला आमच्या ट्रिप्स मध्ये येणाऱ्या ह्या रोमांचक अनुभवांची इतकी सवय झाली आहे की त्या शिवाय आमची ट्रिप पूर्णत्वास गेल्यासारखेच वाटत नाही.

नंतर सहज डोक्यात विचार येत होते की अशा परिस्थितीत आम्ही एक-एकटे सापडलो असतो तर कसे तोंड दिले असते. आम्ही आणि बंगाली कुटुंबच जास्ती उत्साही असल्याने आम्हीच अशा परिस्थिती सापडायची शक्यता जास्ती होती पण तरीही, जो संयम आम्ही बाळगला किंवा परिस्थिती ज्या प्रकारे शांत चित्ताने हाताळण्यात आली त्याचे कारण हे कदाचित आमच्या एकत्र असण्याला होते. संकटात आपण एकटेच नाही आपल्याबरोबर बाकीचेही आहेत ही भावनाच कदाचित जास्ती सुखद असावी. आणि आसू, एक सामान्य माणूस विपरीत परिस्थिती किती शांततेने हाताळू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या कर्तव्यवृत्तीची परिसीमा म्हणजे सकाळी मारा मध्ये नाश्ता केल्यानंतर तो थेट रात्री त्या बार मधेच जेवला जेव्हा आम्ही बऱ्यापैकी सुरक्षित आहोत ह्याची काळजी घेतली गेल्यावर. त्याच्या ह्या वृत्तीला सलाम.

कैसा अजब यह सफ़र है, सोचो तो हर इक ही बेखबर है
उसको जाना किधर है, जो वक़्त आये, जाने क्या दिखाए??? 

एकंदरीतच दिल चाहता है च्या गाण्याप्रमाणे सुरु झालेला त्या दिवसाचा प्रवास संपला देखील तसाच!!!!!


Link for Photos of Lake Naivasha

Link for Photos of Lake Elemntaita