Monday, 21 November 2016

जिवाची दुबई - भाग ४ (अंतिम भाग)

बरेच दिवस झाले दुबई डायरी विषयीचे क्रमशः पूर्ण करायला काही मुहूर्तच लागत नव्हता पण काल दुबई कॅनॉलच्या उदघाटनाविषयी वाचलं आणि परत दुबई ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या. दुबई कॅनॉलचं बांधकाम आमच्या सिटी टूर मध्ये पाहिलं तेव्हा वाटलं होतं की लॉन्ग टर्म प्रोजेक्ट आहे ते ३ एक महिन्यात पूर्ण करून पर्यटकांसाठी खुले केले गेले. हुकूमशाही असल्याचा एकमेव फायदा असावा हा की तुमची कामं  ठरल्याप्रमाणे आणि ठरल्या वेळेत करून घेता येतात. उगाच कोणी केजरी सारखे विरोधक (जे फक्त विरोधासाठी विरोध करतात) किंवा पर्यावरण प्रेमी गळे नाही काढू शकत. इस्लामी देश असल्याने नाही म्हणायला मुल्ला/उलेमा (उर्फ धर्मगुरू) असतात पण तेथे त्यांना  फार आवाज नाही राहिलाय बहुदा अन्यथा दुबई ची एवढी प्रगती झाली नसती .असो आपला तो काही विषय नाही सध्या !
Aqua venture

तर शेवटच्या दिवशी आम्ही aqua venture ह्या दुबईच्या वॉटर पार्क मध्ये गेलो होतो त्याची तयारी आदल्या संध्याकाळ पासूनच चालू होती म्हणजे costume वगैरे. एवढे केल्यावर ही तिथे आम्हाला पैसे टाकावे लागलेच आणि थोडे थोडके नाहीत तर तब्बल २ हजार रुपये केवळ नायलॉनच्या हाल्फ पॅंट साठी कारण हले आदल्या दिवशी आम्ही खरेदी केली होती पण ट्रायल नव्हती घेतली हो . मग काय ..आलीया भोगासी . असो तर हे वॉटर पार्क अगदी धमाल आहे. त्याची रचनाच अफलातून आहे, म्हणजे ह्या वॉटर पार्क मध्ये काही नाही अस नाही. वॉटर पार्क च्या सुरवातीला लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्लाईडस आहेत आणि तिथेच लहान मुलांसाठी बीच सारखं केलाय आणि तिथेच पालकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणून रिकलाइनर आहेत. समोरच मोठ्यांसाठी बीच, कॅबाना  आणि रिकलाइनरची व्यवस्था केली आहे. मनमुराद तिथे पहुडून वातावरणातल्या उत्साहाचा आनंद उपभोगू शकता. तिथेच स्लाईडस साठीच्या ट्यूब्स  मिळतात आणि तिथेच वॉटर पार्कच्या खऱ्या अनुभवाची सुरवात होते. पहिल्यांदाच सामोरा येतो टॉवर ऑफ नेपचून.

टॉवर ऑफ नेपचून म्हणजे multi स्लाईडस  असलेला एक तीन मजली टॉवर आहे आणि प्रत्येक मजल्यावर २ अशा एकूण ६ स्लाईडस आहेत. पहिल्या मजल्यावरच्या स्लाईडस एवढ्या थ्रिल्लिंग नाहीत पण दुसऱ्या मजल्यावरच्या स्लाईडस पासून थ्रिल ला सुरवात होते. दुसऱ्या मजल्यावर एक शार्क अटॅक म्हणून एक स्लाईड आहे. ही स्लाईड खूप अंधारी आणि बरीचशी नागमोडी आहे आणि मध्ये मध्ये वॉटर जेट्स ने पाण्याचा मारा करतात त्यामुळे खूप मजा येते  आणि ही स्लाईड शेवटी २ मोठ्या फिश टँक्स च्या मधून जाते आणि आजूबाजूला शार्क, स्टिंग रे वगैरे मोठे मोठे मासे दिसतात. खूप छान वाटतं ...तिसऱ्या मजल्यावरची एक वॉटर कोस्टर स्लाईड आहे  जिथे तुम्ही बऱ्याच वेळा वर खाली होता आणि खाली येताना पोटात मोठा गोळा येतो आणि ही स्लाईड ही एका टनेल मधून पास होत कॅनॉल मध्ये एक्सिट होते.
Shark Attack

Tower of Neptune & Leap of Faith Slide
इथल्या प्रत्येक स्लाईडचा एक्सिट  अक्ख्या aquaventure मधून वाहणाऱ्या कॅनॉल ज्याला lazy  river असे नाव आहे त्यात होतो आणि त्या lazy river  मध्ये ट्यूब्स मध्ये बसू आरामात वाहत जाण्याचा अनुभव खासच ...परत त्या रिव्हर/कॅनॉल मध्ये रॅपिड/torrent /wtarefall असे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत जे त्या रिव्हर राईडस ची मजा वाढवतात आणि त्या मुळे स्लाईडस मध्ये गर्दी कमी होते.
View of Lazy River

 Serene & Calm Lazy River Passes through tunnels, Torrents , Wtarefalls etc. 


टॉवर ऑफ नेपचूनच वैशिष्ट्य म्हणता येईल अशी स्लाईड म्हणजे The Leap Of Faith ... जरी हा तिसरा मजला असला तरी त्याची उंची ९ मजल्याइतकी भरते ह्या स्लाईड च्या जवळ आणि जवळपास vertical drop आहे ही स्लाईड म्हणजे...माझी सुरवातीला हिम्मतच होत नव्हती कारण व्हर्टिगोचा त्रास नसला तरी उंचीची भीती वाटते मजला (म्हणूनच एवढा ग्रॉउंडेड असेन मी :) ) इथे बरीच मोठी रांग असते आणि जसे जसे पुढे सरकतो तस तशी जीवाची कालवाकालव वाढत असते, आणि उडी मारणारे खाली जाताना जीवाच्या आकांताने ओरडतात आणि ते ऐकून तर काळजाचं पाणी पाणी होत असतं..तरी ही कशी बशी हिम्मत करून पुढे जात होतो. रांगेत उभी असलेली लोकं ही मनातून घाबरलेली असतात पण दुसर्यांना मात्र चीअर अप करत असतात.. आमच्या जरा पुढे एक इंग्लिश फॅमिली होती , नवरा , बायको आणि मुलगी ... पहिले त्या बाईने उडी मारली , मग मुलीचा नंबर होता पण त्या मुलीची काही हिम्मत होईना, पण बाप्या मात्र तिला हिम्मत कर म्हणून सांगत होता, पण मुलगी काही तयार होईना ...रांगेतल्या लोकांनी मग तिला टाळ्या वगैरे वाजवून प्रोत्साहन दिले. मग ती वडिलांना म्हणाली तुम्ही आधी जा मग मी येते. त्या बाप्याने मात्र कमालीच्या सहजतेने उडी मारली, त्या मुलीने मग पुढची उडी मारली टाळ्यांच्या गजरात. त्या मुलीचे मला कौतुक वाटले. मी जर असतो तिच्या जागी तर वडिलांनी उडी मारल्यावर गपचूप रांगेतून बाहेर येऊन खाली निघून गेलो असतो.


Leap of Faith 

जस जसा आमचा नंबर जवळ येत गेला तसतसे आपण बाहेर पडावे की काय ही भावना बळावत गेली पण एकदाची हिम्मत करून त्या स्लाईडच्या गेट जवळ आलो , जरा त्या गार्ड शी बोललो आणि उसने अवसान आणत एकदाची दैवावर हवाला ठेवून मारली उडी.. एकंदर २० सेकंदाची स्लाईड आहे पण तेवढ्या वेळेत ढगात जाऊन आल्यासारखे वाटले. पहिल्या ३-४ सेकंदात तर बस्स हा शेवटचा श्वास असे वाटले, मग पाठीला त्या स्लाईडचा आधार मिळाला तेवढ्यात पाण्याचा मारा झाला आणि परत २-३ सेकंड सुन्न.आणि मग तो व्हर्टिकल ड्रॉप संपतो आणि ती स्लाईड आडवी होते पण  त्या आडव्या स्लाईड वर हि आपण वेगात पुढे जातो तो मोमेंटम असल्याकारणाने आणि काही कळायला लागत असताना स्लाईड संपत आपण पाण्यात .आणि आत्तापर्यंत सावरायला वेळ मिळालेला नसल्याने पाण्यात ही आपण व्यवस्थित पडत नाही, मग इथेही पाणी नाका तोंडात आणि जीव शरीराप्रमाणेच गटांगळ्या खात असतो. पण ते क्षणिकच कारण तो पूल काही फार काही खोल नाही, मग सावरून स्वतःला gather  करू शकतो. हे सगळं २०-२५ सेकंदात घडतं. अक्षरशः थ्रिल्लिंग!!!अजून ही ती ३० सेकंड डोळ्यासमोरून जात नाहीत. परत मला कोणी ती उडी मारायला सांगितली तर मी तयार होईन काय शंकाच आहे.आमच्या कुटुंबाने ही उडी मारली. त्या आमच्या पेक्षा काकणभर अशा adventure sportsच्या बाबतीत सरस आहेत. त्यांना skydive आणि bungy jumping ही करायचीय.ते तर माझ्याकडून कदापि शक्य नाही

एवढ्या स्लाईडस, रिव्हर राईडस करेस्तोवर बराच वेळ गेला नाही म्हटलं तरी ३-४ तास. आता तहान - भुकेची जाणीव व्हायला लागली पण आमच्याकडे wallet नव्हतं. ते लॉकर मध्ये ठेवलेलं  आणि लॉकर आम्ही २ फॅमिली मध्ये मिळून एक घेतलेलं आणि ते त्यांच्या नावावर डिजिटली register असल्याने  मी काहीच करू शकत  नव्हतो. प्रोबेबल ठिकाणी त्यांचा शोध घेतला, customer care ला ही विनंती करून पहिली  पण no means no एवढंच ऐकायला मिळालं. आता एवढ्या मोठ्या aqua venture मध्ये कुठे शोधणार? मोबाईल्स ही लॉकर मधेच म्हणून कॉल्स पण करता येईना. अगदी तहान भुकेने व्याकुळ नव्हतो झालो पण हवं होतं. समोर एवढं पाणी पण पिऊ शकत नव्हतो, कोणा कडे मागावंतर मागणार कसं हा प्रश्न, शेवटी शॉवरच पाणी पिऊन तहान भागवली आणि The Tower Of Poseidon कडे निघालो. The Tower Of Poseidon हा टॉवर ऑफ नेपचूनचा मोठा अवतार..टॉवर ऑफ नेपचून पासून पुढे Tower Of Poseidon कडे नेण्यासाठी बॅटरी कार्स आहेत..Tower Of Poseidon  मधली स्लीथेरीन सोडली तर बाकीच्या सगळ्याच स्लाईडस भन्नाट आहेत..स्लीथेरीन ही नॉर्मल स्लाईड सारखी आहे पण तिथे २ स्लाईडस शेजारी शेजारी आहेत आणि तिथे स्लायडिंग ची वेळ मोजता येते...एक प्रकारे शर्यतच आहे म्हणा ना!

The Tower Of Poseidon
Zoomerengo
Zoomerengo

झूमरांगो म्हणून एक फॅमिली स्लाईड आहे. एकावेळी ५-६ जण त्या टब मध्ये बसू शकतात..सुरवातीला साधारण कोस्टर स्लाईड सारखी असणाऱ्या ह्या स्लाईडमध्ये आपण थोडे सैलावतो न तोच एकदम व्हर्टिकल ड्रॉप येतो..अनपेक्षितरित्या पडत असताना पोटात मोठा खड्डा पडतो आणि तुमच्याकडे ओरडण्याशिवाय अजून काही पर्याय नसतो तेवढ्यात झोपल्याप्रमाणे टब स्लाईडच्या दुसऱ्या टोकाला उंचावर जातो आणि परत तिथून व्हर्टिकल ड्रॉप...अशी काही धमाल आहे ह्या स्लाईड मध्ये की बस्स!.अनुभवायलाच  हवी.. आम्ही २-३ वेळा ह्या स्लाईड चा अनुभव घेतला...मग Poseidon’s Revenge कडे आमच्या सौंनी मोर्चा वळवला... मी तर हे करणारच नव्हतो...Poseidon’s Revenge मध्ये चेंबर मध्ये बंद करतात आणि पायाखालची प्लेट/फ्लोअर काढून घेतात .चेंबर मधून डायरेक्ट खाली..पायाखालची जमीन सरकते म्हणजे हे काय शब्दशः अनुभवायचे असेल तर आणि तरच ह्या स्लाईडच्या वाटेल जावे.शक्यच नाही असं काही करणं!!..आमचे कुटुंब २-३ वेळा चेंबर मध्ये प्रवेश करते झाले पण ती प्लेट काढून घेण्याच्या काही सेकंड्स आधी बाहेर पडले. नाही हो साध्या सुध्याच काम नोहे हे.. आम्हाला तरी नंतर २-३ लोकं ज्यांनी leap of faith आणि Poseidon’s Revenge ह्या दोन्ही स्लाईडस केल्या ते बोलले, 'leap of faith जास्ती कठीण आहे, ती तुम्ही केलीत आणि ह्याला काय घाबरता?' पण नाही आम्ही पुढे नाही सरसावलो..मग मी परत ती झेपेल अशी स्लीथेरीन स्लाईड वरून आलो आणि सौंनी झूमरांगो  सारखी ऍनाकोंडा स्लाईडची मजा घेतली.
 Poseidon’s Revenge - The Chamber where it begins


The Chamber gets locked & Plate/Floor beneath the feet slides &journey begins
The Slide is passing through the floors & as 1 can see its almost vertical Drop


आता परत आम्ही लेझी रिव्हर मध्ये पडून फक्त प्रवाहाबरोबर वाहण्याच्या विचारात होतो कारण पूर्ण  गळपटलो होतो. तहान व्यवस्थित भागली नव्हती आणि भूक आता मरायच्या मार्गावर होती तेवढ्यात ती फॅमिली आम्हाला शोधत शोधत The Tower Of Poseidon कडे आले आणि आमच्या खाण्या पिण्याची सोया झाली. एक नमूद करावेसे वाटते म्हणजे काहीही हेवी फूड त्यांनी ठेवले नाहीये. सगळॆ हलके पदार्थ आणि liquid म्हणजे Juices, कोल्डड्रिंक्स आणि बर्फाचा गोळा , Ice cream वगैरेचे स्टॉल्स म्हणजे व्यवस्थित हे पदार्थ घेऊन dehydration होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल. उगाच आपल्या रिसॉर्ट सारखे हेवी बुफ्फे घेऊन सगळीकडे रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या जाणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनीच घेतलीय. परत इस्लामिक देश असल्याने दारू उघड्यावर घेण्यास बंदी आणि येणारी लोकं ही व्यवस्थित असतात . उगीच चिप क्राउड येऊन लोकांचा रसभंग झालाय असं कुठे ही झाला नाही. परत चोख सुरक्षा व्यवस्था. पावलापावलावर गार्डस आहेत. लेझी रिव्हर च्या काठी दर १०० फुटावर गार्डस बसवलेत, त्यामुळे आपण एकदम निश्चिन्त असतो. Aqua venture चे वॉटर पार्क आणि आपले वॉटर पार्क तुलनाच नाही होऊ शकत.किंबहुना वॉटर किंग्डमला ही ह्यांची सर नाही.

आम्ही आता खाऊन पिऊन मग पुन्हा The Tower Of  Neptune कडे आलो. शार्क अटॅक वगैरे अशा २-३ स्लाईडस मधली मजा पुनस्श्च अनुभवली आणि लेझी रिव्हर मध्ये मनसोक्त वाहून घेतलं, लाटा अंगावर घेतल्या , रॅपिड मध्ये वेगाने वाहत गेलो , तरी बाहेर यावेसे वाटत नव्हते पण वेळेची गणितं शाळेत ऑप्शनला टाकली तर प्रत्यक्ष जीवनात काटेकोरपणे पाळावी लागतात. एका दिवसात aqua venture काही पूर्ण अनुभवता येत नाही. प्रायव्हेट बीच, शार्क सफारी, डॉल्फिन ऍडव्हेंचर वगैरे तर आम्ही ऑप्शनला टाकले होते. मग कपडे वगैरे बदलून लॉस्ट चेंबर aquarium ला धावती भेट दिली आणि  पाल्म अटलांटिस हे पंचतारांकित हॉटेल ही जमेल तेवढे पाहून घेतले आणि  पाल्म अटलांटिसच्या अद्भुत बेटावरून परत यायला निघालो,फक्त शरीराने , मन तर पुढचे कैक दिवस तेथेच घुटमळत होते.
The Magical World of Palm Atlantis 
Click @ link for more photos of Palm Atlantis Jhumeira Road & Palm Atlantis


पुढच्या दिवशी दुबईला राम राम करून ओमान कडे पुनश्च प्रस्थान केले पण परत दुबईच्या मायावी जगात जीवाची दुबई करायला यायचे असे ठरवूनच!!!! Dubai - Its Truly Connecting the World.

तळटीप - दुबईला जाताना एक दिवस aqua venture साठी खास राखून ठेवावा कारण कोणीच ट्रॅव्हल एजन्ट सहसा हे ऑफर करत नाहीत आणि आपण एका अद्भुत अशा अनुभवाला मुकतो !!!

Monday, 24 October 2016

खेल कबड्डी

जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया,
प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया

टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी .. कबड्डी हा आपण जगाला दिलेला खेळ पण आपल्या कडेच मागे पडत चालला होता (परदेश सारख्या एखाद्या सिनेमात स्वयंवर म्हणून हिरो हा खेळ खेळला होता . तेवढीच काय ती कबड्डीशी राहिलेली ओळख). प्रोकबड्डी लीगने ह्या खेळाला संजीवनी दिली आणि क्रिकेट इतका नाही तरी कबड्डी बऱ्यापैकी लोकप्रिय झाला.

माझी कबड्डीशी आत्मीयता साधारण शालेय जीवनापासून म्हणजे पाचवी - सहावी पासून आहे ..म्हणजे शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धात कबड्डी आणि खो-खो हे दोन सांघिक खेळ असायचे आणि ह्या खेळाचे विजेतेपद म्हणजे फुकटचा भाव खायला मिळायचा..त्यामुळे दर वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नापास कोण झालेय ह्याकडे आमचे लक्ष असायचे म्हणजे एखादा धटिंगण वगैरे नापास झाला असेल तर त्यास संघात सामील करून विजेतेपदाकडे डोळे लागायचे आणि असे दोघे तिघे एकदम गचकले तर बास, आमची गाडी हवेतूनच चालायची..मी कबड्डीच्या संघात नव्हतो कारण शाळेत असताना मी अगदी पाप्याचे पितर  होतो (पाप्याचे पितर कबड्डीत का चालत नाहीत हे थायलंडचे इंडिया-इराण ह्यांच्या बरोबरचे सामने पाहून कळले असेलच) पण चीअर लीडर म्हणून आपली खास ओळख होती.खास आमंत्रण असायचे तेव्हा अशा सामन्यांना  चीअरउप करण्यासाठी . तेव्हा चाळीत राहायचो आम्ही ...त्या चाळीच्या गच्चीवर बाकीच्या बऱ्याच गेम्स सोबत कबड्डीही चालायची ...लॉबी, हाल्फ लाईन, टच लाईन , बोनस लाईन असे काही नियम असायचे त्या खेळात , फक्त सर्विस आणि पकड एवढंच .पण त्यात ही खूप मजा वाटायची ..मग गच्चीच्या खालच्या मजल्यावरचे लोकं तक्रारी करायला लागले आवाजाच्या वगैरे आणि मग गच्चीवरचे खेळ संपले ..मग जवळच्या मैदानात आम्ही जायला लागलो पण तिथे एकमेव खेळ चालायचा क्रिकेट!!!

शाळा संपली तसं बाकीच्या बऱ्याच गोष्टींसोबत कबड्डीही संपली ...डिप्लोमाला फारसं आठवत नाही की कबड्डी असायची की नाही कारण तेव्हा मी हुशार मुलांच्या संगतीत होतो आणि क्रीडास्पर्धा पाहायला डोंबिवली वरून ठाण्याला येतील ही अशक्यकोटीतली गोष्ट.आणि  मी ही एकटा जायचा कंटाळा करायचो.

पुढे डिग्रीला क्रिकेट हाच वार्षिक स्पर्धांमधला marqee इवेंट होता (under-arm आणि over-arm) आणि त्या खालोखाल Volleyball. कबड्डीही असायची पण नावडतीचे पोर , त्यात आमच्या बॅचमध्ये कोणी कब्बडीपटू नसल्याने कोणी ढुंकून ही जायचं नाही कबड्डी सामन्यांना. कारण निकाल माहीत असायचाच.

त्यानंतर तर कबड्डी पार विस्मृतीत गेला. क्वचित पेपरच्या क्रीडा सदरात ओझरता उल्लेख असायचा..पण तो ही दुर्लक्षितच.अचानक कबड्डीने लक्ष वेधून घेतले ते आम्ही ऑफिसचे मित्र पिकनिकला जात असताना .नुकतीच प्रोकबड्डी लीग चालू झालेली .. टोनी दा ढाबा वर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो.टीव्ही वर कबड्डीचा सामना चालू होता ..यू मुंबा विरुद्ध कोणीतरी आणि फार उत्कंटावर्धक सामना झाला तो ..त्यात ज्या पॅशनने  ते खेळत होते व पॉईंट घेतल्यावरच त्यांचे सेलेब्रेशन ..वाह ..मजा आली बघताना..त्यानंतर मात्र प्रो कबड्डी लीग मी सतत फॉलो करतोय

प्रो कबड्डी लीग मध्ये एकापेक्षा एक भारतीय खेळाडू आहेतच पण इराण आणि कोरियाचे ही सर्वोत्तम खेळाडू आहेत.अशातच कबड्डी विश्वचषकाची घोषणा झाली आणि फार उत्सुकता वाढली,  संघ निवडीपासून ते पुढे draw आणि वेळापत्रक सर्वच बाबतीत. खरी उत्सुकता होती संघ निवडीची .कारण साधारण 100 उत्कृष्ठ खेळाडूंमधून 14 सर्वोत्कृष्ठ खेळाडू निवडायचे ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही भारतीय कबड्डी महासंघाने व्यवस्थित निवड केली होती .नाव ठेवायला जागा नव्हती . जगातल्या 6 खंडातले 12 संघ होते.surgical strike मुळे पाकिस्तानच्या  सहभागाबाबत मात्र खात्री नव्हती .शेवटी त्यांना काही स्पर्धेत थारा दिला गेला नाही.त्यांना बाहेर काढल्यावर ते सवयीप्रमाणे बरळलेच "कबड्डी विश्वचषक हा पाकिस्तानशिवाय विश्वचषक असूच शकत नाही". तरी आत्तापर्यंत झालेल्या 2 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते धडक मारू शकले नाहीत की 2014 सालच्या आशियाई गेम्स मध्ये ही  ते अंतिम फेरीत पोहोचले  नव्हते . आपल्याला खरं आव्हान होतं इराणचे.. 2014 सालच्या अंतिम सामन्यात ही त्यांनी वर्चस्व गाजवले होते ते ही इतपत की तेव्हाच आपला कर्णधार राकेश कुमार सामन्यानंतर म्हणाला देखील की हा सामना इराणनेच जिंकायला हवा होता आणि आता आपल्याला ह्या पुढे खरा धोका  असेल इराण कडूनच ! साहजिकच ते 2014 चा वचपा काढायला उतरले होते.आणि draw हे असे होते की इराण आणि आपण अंतिम सामन्यातच भेटलो असतो

स्पर्धेला सुरवात मात्र अनपेक्षित आणि सनसनाटी निकालाने झाली ..कोरियाने आपल्याला हरवले साधारण 36 मिनिट्स आपण आघाडीवर होतो पण शेवटच्या 4 मिनटात कोरियाने बाजी  पालटवली.आपण आघाडीवर असताना सामना किल नाही केला .आपण उगाच बचावात्मक पवित्रा घेतला ...आणि पहिल्या सामन्यात कदाचित अंतिम 7 जणांची निवड चुकली असावी .अजय ठाकूर हा रेडर बाहेरच होता किंवा जसवीर सिंग संघात असणे वगैरे .ह्या पराभवानंतर आपला पूर्ण संघ stunned झाला होता .त्यांचे चेहरेच सगळं काही सांगून जात होते .त्या पराभवानंतर मात्र आपला संघ  जखमी वाघाप्रमाणे चवताळून उठून अंतिम फेरी पर्यंत प्रत्येक संघाला दयामाया ना दाखवता दे माय धरणी ठाय करून सोडले. तिथे आपण पहिल्या सामन्यात हरल्याने इराण आपल्याला उपांत्य फेरीतच आडवा आला असता .पण त्यांना ही कदाचित आपण उपांत्य फेरीत नको असल्याने ते पोलंड विरुद्धचा सामना हरले असावेत (शक्यता  व्यक्त करतोय कारण पुरावे काही नाहीत)

अंतिम सामना मात्र खूपच उत्कंठावर्धक झाला . इराण बदलाच्या आगीत होरपळत होतेच आणि अंतिम सामन्याचे आपल्याला ही दडपण आले असावे ...त्या मुळेच पहिल्या सत्रात इराणने आपल्याला लोण देऊन आघाडी ही घेतली ..मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सकारात्मक सुरवात केली.अजय ठाकूर आणि तोमरने एक सो एक चढाया केल्या आणि आपला डिफेन्स ही कडक पकडी करत गुण मिळवायला  लागला .सुरजीत , सुरिंदर , संदीप ह्यांनी उत्कृष्ट पकडी केल्या आणि इराण वर दोनदा लोण चढवले आणि अप्रतिम असा comeback करत आपण इराणचे आव्हान 38-29 ने परतवून लावले आणि जीत ली दुनिया!!!








जाता जाता खेळाडूंविषयी थोडेसे :- 

अनुप कुमार (कर्णधार) :- Captain cool ही उपाधी खूप चपखल बसते.गेल्या 4 प्रो कबड्डीच्या seasons  मध्ये   त्याला एकदा ही desperate  झालेले पाहिलेले नाही ...game अचूक रीड करतो आणि खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरी करवून घेतो .माझा वैयक्तिकरित्या आवडता खेळाडू आणि भारतीय कबड्डीचा पोश्टर बॉय!!

अनुप कुमार 


सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर (डावा - उजवा कॉर्नर) - भारतीय कॉर्नरचे भवितव्य, ह्यांची जोडी एवढी डेडली आहे की बस्स. एकवेळ डॉन पकडला जाऊ शकेल पण ह्यांच्या पकडीतून सुटणे नामुनकीनआणि दोघांचा ताळमेळ खूपच अप्रतिम. त्यातून नाडाचा ankle hold एवढा प्रभावी  की HOLD IT LIKE NADA असेच म्हणावेसे वाटते.चिल्लर हा प्रो कबड्डी लीग मधला  सर्वात महागडा  खेळाडू अन  दोघे ही माझे आवडते!

नाडाचा Ankle Hold आणि मोहितचे कव्हर 


मोहीतचा Thigh Hold






अंतिम सामन्यातील नाडा आणि मोहितचे Super Tackle



प्रदीप नरवाल, अजय ठाकूर आणि राहुल चौधरी - पहिले दोघेही उत्कृष्ट रेडर.  प्रदीपने पाटणाला एक हाती विजेतेपद मिळवून दिले ह्या वर्षी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अजय ठाकूर विषयी माझे मत फारसे चांगले नव्हते आणि तो आमच्या arch rivals कडून खेळतो म्हटल्यावर तर शक्यच नाही. पण अंतिम सामन्याचा खरा शिल्पकार तोच! खास करून प्रदीप आणि राहुल चौधरी चालत नसताना पट्ठ्याने खरंच कमाल केली. राहुल चौधरीच खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि प्रो कबड्डीचा सगळ्यात  यशस्वी  रेडर ही पण मला ओव्हररेटेड वाटतो.

Rahul Chaudhary in Action


Ajay Thakur Celerating Crucial Point
Pradeep Narwal - Raid Machine

मनजीत चिल्लर, संदीप नरवाल (all- rounders) आणि सुरजीत (डिफेंडर) - संदीपने कॉर्नर म्हणून चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात आपले गुणांचे खाते त्यानेच उघडले होते .डॅश मध्ये ही कडक आहे . मनजीतचा तर खूप दबदबा आहे. Thigh hold आणि block ही त्याची वैशिष्ट्ये.अंतिम सामन्यात दुर्दैवाने तो चालला नाही पण अशा वेळी चालला तो सुरजीत विश्वचषकातील unsung हिरो .अंतिम सामन्यातील त्यांच्या पकडी बघण्यासारख्या होत्या.

Manjeet, Sandeep & Surjeet - Men @ Work

Manjeet's Mighty Block


दीपक हुडा, जसवीर , परमार , चेरलाथन आणि तोमर  -  पहिले दोघे रेडर, दुसरे दोघे डिफेंडर तर तोमर  all -rounder , ह्यातल्या तोमरला बदली खेळाडू म्हणून स्पर्धेत यशस्वीरित्या खेळवले आणि त्यानेही प्रत्येक संधीचे सोने केले.अंतिम सामन्यात ही त्याने मोक्याच्या क्षणी चढायांवर गुण मिळवून दिले. हुडा हा एक चांगला खेळाडू आहे आणि चेरलाथन ही. परमार का संघात होता माहित नाही आणि जसवीर कदाचित पूर्व पुण्याईवर!
Tomar - An able Rounder in Defensive Duties


आणि 

भारतीय प्रशिक्षक बलवान सिंग - खूप नावाजलेले खेळाडू आणि प्रशिक्षक . अनुभवी तसेच उत्साही. त्यांच्या देहबोलीवरूनच जाणवत होते की हा विश्वचषक त्यांना 'उरी' तील शहिदांसाठी  जिंकायचा आहे आणि तसे ते वागले आणि करून ही दाखवले.









कबड्डी ह्या आपल्या खेळात आपला दबदबा कायम राखत विश्वविजेतेपद कायम राखल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! 

proud  2 say 

 "जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!"

Saturday, 1 October 2016

अशी मालिका मनास ताप बाई !!!

हल्ली संध्यकाळ मोकळीच असते म्हणजे क्रिकेट , कबड्डी वगैरे काहीच चालू असल्याने  वेगवेगळ्या मालिका पाहायचे सौभाग्य लाभले...पण ह्या सगळ्यात एका मालिकेने चित्त वेधून घेतले ... कलर्स  का कोणत्याशा वाहिनी वरील अस्सं सासर सुरेख बाई!! (झी वगळता बाकीच्या मराठी वाहिन्या का आहेत?.. कोणी पाहतं का?)

आता तुम्ही म्हणाल नाव तर टिपिकल आहे , त्यात काय चित्त वेधून घेण्यासारखं???  स्टार कास्ट .अगदी तगडी स्टार कास्ट आहे . 1 नव्हे 2 -2 परदेशी अभिनेते लाभले आहेत मालिकेला ..झी मराठीलाही शक्य नव्ह्त झालं परदेशी अभिनेते आणणं!..  संतोष जुवेकर आणि अविनाश  नारकर (चला हवा येऊ द्या वाले जुवेकरला परदेशी अभिनेता म्हणतात कारण तो काय बोलतो काही कळत नाही  म्हणे...चला हवा येऊ द्या वाल्यांचं काय एवढं मनावर घ्यायचं??... त्याला खर्जातला का काय असा काहीसा आवाज म्हणतात ...नारकर ही तसेच बोलतात ..मग एकट्या जुवेकरलाच काय म्हणून हा मान? ..म्हणून आम्ही दोघांना ही समान पारड्यात तोलून 'परदेशी अभिनेते' अशी संभावना करतो..असो) . अलका कुबल ह्यांच्या तिसऱ्या पिढीतली मृणाल दुसानिस ही प्रमुख अभिनेत्री (मधल्या पिढीतल्या ऐश्वर्या नारकर नाहीयेत ह्या मध्ये...पण त्या ही पुढेमागे येऊ शकतील कारण ऐश्वर्या-अविनाश  हे पॅकेज मध्येच येतात अशी वदंता आहे). आणि ह्यांच्या जोडीला कलर्स वर नियमित आढळणारे अभिजीत चव्हाण आणि इतर!!

कथासूत्र ही अगदीच कडक ... म्हणजे आम्ही पहिल्यापासून पाहिली नाही मालिका पण डेली सोपच वैशिट्य आहे की तुम्ही कुठूनही पहा तुम्हाला लगेच कळते .तर कथासूत्र म्हणजे पृथ्वी कन्स्ट्रक्शन नामक अगदी इंडिया बुल्स , हिरानंदानी , लोढा ह्यांच्या पंक्तीत बसणाऱ्या बिल्डरच्या ऑफिस मध्ये इंजिनीयर म्हणून कामास असणाऱ्या व चाळीत एकत्र कुटुंबात राहाणाऱ्या कर्तबगार होतकरू तरुणाचे मालकाच्या मुलीवर प्रेम जडते ज्यास तिच्या वडिलांचानैसर्गिकरित्या विरोध असतो पण पोरीच्या हट्टापुढे तो नमते घेतो आणि लग्नास तयार होतो .. आणि इथून पुढे मालिकेला खरी सुरवात झाली ...म्हणजे बघा जिथे बाकीच्या कथा संपतात तिथे ह्या मालिकेची सुरवात झाली... आहे की नाही सैराट स्टोरी (हो पण इथे ऑनर किलींग  वगैरे नाही...सैराट आम्ही जबरदस्त ह्या अर्थी वापरलाय). तर मालिकेचे कथानक श्रीमंत बापाचा पैशाचा माज विरुद्ध चंद्रमौळी घरातले एकत्र कुटुंबातले सुख!!..बापाचा पैशाचा माज तोडू शकेल का पोरींचे  सुरेख सासर??

आणि सादरीकरण ..विचारूच नका.. अगदीच कमाल आहे !! म्हणजे बाप (अर्थातच मुलीचा) कसा काय होईना लग्नास तयार होतो पण त्यांचं एकच म्हणणं असतं की त्यांचं घर जावई व्हावं पण हे भाऊ पडले स्वाभिमानी! त्यामुळे ते काही ह्या गोष्टीला तयार होत नाही आणि  वडिलांच्या कंपनीत CEO असलेली तुळस नवऱ्याबरोबर चाळीत राहायला येते.(एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की एवढी CEO पण,  ऑफिस मध्ये अजिबात लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब वगैरे काही नाही हा ...म्हणजे एकदम साधी राहणी हुच्च विचारसरणी)..बरं ही एवढी श्रीमंत घरात वाढलेली पण संस्कार विचाराल तर अक्षरशः आपल्या  बाबूजींचीच (अलोकनाथ हो)  मुलगी वाटावी  (आता आम्ही तिचं नाव तुळस ठेवलंय म्हटल्यावर ओघाने आलेच).सासरी आल्या आल्या ती चक्क साडीत वावरतेय.तिच्या मोठ्या बहिणी वेस्टर्न कपडे वापरतात (ते वापरणारच म्हणा ..ते थोडे खल वृत्तीचे दाखवलेत म्हटल्यावर..आपल्या इथे संकेतच आहे ना की mod /westernized  वगैरे आगाऊ आणि खल प्रवृत्तीचे असतात) पण ह्या आपल्या परदेशी अभिनेत्याची बहीण ही तसे कॅसुअल्स वापरते (म्हणजे घरात बंदी नसावी पण हिचे संस्कार)..चक्क पाचला उठून ऑफिसला जाण्याआधी स्वयंपाकास मदत करून मग कामावर जाते..ह्या त्यातल्या काही छोट्या गोष्टी ..पण 2-3 प्रसंग इतके कमालीचे सादर केले की आम्हास दाद देण्यावाचून राहवले नाही आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मालिका पोहोचविण्याच्या उद्दात्त हेतूने आम्ही लेखास सुरवात केली...ते प्रसंग उद्धृत करणे गरजेचे आहे कारण तरच तुम्ही संभाव्य प्रेक्षक व्हाल आणि मालिकेस उचलून धराल ना??

प्रसंग 1 :- तिच्या सासरकडच्यांना साधारण जाणीव होते की हे तर कुठे मधुचंद्राला गेले नाहीत (का? कदाचित हा ही संस्कारांचाच भाग असावा).. तर आपण ह्यांना जरा मोकळेपणा द्यावा, म्हणून एका सुट्टीच्या दिवशी ते काही ना काही कारण काढून बाहेर जाताना दाखवलेत .(पण ह्या संस्कारीबाई च्या डोक्यात प्रकाश पडेल तर शपथ..असो) तर ही बाई घरची साफ सफाई करताना दाखवलीय त्या दिवशी ). साफसफाई म्हटली की रद्दी आलीच. रद्दीवाल्याला बोलावते आणि CEO बाई चक्क रद्दीवाल्याशी भाव करते भैय्या इसका तो लास्ट वक्त 40 हुआ था..आज 30 ही दे रहे हो वगैरे...बघा किती गृहकर्तव्यदक्ष आहे? अहो CEO असूनही बारीक सारीक गोष्टीत लक्ष आहे आणि उधळपट्टी तर जाऊ द्या पण रद्दीचे पैसे ही सोडत नाही..  तिचे पिताश्री तेवढ्यात येतात  आणि हे सगळे बघून 'हेचि फळ काय मम् तपाला' का तत्सम भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात ! पण त्यांचं काय हो ..जन्मजात श्रीमंत आहेत ते .. त्याना काय कळणार रद्दीच्या पैशांचे मोल?

प्रसंग 2 :- आपली नायिका CEO आहे हे माहितीच आहे ..पण आता चाळीत राहत असल्याने घर ते ऑफिस असा प्रवास तिला पब्लिक ट्रान्सपोर्ट ने करावा लागतो .. आता तुम्हा आम्हाला माहितीच आहे की
पब्लिक ट्रान्सपोर्ट किती तापदायक आहे .त्यात ती श्रीमंत घरात वाढलेली, तिला तर सवयच नाही , पण ही इतकी शोषिक की एक चकार शब्द नाही ह्याबद्दल . बापाला तिच्या ह्या गोष्टीची  जाणीव होते आणि पितृहृदयच ते, कळवळते! आणि मग मुलीचा त्रास टाळण्यासाठी मुलीला गाडी भेट देतो..पण हे आपले स्वाभिमानी जावई गाडी कडे पाहत ही नाहीत मग आपली पतिव्रता तुळस कसा स्वीकार करेल ह्या भेटीचा? ती आपली पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करते (तब्बल आठवडा काढला हो त्यांनी  ह्या गोष्टीवर) ..बर ती गाडीने जात नाही तरी ही ऑफिसला लवकर पोहोचते..ह्या वर तिचे पिताश्री , तिची एक कर्मचारी कम मैत्रीण कम मानलेली नणंद (म्हणजे हिरोची मानलेली बहीण हो) वेगवेगळ्या समयी वेगवेगळ्या प्रकारे विचारतात. बरं हे नात्यातले म्हणता येतील पण एक कर्मचारी येऊन गाडी कुठे पार्क केली आहे ? दिसत नाहीये वगैरे विचारतो म्हणजे हे तर बँकेतल्या कॅशियर किंवा तत्सम माणसाने चंदा खोचरला विचारण्यासारखं  झालं  (एवढा डायरेक्ट ऍक्सेस असतो?)..नाही पण आपली तुळस खेळीमेळीचे वातावरण कंपनी मध्ये तयार करण्यात यशस्वी झालीय आणि मालक - कर्मचारी असा भेदच नाही ठेवलाय ..सगळे आपलं म्हणूनच काम करतात..म्हणून तर पृथ्वी कन्स्ट्रक्शन एवढी नावारूपास आलीय..

माझ्या मनात उगाच एक शंका आली की हे एवढे स्वाभिमानी वगैरे मग बापाच्या कंपनीतली  नोकरी कशी काय चालते ब्वा! एवढंच असेल तर तीही द्यावी सोडून आणि शोधावी दुसरीकडे ...हुशार वगैरे ती आहेच , तिला काय पायघड्या टाकुन लोकं बोलावतील ..असो आमच्या मनात उगाच शंका ..सगळ्याच  गोष्टींची आपल्याला माहिती नसते..असती तर इथे असतो काय!!

बाकी जुवेकर आणि नारकर ह्यांच्याविषयी काही लिहिले नाही कारण परदेशी भाषा आम्हास फारशी ज्ञात नाही .. ज्याचे फारसे आकलन होत नाही, त्याविषयी काय बोलणार?

तळटीप :- तर हे सगळं वाचून तुमची मालिकेविषयी उत्कंठा वाढली असेलच... मग आता  तुम्हीच शोधून काढा टाईमिंग आणि पहा अस्सं सासर सुरेख बाई!...मनस्ताप झाल्यास आमची जवाबदारी नाही!!!

मोठी तळटीप - लेखकास हे सर्व लिहिताना भाषेवर मोठ्या प्रयासाने नियंत्रण ठेवावे लागले आहे ! उद्या र प्रत्यक्ष चर्चा करायाची वेळ असल्यास त्यांचा बांध फुटून भडका उडू शकतो ह्याची जाणीव ठेवून मगच चर्चेस सामोरे जावे 

Saturday, 27 August 2016

जिवाची दुबई - 3

आजचा तिसरा दिवस जरा निवांत होता. डॉल्फिन शो आणि  मॉल ऑफ एमिरेट्स मध्ये स्की दुबई एवढाच सुटसुटीत कार्यक्रम होता. तसे ही दुबई ट्रिपचा सगळा प्रोग्रॅम सुटसुटीत होता.फार धावपळ अशी कुठेच नव्ह्ती त्या मुळे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित अनुभवता आल्या. डॉल्फिन शो ही मस्त होता. डॉल्फिन शो ची सुरवात सीलच्या कवायतीनी झाला..तो सील म्हणे त्यांच्या ताफ्यात नव्यानेच सामील झाला होता , तरी त्याने डान्स, व्यायाम आणि योगासारखे असे काही हुकुमाबर केले की तो नवीन असल्याची जाणीव झालीच नाही.. तरी ही शेवटी तो मात्र एखाद्या अवखळ मुला प्रमाणे वागला म्हणजे जेव्हा त्यास आत जाण्यास सांगण्यात आले तेव्हा मात्र ट्रेनरचे अजिबात न ऐकता त्याने पाण्यात उडी मारली, पूलची राऊंड मारली आणि परत बाहेर आला आणि ट्रेनरकडे निरागसपणे पाहत पुन्हा पाण्यात उडी मारली, असे 3-4 वेळा केले.






सीलच्या सलामीचे नमन

सीलच्या सलामीचे नमन झाल्यावर आता डॉल्फिनच्या खेळ्यांची वेळ होती, 4 डॉल्फिन त्यांचे खेळे दाखवण्यास सज्ज होते आणि पुढचा जवळपास अर्धा पाऊण तास  त्यांनी अक्षरशः डोळ्यांचे पाते नाही लउ (मिटू) दिले.  हा शो लिहून कळण्या सारखा नाहीच ....प्रत्यक्षच बघायला हवा , डॉल्फिन हा बुद्धिमान सस्तन प्राणी आहे हे फक्त ऐकून माहित होते पण इथे प्रत्यक्ष अनुभवले,..त्यांचा आज्ञाधारकपणा  एकमेकांशी असलेले sync हे फक्त अनुभवायला हवे.. म्हणजे राहून राहून आश्चर्य वाटायचे की कसं काय त्यांना कुठल्या गोष्टी कधी करायच्यात आणि त्या चौंघांपैकी कोणी कोणत्या क्रमाने करायच्यात हे कसे कळते ... त्यांचे ट्रेनर होते पण ते फक्त त्यांना मध्ये मध्ये मासे खायला देण्यापुरते ... म्हणजे ते त्यांना काही ही सूचना वगैरे देत नव्हते (आता टेकनॉलॉजि एवढी पुढे गेली असेल तर माहित नाही की खाद्य गिळताच तुमच्या नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय करायच्यात हे मेंदूला कळवण्यात येईल वगैरे).सांगायचा मुद्दा हा की मनुष्य प्राणी ही एवढ्या अचूकरित्या सिन्क (sync)करेल काय अशी शंका यावी एवढ्या सहजतेने आणि सरळपणे त्यांनी शो सादर केला की फक्त तोंडात बोटं टाकणंच बाकी राहिलेलं. आता इतका छान अनुभव  आल्यावर डॉल्फिन बरोबर फोटो नाही काढला तर ह्या खेळ्यांची व्यवस्थित सांगता झाली नसती. त्या मुळे काही रियाल मोजून डॉल्फिन बरोबर फोटो काढून घेतले . दुबई मधली एक गोष्ट मला आवडली की प्रत्येक ठिकाणी त्यांनी फोटोग्राफर ठेवलेले आहेत आणि ते प्रत्येक क्षणाचे फोटो टिपत राहतात  आणि तुमच्या हाताला टॅग वगरे काही बांधत राहतात . एक्सिट च्या ठिकाणी त्यांचा स्टुडिओ असतो जिथे तुम्ही फोटो पाहायचे आणि तुम्हाला आवडल्यास प्रिंट घ्यायची आणि न आवडल्यास ते काढून टाकतात .कुठे ही बळजबरी नाही की मागे लागून डोकं पिकवणं नाही .सगळं अगदी व्यायवसायिक पद्धतीने.







डॉल्फिनचे खेळे

डॉल्फिन शो नंतर आता डायरेक्ट स्की दुबई साठी मॉल ऑफ एमिरेट्स मध्ये गेलो . मॉल ऑफ एमिरेट्स दुबई मॉल एवढा मोठा नाहीये पण पर्यटकांची गर्दी स्की दुबई साठी कायम असते इथे किंबहुना आजूबाजूच्या आखाती देशातील लोकांसाठी स्की दुबई हे फार मोठं आकर्षण आहे . आमच्या पॅकेजमध्ये  बेसिक तिकीट होतं स्की दुबईचे.. आम्ही टॉप अप करून घेतले ..टॉप अप मध्ये एन्काऊंटर विथ पेंग्विन , स्नो बुलेट, स्की स्कूल ह्यातलं एक घेणार होतो. आम्हाला एन्काऊंटर विथ पेंग्विन घ्यायचं होता पण पेंग्विन्स च्या अपॉइंटमेंट 7 पर्यंत फुल होत्या आणि साधारण 2 वगैरेच वाजले होते सो वाटले कि 7 पर्यंत म्हणजे उगाच वाट पाहत राहावे लागेल म्हणून आम्ही स्नो बुलेट्स घेतले.

अरबांनी वाळवंटात आम्हाला बर्फाळ प्रदेशातील स्की साठीचे कपडे घालायला लावले . आश्चर्य वाटलं अगदी (आमच्या मुंबईत ही झालाय म्हणे फोनिक्स मॉल मध्ये, पाहायला हवे) त्या स्की मध्ये स्कीईंग आपल्याला जमत नाही हे आम्ही मनालीला अनुभवले होते म्हणून ते न घेता बाकीचे सगळे गेम घेतले होते . प्रथम दर्शनी फार भारावून जायला होते .सगळे खेळ आपण उत्सुकतेने खेळूनही घेतो पण नंतर लाईन लावून खेळ खेळायचे असल्याने कंटाळा येतो सो एकेकदा सगळे खेळ खेळून झाल्यावर बाहेर जावेसे वाटते आणि शेवटी नैसर्गिक बर्फ आणि मॉल मधला कृत्रिम बर्फ ह्यामध्ये फरक असणारच. म्हणजे सोनमर्ग, गुलमर्ग, मनालीला जी मजा आली आम्हाला तेवढी काही मजा नाही आली पण जे अगदीच गेले नसतील अशा ठिकाणी खास करून मध्य आखाती लोकांसाठी अनुभवायची जागा आहे.स्नो बुलेट हा खेळ बघून धडकी भरेल असे वाटत होते पण तो ही फार थ्रिलिंग नव्हता.

एन्काऊंटर विथ पेंग्विनचे आम्हाला बुकिंग नव्हते मिळाले पण त्यांनीच पेंग्विन्स  आमच्या भेटीला आणले. पेंग्विन मार्च म्हणुन त्यांचा दर 2 तासांनी पेंग्विन शो असतो.किंग पेंग्विनस जातीच्या 7-8 (क्युट - बिट काय म्हणतात तसे) पेंग्विन्सचा ताफा आपल्या भेटीला येतो.ते पेंग्विन्स विषयी माहिती देतात आणि नंतर आपल्या प्रश्न विचारतात आणि लकी विन्नेर्सला पेन्गवन्स ला भेट्तयची परवानगी देतात (हे पेंग्विन्स प्रोपोस ही करतात म्हणे पण आम्हाला काही ते पाहायला मिळालं नाही..ते फक्त लकी विंनर्स  ना).एवढे सगळे होईस्तोवर 7 वाजून गेले होते आणि पेंग्विन एन्काऊंटर का बुक नाही केले आम्ही ह्याची खंत वाटली .तसा सुटसुटीत कार्यक्रम असला तरी थोडं थकायला झालं होतं बर्फात खेळून.








स्की दुबई आणि पेंग्विन्स' मार्च


रूम वर आलो आणि फ्रेश  होऊन मीना बाजार मध्ये घड्याळं घ्यायला गेलो.मीना बाजार मध्ये प्रत्येक ब्रँडेड घड्याळाच्या लेटेस्ट मॉडेल ची फर्स्ट कॉपी मिळते. ते घेताना मात्र ओळख, तुमचे बार्गेनिंग स्किल्स आणि नशीब ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ओळख ह्या साठी की तुम्हाला व्यवस्थित प्रॉडक्ट बघायला मिळतात आणि नशीब ह्या साठी की ते घेतल्यावर चांद तक चालण्यासाठी ... आम्ही टॅग हेअर , मिशेल कॉर्स आणि रॅडो अशी 3 घड्याळं 50 OMR (8.5k रुपये साधारण) ला घेतली आणि चाँद आहि तरी किमया ईद से लेकर ईद तक चालू आहेत ;)

मग मीना बाजार मध्येच जेवून आम्ही दुसऱ्या दिवशीच्या aquarium साठी स्विमिन्ग कॉस्ट्यूम घेतले आणि डेसर्ट रोझ मध्ये येऊन निद्रादेवीच्या अधीन झालो!!!

क्रमशः