Saturday, 1 October 2016

अशी मालिका मनास ताप बाई !!!

हल्ली संध्यकाळ मोकळीच असते म्हणजे क्रिकेट , कबड्डी वगैरे काहीच चालू असल्याने  वेगवेगळ्या मालिका पाहायचे सौभाग्य लाभले...पण ह्या सगळ्यात एका मालिकेने चित्त वेधून घेतले ... कलर्स  का कोणत्याशा वाहिनी वरील अस्सं सासर सुरेख बाई!! (झी वगळता बाकीच्या मराठी वाहिन्या का आहेत?.. कोणी पाहतं का?)

आता तुम्ही म्हणाल नाव तर टिपिकल आहे , त्यात काय चित्त वेधून घेण्यासारखं???  स्टार कास्ट .अगदी तगडी स्टार कास्ट आहे . 1 नव्हे 2 -2 परदेशी अभिनेते लाभले आहेत मालिकेला ..झी मराठीलाही शक्य नव्ह्त झालं परदेशी अभिनेते आणणं!..  संतोष जुवेकर आणि अविनाश  नारकर (चला हवा येऊ द्या वाले जुवेकरला परदेशी अभिनेता म्हणतात कारण तो काय बोलतो काही कळत नाही  म्हणे...चला हवा येऊ द्या वाल्यांचं काय एवढं मनावर घ्यायचं??... त्याला खर्जातला का काय असा काहीसा आवाज म्हणतात ...नारकर ही तसेच बोलतात ..मग एकट्या जुवेकरलाच काय म्हणून हा मान? ..म्हणून आम्ही दोघांना ही समान पारड्यात तोलून 'परदेशी अभिनेते' अशी संभावना करतो..असो) . अलका कुबल ह्यांच्या तिसऱ्या पिढीतली मृणाल दुसानिस ही प्रमुख अभिनेत्री (मधल्या पिढीतल्या ऐश्वर्या नारकर नाहीयेत ह्या मध्ये...पण त्या ही पुढेमागे येऊ शकतील कारण ऐश्वर्या-अविनाश  हे पॅकेज मध्येच येतात अशी वदंता आहे). आणि ह्यांच्या जोडीला कलर्स वर नियमित आढळणारे अभिजीत चव्हाण आणि इतर!!

कथासूत्र ही अगदीच कडक ... म्हणजे आम्ही पहिल्यापासून पाहिली नाही मालिका पण डेली सोपच वैशिट्य आहे की तुम्ही कुठूनही पहा तुम्हाला लगेच कळते .तर कथासूत्र म्हणजे पृथ्वी कन्स्ट्रक्शन नामक अगदी इंडिया बुल्स , हिरानंदानी , लोढा ह्यांच्या पंक्तीत बसणाऱ्या बिल्डरच्या ऑफिस मध्ये इंजिनीयर म्हणून कामास असणाऱ्या व चाळीत एकत्र कुटुंबात राहाणाऱ्या कर्तबगार होतकरू तरुणाचे मालकाच्या मुलीवर प्रेम जडते ज्यास तिच्या वडिलांचानैसर्गिकरित्या विरोध असतो पण पोरीच्या हट्टापुढे तो नमते घेतो आणि लग्नास तयार होतो .. आणि इथून पुढे मालिकेला खरी सुरवात झाली ...म्हणजे बघा जिथे बाकीच्या कथा संपतात तिथे ह्या मालिकेची सुरवात झाली... आहे की नाही सैराट स्टोरी (हो पण इथे ऑनर किलींग  वगैरे नाही...सैराट आम्ही जबरदस्त ह्या अर्थी वापरलाय). तर मालिकेचे कथानक श्रीमंत बापाचा पैशाचा माज विरुद्ध चंद्रमौळी घरातले एकत्र कुटुंबातले सुख!!..बापाचा पैशाचा माज तोडू शकेल का पोरींचे  सुरेख सासर??

आणि सादरीकरण ..विचारूच नका.. अगदीच कमाल आहे !! म्हणजे बाप (अर्थातच मुलीचा) कसा काय होईना लग्नास तयार होतो पण त्यांचं एकच म्हणणं असतं की त्यांचं घर जावई व्हावं पण हे भाऊ पडले स्वाभिमानी! त्यामुळे ते काही ह्या गोष्टीला तयार होत नाही आणि  वडिलांच्या कंपनीत CEO असलेली तुळस नवऱ्याबरोबर चाळीत राहायला येते.(एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की एवढी CEO पण,  ऑफिस मध्ये अजिबात लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब वगैरे काही नाही हा ...म्हणजे एकदम साधी राहणी हुच्च विचारसरणी)..बरं ही एवढी श्रीमंत घरात वाढलेली पण संस्कार विचाराल तर अक्षरशः आपल्या  बाबूजींचीच (अलोकनाथ हो)  मुलगी वाटावी  (आता आम्ही तिचं नाव तुळस ठेवलंय म्हटल्यावर ओघाने आलेच).सासरी आल्या आल्या ती चक्क साडीत वावरतेय.तिच्या मोठ्या बहिणी वेस्टर्न कपडे वापरतात (ते वापरणारच म्हणा ..ते थोडे खल वृत्तीचे दाखवलेत म्हटल्यावर..आपल्या इथे संकेतच आहे ना की mod /westernized  वगैरे आगाऊ आणि खल प्रवृत्तीचे असतात) पण ह्या आपल्या परदेशी अभिनेत्याची बहीण ही तसे कॅसुअल्स वापरते (म्हणजे घरात बंदी नसावी पण हिचे संस्कार)..चक्क पाचला उठून ऑफिसला जाण्याआधी स्वयंपाकास मदत करून मग कामावर जाते..ह्या त्यातल्या काही छोट्या गोष्टी ..पण 2-3 प्रसंग इतके कमालीचे सादर केले की आम्हास दाद देण्यावाचून राहवले नाही आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मालिका पोहोचविण्याच्या उद्दात्त हेतूने आम्ही लेखास सुरवात केली...ते प्रसंग उद्धृत करणे गरजेचे आहे कारण तरच तुम्ही संभाव्य प्रेक्षक व्हाल आणि मालिकेस उचलून धराल ना??

प्रसंग 1 :- तिच्या सासरकडच्यांना साधारण जाणीव होते की हे तर कुठे मधुचंद्राला गेले नाहीत (का? कदाचित हा ही संस्कारांचाच भाग असावा).. तर आपण ह्यांना जरा मोकळेपणा द्यावा, म्हणून एका सुट्टीच्या दिवशी ते काही ना काही कारण काढून बाहेर जाताना दाखवलेत .(पण ह्या संस्कारीबाई च्या डोक्यात प्रकाश पडेल तर शपथ..असो) तर ही बाई घरची साफ सफाई करताना दाखवलीय त्या दिवशी ). साफसफाई म्हटली की रद्दी आलीच. रद्दीवाल्याला बोलावते आणि CEO बाई चक्क रद्दीवाल्याशी भाव करते भैय्या इसका तो लास्ट वक्त 40 हुआ था..आज 30 ही दे रहे हो वगैरे...बघा किती गृहकर्तव्यदक्ष आहे? अहो CEO असूनही बारीक सारीक गोष्टीत लक्ष आहे आणि उधळपट्टी तर जाऊ द्या पण रद्दीचे पैसे ही सोडत नाही..  तिचे पिताश्री तेवढ्यात येतात  आणि हे सगळे बघून 'हेचि फळ काय मम् तपाला' का तत्सम भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात ! पण त्यांचं काय हो ..जन्मजात श्रीमंत आहेत ते .. त्याना काय कळणार रद्दीच्या पैशांचे मोल?

प्रसंग 2 :- आपली नायिका CEO आहे हे माहितीच आहे ..पण आता चाळीत राहत असल्याने घर ते ऑफिस असा प्रवास तिला पब्लिक ट्रान्सपोर्ट ने करावा लागतो .. आता तुम्हा आम्हाला माहितीच आहे की
पब्लिक ट्रान्सपोर्ट किती तापदायक आहे .त्यात ती श्रीमंत घरात वाढलेली, तिला तर सवयच नाही , पण ही इतकी शोषिक की एक चकार शब्द नाही ह्याबद्दल . बापाला तिच्या ह्या गोष्टीची  जाणीव होते आणि पितृहृदयच ते, कळवळते! आणि मग मुलीचा त्रास टाळण्यासाठी मुलीला गाडी भेट देतो..पण हे आपले स्वाभिमानी जावई गाडी कडे पाहत ही नाहीत मग आपली पतिव्रता तुळस कसा स्वीकार करेल ह्या भेटीचा? ती आपली पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करते (तब्बल आठवडा काढला हो त्यांनी  ह्या गोष्टीवर) ..बर ती गाडीने जात नाही तरी ही ऑफिसला लवकर पोहोचते..ह्या वर तिचे पिताश्री , तिची एक कर्मचारी कम मैत्रीण कम मानलेली नणंद (म्हणजे हिरोची मानलेली बहीण हो) वेगवेगळ्या समयी वेगवेगळ्या प्रकारे विचारतात. बरं हे नात्यातले म्हणता येतील पण एक कर्मचारी येऊन गाडी कुठे पार्क केली आहे ? दिसत नाहीये वगैरे विचारतो म्हणजे हे तर बँकेतल्या कॅशियर किंवा तत्सम माणसाने चंदा खोचरला विचारण्यासारखं  झालं  (एवढा डायरेक्ट ऍक्सेस असतो?)..नाही पण आपली तुळस खेळीमेळीचे वातावरण कंपनी मध्ये तयार करण्यात यशस्वी झालीय आणि मालक - कर्मचारी असा भेदच नाही ठेवलाय ..सगळे आपलं म्हणूनच काम करतात..म्हणून तर पृथ्वी कन्स्ट्रक्शन एवढी नावारूपास आलीय..

माझ्या मनात उगाच एक शंका आली की हे एवढे स्वाभिमानी वगैरे मग बापाच्या कंपनीतली  नोकरी कशी काय चालते ब्वा! एवढंच असेल तर तीही द्यावी सोडून आणि शोधावी दुसरीकडे ...हुशार वगैरे ती आहेच , तिला काय पायघड्या टाकुन लोकं बोलावतील ..असो आमच्या मनात उगाच शंका ..सगळ्याच  गोष्टींची आपल्याला माहिती नसते..असती तर इथे असतो काय!!

बाकी जुवेकर आणि नारकर ह्यांच्याविषयी काही लिहिले नाही कारण परदेशी भाषा आम्हास फारशी ज्ञात नाही .. ज्याचे फारसे आकलन होत नाही, त्याविषयी काय बोलणार?

तळटीप :- तर हे सगळं वाचून तुमची मालिकेविषयी उत्कंठा वाढली असेलच... मग आता  तुम्हीच शोधून काढा टाईमिंग आणि पहा अस्सं सासर सुरेख बाई!...मनस्ताप झाल्यास आमची जवाबदारी नाही!!!

मोठी तळटीप - लेखकास हे सर्व लिहिताना भाषेवर मोठ्या प्रयासाने नियंत्रण ठेवावे लागले आहे ! उद्या र प्रत्यक्ष चर्चा करायाची वेळ असल्यास त्यांचा बांध फुटून भडका उडू शकतो ह्याची जाणीव ठेवून मगच चर्चेस सामोरे जावे 

No comments:

Post a Comment