Monday, 1 August 2016

जिवाची दुबई (भाग 2)

King's Palace (Entrance)
 पाल्म अटलांटिस मधून बाहेर आल्यावर आता दुबई मॉल ला जात होतो ... वाटेत म्हणजे थोडी वाट वाकडी करून दुबईच्या राजाचा प्रासाद  (अर्थात बाहेरूनच) दाखवला..साधारण  अर्ध्या पाऊण किलोमीटर वरून तो प्रासाद न्याहाळत होतो तरी ही तो डोळ्यात सामावत नव्ह्ता ह्या वरून त्याच्या भव्यतेची कल्पना यावी ....तिथूनच आम्हाला बुर्ज खलिफाची पहिली झलक पाहायला मिळाली ..अरब जगाचं गंडस्थळ आहे बुर्ज खलिफा .. तो ईदचा दिवस असल्याने राजकुटुंबाला ईदच्या सदिच्छा द्याव्यात का असा विचार आला पण राणी अजून उठली नाहीये आणि ती उठून तयार होईस्तोवर फार उशीर होईल अशी भावेश ने जाणीव करून दिली आणि तसे ही तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला आमची ओळख माहित नसल्याने आम्हाला त्या उन्हात ताटकळत ठेवले असते ...परत कधीतरी  असा विचार करून आम्ही तिथून निघालो... पुनश्च त्याने आम्हास दुबई मरिनापाशी आणून सोडले .... दुपारच्या टळटळीत उन्हात ही त्या मरिनाच्या टोलेजंग आणि वेगवेगळ्या आकाराच्या इमारतीचे सौंदर्य उठून  दिसत होते ...थोडा वेळ फोटो वगैरे काढल्यावर पोटातल्या कावळ्यांची कावकाव ऐकू यायला लागली ... आता तिथून थेट दुबई मॉलला आणून सोडले .... तिथेच त्या भावेश भाईने आम्हास जुजबी माहिती दिली अन बुर्ज खलिफाची तिकिट्सही....
First Sight of Burj Khalifa
Marina

Marina 




दुबई मॉल हा जगातला सगळ्यात मोठा मॉल आहे ... हा मॉल फक्त  फिरायला किमान 1 संपूर्ण  दिवस हाताशी हवा ... जगातल्या सगळ्यात मोठ्या मॉलच्या पाठी जगातली सगळ्यात उंच मानवनिर्मित इमारत .... काय कॉम्बिनेशन आहे.... दुबई मॉलच सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते तिथले aquarium आणि फाऊंटन शो ... शो साधारण 4 नंतर चालू होतो ,.... दुबई मॉलच्या खाऊ गल्लीत जगातल्या विविध पदार्थांची रेलचेल होती.. आम्ही मेक्सिकन पद्धतीचे जेवण घेतले नि पोटोबा केला... आमच्याकडे अजून साधारण अडीच तीन तास होते ... दुबई मॉल चे aquarium बाहेरून जेवढे दिसते तेवढेच पाहायचा आमचा विचार होता कारण aquaventure ला ही aquarium पाहायचेच होते ... म परत इथे कशाला पैसे घालवा असा विचार करून आम्ही सुरवातीलाच पॅकेज मधून हे काढले होते आणि तिथले ऍड केले होते.... खाली आल्यावर मात्र तिथल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसचे दरफलक पाहून आम्हास त्यातली एखादी तरी करावी असे प्रकर्षाने जाणवायला लागले.... त्या aquarium मध्ये माशांचे विवीध प्रकार आहेतच ... ते कुठेही असतात ... पण त्या aquarium मध्ये स्कुबा डायविंग ही आहे ...मॉल मधल्या aquarium मध्ये स्कुबा डायविंग .. हेच वास्तविक आपणास अशक्य वाटते पण त्यांनी ते शक्य केलेय .... पुन्हा त्या aquarium मधल्या शार्क किंवा स्टिंग रे जातीच्या माशांबरोबर एन्काऊंटर असे धाडसी खेळ किंवा त्यांच्या अंडरवॉटर झू ची सफर ....अन  हे ही कमी म्हणून की काय एक किंग क्रोक म्हणून 750 kg वजनाची आणि 5 मीटर लांबीची जगातल्या सगळ्यात मोठ्या मगरींपैकी एक मगर आणून वसवलीय ....येवढा आवाका पाहून  ह्यातलं काहीतरी करावं असं आम्हाला वाटायला लागलं आणि  वेळ काळ व खिसा ह्याचा विचार करून आम्ही अंडरवॉटर झू निवडलं ... सुरवातीस त्यांनी आम्हास आत घेऊन एक छोटी 3-d फिल्म दाखवली आणि आम्हाला अक्षरशः फसगत झाल्यासारखे वाटू लागले...म्हटलं एवढे 4 एक हजार भरून  फक्त ही 3-d फिल्म??.. पण तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी पुढे जाण्यास सांगितल्यावर जरा हायसे वाटले... तिथे एक चक्क काचेचा तळ असलेली  बोट होती आणि त्या बोटीतून एक छोटी राऊंड मारायची होती ... त्या बोटीतून प्रवास करता एवढे वेगेवेगळ्या प्रकारचे मासे शार्क आणि स्टिंग रे सकट अगदी जवळून पाहताना ह्या अरबांचे प्रचंड कौतुक वाटले .... बोटीतून छोटी परिक्रमा झाल्यावर ते झू पाहता पाहता साक्षात किंग croc च्या दालनाकडे आलो आणि त्यांच्या समोरच peguin दालन... तोंडात फक्त बोटं घालायची बाकी होती

Dubai Mall & Underwater Zoo (Click on the link for more pictures)




  दुबईच्या ह्या शेखांच्या भव्य दिव्यतेच्या हव्यासाची आपण फक्त कल्पना करू शकतो ... आता त्यांच्या अजून एका भव्य निर्मितीकडे जायची ओढ लागली होती ... जवळपास 4.30 होऊ गेलेले आणि आता आम्हाला चहाची पण तल्लफ आलेली आणि खलिफाचीही .. मग आम्ही झू आवरते घेतले .. पटापट बाहेर आलो चहा घेतला, फ्रेश झालो आना पावले चालायला लागली खलिफाची वाट ...जगातली सगळ्यात उंच मानव निर्मित इमारत... एक वेगळाच उत्साह होता ... दुबई मॉल मधूनच खलिफाला जायला  रस्ता आहे ... वाटेत सर्वत्र खलिफाचे बांधकाम (construction) कसे झाले...  बांधकामातले  milestones  आणि  बांधकामाच्या वेळी प्रस्थापित होत असलेले रेकॉर्डस् ह्याची चित्रफीत, hoardings  पाहायला मिळतात ..बुर्ज खलिफाची निर्मितीच मुळात दुबईच्या पर्यटनास जागतिक ओळख मिळावी ह्या साठी केली गेली आहे...खलिफाच्या नावामागचा इतिहास ही रंजक आहे...ह्या टॉवरचे नाव बुर्ज दुबई असे असणार होते पण  ह्याचे बांधकाम चालू असताना दुबईची अर्थव्यवस्था डबघाईस आली होती व त्या वेळेस अबुधाबीच्या राजाने दुबईस पैसे देऊन ह्या संकटातून बाहेर काढले होते म्हणून सन्मानार्थ ह्या tower ला त्याचे नाव देण्यात आले ....जगातल्या सगळ्या खंडातील लोकांचा ह्याच्या निर्मितीत काहीना काही हातभार आहेच ... तसे ते दुबईच्या विकासातही आहेच ...ही सगळॆ माहिती साठवत आम्ही लिफ्ट समोर आलो .... ही लिफ्ट मोजून 60 सेकंदात आपल्यायाला 125 व्या मजल्यावर घेऊन जाते आणि तुमच्या पोटातले पाणी सुद्धा हालत नाही .. लिफ्ट च्या दरवाज्यावर प्रत्येक सेकंड डिजिटली डिस्प्ले करतात ...तुम्ही तुमचे घड्याळ लावून हे पाहू शकता  ... आयफेल tower जे जगात उंचीच्या बाबतीत 10 व्या क्रमांकावर आहे ...ती लिफ्ट ही इतक्या कमी वेळात वर नेत नाही ....मध्ये एकदा लिफ्ट बदलावी लागते ... तर 60 व्या सेकंदाला आम्ही 125 व्या मजल्यावर होतो आणि तिथून जे दुबई चे दर्शन घडते ते मांडायला शब्द नाहीत.. आपण एका अरबी देशात आणि ते ही वाळवंटी देशात आहोत ह्याची जाणीव फक्त दूरवरचे वाळवंट दिसते तेव्हाच होते ...खालील दुबई मॉल, दुबई डाउन टाउन हा परिसर आई दुबई मरिना चा परिसर ह्याचे सौंदर्य निव्वळ शब्दातीत... दुबई चे जे काही दर्शन होते त्याने अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायला होते ... फक्त वातावरण थोडे hazy असल्याने फोटोस मनासारखे येत नव्हते ... पण तसे ही ह्या गोष्टी डोळ्यांनी मनात साठवून ठेवायच्या असतात ..फोटो कृत्रिम (स)आठवण ...आम्ही prime time चे तिकीट काढले असल्याने सूर्यास्तापूर्वी  व  सूर्यास्तानंतर आजूबाजूचा परिसर ह्या दोहोंचा छान अनुभव  घेता आला ....फॉऊंटन शो ही आम्ही 2-3 वेळा वरून  पाहिला ...अगदी जबरदस्त ... चुकवू नये असा हा शो आहे....  आम्ही जवळपास 2 तास काढून ही आम्हास खाली यावेसे वाटत नव्हते ,.... तसे ही उंचावरून कोणालाच खाली यायचे नसते .. आता मात्र 7 वाजता पुनःश्च एकदा 125 व्या मजल्यावरून (555 मीटर) दुबई 360 डिग्री डोळ्यात साठवून घेतलं आणि आता फौंटन शो दुबई मॉल मधून पाहण्यासाठी खाली उतरलो ... लिफ्ट एका मिनिटात वर आलो होती तशीच 1 मिनिटात खाली उतरली..बघायला आता खूप गर्दी झाली होती ....ईद असल्यामुळे सगळ्यांना खास करून कामगार वर्गाला सुट्टी होती आई सगळे बांगलादेशी , पाकिस्तानी कामगार घोळक्या घोळक्याने आले होते ..

फौंटन शो  मधले फौंटन आणि रोषणाई,  संगीताशी अशी काही सिन्क केलीय की खासच.. एवढे परफेक्ट सिन्क माणसाला ही होता येईल का ह्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही ... दुबई मॉलच्या आकर्षणांपैकी एक आकर्षण  निश्चितच फौंटन शो आहे आई तो ही चकटफू ... आणि चकटफू असूनही दर्जाच्या बाबतीत कुठेच तडजोड नाही .... जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम  फौंटन शो पैकी एक असावा ...
फौंटन शो संपल्यावर मात्र दिवसभराच्या थकव्याची आठवण  झाली आणि आम्ही पटापट निघालो ... मीनाबाजार मध्ये रात्रीचे उदरभरण  करून निद्रादेवी ला जवळ केले ...दुसऱ्या दिवशीच्या डोल्फिन शो आणि स्की दुबईच्या अनुभवासाठी सज्ज व्हायला

At The Top Burj Khalifa (Click on the link for more pictures)
















 क्रमशः

1 comment: