Saturday, 28 November 2015

देऊळ बंद

मस्कत मध्ये पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित (म्हणजे एकमेव शो) होण्याचा मान देऊळ बंद ह्या चित्रपटाला मिळाला. वास्तविक ह्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला जाऊन ह्या उपक्रमास पाठींबा द्यायचं प्रयोजन होतं पण आम्ही काही जाऊ शकलो नाही, पण असो तो काही मुद्दा नाही. देऊळ बंद हा चित्रपट आणि त्या चित्रपटाचा नंतर राहिलेला प्रभाव आणि त्यानंतर केलेली पारायणं ह्या मुळे त्या चित्रपटाविषयीच्या भावना लिहून काढाव्याशा वाटल्या.

मुळात देऊळ बंद ह्या  नावावरून आणि त्याच्या प्रसारासाठी whatsapp  वरून फिरणाऱ्या मेसेजेस मुळे तरी फार कोणी (ज्येष्ट नागरिक आणि श्रद्धावान लोक वगळता) आकर्षित झाले असतील ह्या चित्रपटाकडे असे वाटत नाही. माझा ही साधारण तोच प्रकार.  म्हणजे त्याची प्रिंट आमच्या ऑफिस मधे येउन ही जमाना झाला आणि सरावाने वीकेंड ला पाहण्याच्या उद्देशाने ती मी घरी आणली पण पाहणे काही झाले नाही म्हणजे हा काय चित्रपट पाहायचा असा काहीसा दृष्टीकोन. आणि त्यातून आमचे आई-बाबा  मायदेशात चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहून आले आणि त्यांना फार आवडला.  त्यांना चित्रपट आवडला म्हणजे आपल्यासाठी तर तो नक्कीच नसावा असे माझे गृहीतक (ह्या गृहितका मागे साधारण generation gap कारणीभूत असावी)

पण  एका 'वीकेंड'ला काहीच कार्यक्रम नसल्याने काय करायचे हा प्रश्न होता . म हो नाही करता करता शेवटी देऊळबंद पहायचे ठरले आणि पुढचे ३  तास आम्ही अक्षरशः जागेवरून उठलो नाहीत. ह्याचे कारण सर्वच पात्रांचा अभिनय, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले किंवा सादरीकरण . कथा तर whatsapp  वर फोरवर्ड झाल्या प्रमाणे नासाचा संशोधक (नास्तिक) इस्रोच्या विनंती वरून  दहशतवाद्यांच्या हालचाली (साधारण समुद्री हालचाली) वेळीच टिपून त्यावर वेळीच योग्य ती पावले उचलण्यात मदत हवी ह्या हेतूने त्याने विकसित केलेली frequency  इंस्टाल करण्यासाठी येतो.  त्याची राहण्याची व्यवस्था ज्या संकुलात केलेली असते तिथे स्वामींचे एक देऊळ दाखवलेय आणि तिथे दिवस रात्र त्यांच्या सेवे निमित्त  कार्यक्रम होत असतात ज्याने तो थोडा विचलित झालेला असतो आणि त्यात गुरुपोर्णिमेनिमित्त जे विशेष कार्यक्रम होतात त्याने त्याचा संयम सुटतो आणि तो वरच्या लेवेल ची सूत्र हलवून देऊळ बंद करवतो आणि इथून पुढे चालू होतो आस्तिक आणि नास्तिकाचे द्वंद्व आणि  पुढे काय होणार चा खेळ जो आपल्याला शेवट पर्यंत गुंतवून ठेवतो.

गश्मिर महाजनीने नासा चा संशोधक  अप्रतिम साकारलाय. त्याचे व्यक्तिमत्त्व ही खूप चांगले आहे. मराठीत बऱ्याच दिवसांनी चांगला दिसणारा आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व असणारा आणि चांगला अभिनय करणारा अभिनेता गवसलाय असे म्हणून शकतो. राघव शास्त्री (संशोधक) हे खलनायकी पात्र होऊ शकले असते पण त्याने अजिबात तोल ढासळू दिला नाही. उलट उत्तरार्धात त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. मुळात तो नास्तिक नसून त्याचा स्वामींवर राग असावा असे वाटते आणि त्यांच्या वरील रागातून बाकीच्या देवांचे ही अस्तित्व नाकारतो असे काहीसे असावे.

काही काही गोष्टी चित्रपटात खटकण्यासारख्या आहेत पण त्या दुर्लक्षित करता येण्या सारख्या आहेत. उत्तरार्ध मात्र खूपच उत्कंठावर्धक आहे आणि मोहन जोशींनी स्वामी समर्थ अप्रतिम साकारलेत, म्हणजे आजच्या पिढीशी आजच्या पिढीच्या भाषेत स्वामी समर्थ (पोशाखासाहित) त्यांच्याच भाषेत संवाद साधतात ही कल्पना तर खूप अप्रतिम. तसे बघायला गेले तर एखाद्या विशिष्ट देव-देवतेची महती सांगणारे खूप च चित्रपट येउन गेलेत, येउन जात ही असतात पण त्यांचा दर्जा मात्र तितकासा उत्तम नसतो पण हा चित्रपट मात्र भक्तीपट ह्या पातळीवर राहत नाही आणि एक उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान देतो.


चित्रपट पाहिल्यावर साधारण डोक्यात विचारचक्र  चालू  होते  की दृष्टांत वगैरे  घटना असाव्यात का किंवा  प्रचीती वगैरे अशा गोष्टी शक्य  आहेत  का?  आताच्या काळाला सुसंगत असा विचार केला तर त्याचे उत्तर कदाचित नाही असे असणे शक्य आहे पण हेच जर आपल्या मागच्या पिढीला विचारले तर ते कैक उदाहरणं उभी करतील. माझ्या स्वतःच्या घरात आमचे आई-बाबा ४-५ उदाहरणं बोलता बोलता सांगतील. कारण काही घटना अशक्य कोटीतून घडलेल्या असतात आणि त्याच्या मागे निव्वळ योगायोग असू शकतो पण त्याच्या पाठी काही तर्कसंगती न लावता आल्याने तय योगायोगाला प्रचीती आली वगैरे म्हणणं  शक्य आहे . उदाहरण  द्यायचे झाले तर माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. रात्री २ वाजता ची गोष्ट!!! २ वाजता कुठलेही वाहन मिळण्याची शक्यता दुरापास्त आणि मला कोणाला (शेजारी पाजारी किंवा मित्र) मुद्दाम त्रास देणे सोयीस्कर वाटत नव्हते.  मी खाली काही वाहन मिळते का बघायला उतरलो आणि त्याच वेळेला नेमका बाजूच्या सोसायटीमधे एक कॅब  सोडायला  आली होती आणि तो आम्हाला इस्पितालापर्यंत घेऊन जायला तयार झाला. आता जर तो कॅब वाला नसता आला तर मित्राला वगैरे बोलावणे गरजेचे होते आणि तसे केले गेले ही असते पण योगायोगाने कॅब मिळाली.  आता हे आई - बाबांना विचारल्यास स्वामी पाठीशी होते म्हणून लगेच कॅब मिळाली अशा शब्दात मांडून कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा विचार करता त्यात काही चुकीचे नाही. पण आपण त्याचा अर्थ काय लावावा?  शेवटी बराच विचार केल्यावर मी एक सोप्पे उत्तर शोधले शेवटी श्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ज्याने त्याने आपल्या बुद्धी आणि अनुभवाप्रमाणे त्याचा अर्थ लावावा कारण काही गोष्टीना वैश्विक परिमाण लावता येत नाही हेच खरे!!!!!

Monday, 19 October 2015

सासुलीचा योगी श्री सावत्या!!!

लाह्या व्हाया, लाह्या व्हाया!!!असा काहीसा आवाज बस मध्ये ऐकायला आला की आम्हास समजायचे बेलापूर आलेले आहे आणि पाच एक मिनिटात ऑफिस मध्ये पोहोचणार,  किंवा अचानक रेड्याचा आवाज ऐकायला यायला लागला की आम्हास समजायचे आता पांडवकडा आलाय . आणि मग आम्ही आमची झोप आवरायला लागायचो.असले उद्योग कोण करणार .सावत्याच.आमचे बस मधले घड्याळच म्हणा.फक्त यांत्रिक घड्याळ आणि हे मानवी घड्याळ ह्यातला फरक की ह्याचा आवाज ऐकला की आमच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर नकळत उमटायची.

सावत्याची आणि माझी ओळख गेल्या २-२.५ वर्षातीलच आणि तशी  ही अनावधानानेच झालेली ....माझ्यावर lead  पणाची नवीन वस्त्र चढवण्यात आली होती आणि त्या प्रोजेक्ट ची सुरवात होती. सिविल मधला एक designer चांडेल म्हणून, त्याचे माझ्याविषयी फार चांगले मत होते (वास्तविक सिविल आणि माझे department  एकमेकांना पाण्यात बघतात). पण तो त्याच्या department  मध्ये नवीन होता आणि तिथे त्याला फारशी कोणाची मदत मिळायची नाही बहुदा. तर त्याच सुमारास हा सावत्या ही रुजू झाला आणि त्या चांडेलने सावत्याशी माझी ओळख करून दिली. सुरवातीला मी त्याच्या कडे दुर्लक्ष करायचो  कारण तो चांडेल मला 'सर' म्हणायचा आणि माझ्या टीम मधले बाकीचे ही आणि हा सावत्या मात्र चक्क अरे तुरे. नाही म्हटलं तरी जो काही खरा खोटा , फुकाचा अहंकार होता तो त्या मुळे डिवचला गेला होता. त्याला गावावरून येउन बहुदा फार महिने उलटले नव्हते. गावचा अघळ पघळ  पणा  आहे तो त्याच्या वागण्याबोलण्यात असायचा आणि मग आपोआप अशा लोकांना आपण परीट घडीचे लोक सहसा जवळ उभं करीत नाही, त्यातलाच तो प्रकार.त्याला फार जाणवू दिलं नाही पण त्यातलेच. त्यात पुन्हा तो बस मध्ये पाठी येउन बसायला लागला आणि माझ्या आधीच्या stop वर चढायचा आणि माझी नेहमीची जागा बळकावायचा. मग खिडकी साठी लोकांच्या मिनतवाऱ्या मला काढाव्या लागायच्या.  आता तो अजूनच डोक्यात गेला होता. पण एकदा संध्याकाळी बस मधून येताना work pressure विषयी आमची चर्चा सत्र घडत होती आणि खूप शॉट लागला होता डोक्याला! तेव्हा मध्ये पडून सावत्याने फारच करमणूक केली आणि वातावरण निवळल. मग  जरा जाणीव झाली की सावत्या हे रसायन काही वेगळं आहे. मग त्या रसायनाचे पृथक्करण करून गुणधर्म जाणून घ्यावेसे वाटू लागले. माझं पृथक्करण सांगत एकदम पारदर्शक माणूस.आत एक बाहेर एक असं असणं शक्यच नाही आणि सदानकदा हसरा  चेहरा. त्याच्या बरोबर असताना dull  वाटणारच नाही. आणि म्हणून कदाचित माणसांचा त्याच्या भोवती गराडा आढळून येईल. एक उत्तम कलाकार, उत्तम वक्ता. पूर्ण गुणधर्म मांडायचे तर कदाचित ग्रंथ लिहावा लागेल पण आवर्जून सांगायचे म्हणजे उपमा देण्याच्या बाबतीत तर त्याचा हात कोणी ही धरू शकत नाही. कोटीच्या बाबतीत तो थोडा कमी आहे ..पण राहिला असता थोडे दिवस माझ्याबरोबर तर ते हि शिकला असता ;). त्याची बडबड ऐकली म्हणजे माणूस उदास राहूच शकत नाही. अचानक आपल्यात ही उर्जा येते .उर्जेचा स्त्रोतच जणू !!!!


हयाच्याकडे सांगण्यासारखे किस्से बरेच असायचे. त्यातून हा कलाकार माणूस , त्यामुळे तो हातवारे करून विलक्षण रीतीने रंगवून सांगायचा (थोडक्यात भूमिकेत शिरला की  आवरणे कठीण जायचे). त्या किस्श्यापैन्की दशावतारी नाटकात घडलेले ;अवंती पुरी नगरीतील राजाचा' आणि 'ठो' हे किस्से तर अजून ही  आठवले तरी हसून दमछाक होते. त्याच्या किस्स्यांमुळे सावत्या एकदम प्रसिद्ध झाला आणि हळू हळू तर अक्खी बस सावत्याचे किस्से ऐकण्यास पाठी गर्दी करू लागली. सावत्याकडचे किस्से हळूहळू संपत आले आणि आमची अजूनची भूक काही मिटत नव्हती मग आम्ही काही न काही (म्हणजे मी, पाटील न गिरीश नामक व्यक्तिमत्व) कारण काढून  किंवा काही विषय काढून सावत्या ला गिऱ्हाईक करू लागलो . ९५-९६% हा  खेळी मेळीने समोर जायचा आणि १ तासाचा कंटाळवाणा आमचा प्रवास  सुखकारक व्हायचा.
रडणं आणि दारुड्याचा अभिनय तर हुकमी.  एकदा असेच आम्ही barbeque  nation  मध्ये जिभेचे चोचले पुरवायला गेलो होतो.  तेव्हा इतर कोणाचा तरी वाढदिवस असावा आणि त्यांनी केक कापल्यावर barbeque  nation  वाल्यांनी  "Happy  Birthday to you " हे गाणं वाजवलं आणि हा भाई अचानक देह भान आणि जागा विसरून नाचायला लागला. लोकांना वाटलं दारूचा अंमल चढला असावा म्हणून विचित्र आणि सहानुभूतीपूर्वक नजरेने लोक त्याच्याकडे आणि कोणत्या ग्रुप बरोबर आलाय म्हणून आमच्याकडे पाहायला लागले आणि आम्हास एकदम मेल्याहून मेल्यासारखे झाले. ते बेअरिंग त्याने शेवट पर्यंत कायम ठेवले आणि ते एवढे हुबेहूब वाटले होते की आम्ही हॉटेलच्या खाली बिल भरून येणार्यांची वाट पाहत होतो आणि एक जोडपे बिल भरून खाली आले आणि त्यातल्या बाप्याला काही विसरल्याने परत वरती जावे लागले आणि तो खाली येईपर्यंत त्या बाईने सावत्याचा अभिनय पाहिला असावा. आम्हाला पास होताना ती बिचारी नवऱ्याला बिलगून आणि सावत्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून पाहत जात होती. माझी हसून हसून वाट लागली आणि जाऊन त्या बाईला सांगावेसे वाटले की अहो त्याने अजिबात घेतली नाहीये फक्त तो अभिनय करतोय. आयुष्यभर हा प्रसंग विसरू शकत नाही.

प्राणीमात्रांविषयी त्याचे प्रेम तर एवढे अफाट आहे की शब्द नाहीत. खास करून त्याच्या गावच्या घराच्या आसपास किंवा त्यांचे पाळीव प्राणी ह्यांच्या विषयी. म्हणजे गाई- म्हशी, रेडे, कुत्रे इत्यादी इत्यादी. ह्यातल्या कुठल्याही प्राण्याला लांबून पाहूनच तो त्यांना काय झालाय किंवा त्यांचा मूड काय आहे वगैरे व्यवस्थित सांगू शकतो. आमच्या ऑफिसच्या जवळच एक टपरी आहे चहाची. तिथे आम्ही कधी चहा प्यायला गेलो की आजूबाजूचे कुत्रे  जमा होतात सावत्याच्या भोवताली (म्हणजे ते भूतदया अंगात भिनवलेले गुज्जू, बिस्कीट घेऊन आले कि जसे जमतात तशातला प्रकार नाही बरं का). प्राण्यांना म्हणे sixth sense  असतो. त्या sixth  sense  मुळेच असेल कदाचित त्यांना त्यांचा स्वामीच आल्यासारखे वाटत असावे ... म्हणूनच आम्हीपण सावत्याला 'दत्तगुरू' म्हणतो. सध्या तो मोरोकको ला गेलाय. त्याला तिथल्या सगळ्याच गोष्टी आवडल्या असणार आणि तिथे तो रुळला ही व्यवस्थित पण तिथली एक गोष्ट त्याला खटकतेय (तो बोलला नाही कोणाला पण मला नक्की माहितेय) की तिथे त्याचे सवंगडी नाहीत.त्यांचा तिथे मुक्त वावर नाही, पण नक्कीच तो पुष्पक मधील कमल हसन प्रमाणे त्यांचे आवाज ऐकत असणार आणि दर्शन घेत असणार.

आम्ही त्याला परोपरीने समजावून सांगतो की त्याचं क्षेत्र चुकलंय .बरेचसे वेगवेगळे option ही सुचवतो पण तो त्याला आमची नेहमीची फालतुगिरी समजतो आणि सोडून देतो. ओमानला आल्यापासून मी मिस करत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सावत्या आणि इतर BAGPACKERS बरोबर केलेली धमाल. बाकीच्या सगळ्यांना प्रत्येक भेटीत भेटणं शक्य झालंय पण सावत्या महाराजांचं काही न काही कारणाने अजून दर्शन झालेलं नाही आणि पुढील भेटीत ही होईल असा वाटत नाही.

सूर्याचे वर्णन काजवा काय करणार. काजव्याचा प्रकाश लिहून लिहून कमी होत चाललाय म्हणून इथेच आटोपते घेतो.


सावत्या महाराजांचा आज प्रकट दिन आहे त्यानिमित्त हा लेख त्यांना समर्पित आणि प्रकट दिनाच्या ह्याच शुभेच्छा की बेलापूर - jacobs प्रमाणे Morocco - Jacobs मध्ये ही सावत्या महाराज प्रसिद्धीस पावतील ..आता त्यांच्यातील मोठे पणास अनुसरून ते म्हणतील  की आता मक्या तू नाही मग मला प्रसिद्धी कोण देणार पण त्यास माझे इतुकेच म्हणणे आहे की 'हिऱ्याची चकाकी काही लपून राहत नाही'

Sunday, 30 August 2015

वळू (Highway च्या निमित्ताने पुनच्छ)

हायवे च्या प्रसिद्धी च्या निमित्ताने कुलकर्णी बंधू (आडनाव बंधू फक्त) चला हवा येऊ द्या (CHYD ) मध्ये आले होते (सध्या tv वर हाच  कार्यक्रम माझ्या दृष्टीने बघण्यालायक आहे) ... त्यांच्या आधीच्या सिनेमांवर CHYD च्या टीम ने विडंबन केले होते देवळू आणि आणि अजून एकदा त्या सिनेमांचे पारायण करण्यात आले... हे दोन्ही सिनेमे माझे अत्यंत आवडीचे आहेत आणि एकमेव कारण म्हणजे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या खेडेगावातील जीवनाची आणि व्यक्तिरेखांची अत्यंत मिश्किल पद्धतीने पेश केलेली अदाकारी .... त्यातल्या त्यात ही वळू माझ्या जास्ती जवळ आहे म्हणूनच ह्यातील काही पात्रांवर मला लिह्सावेसे वाटले कारण आपले म्हणणे लिखित किंवा चर्चित (म्हणजे गप्पांच्या) स्वरुपात समोर पोहोचवता येते त्यातील एका समुद्रापार गेल्याने चर्चित हा पर्याय सध्या बंद आहे .....म्हणून हा दुसरा (sorry पहिला) पर्याय .... आणी हे वाचल्यावर कदाचित तुम्हाला हे वळू पहायची इच्चा झाली तर माझे लिखाण यशस्वी ह्या प्रकारात मोडेल आणि समीक्षक म्हणून काम करण्याचा पर्याय हि माझ्यासमोर उभा राहील ;) ;)
थोडक्यात वळूचं कथासार म्हणजे कुसवडे  गावात, एक वळू आहे,  बैल, जो सहसा एक पवित्र आणि देवाला वाहिलेला असतो ज्याची जवाबदारी गावावर असते... पण अलीकडे, वळू फार आक्रमक झालाय   गावात घडणाऱ्या प्रत्येक गोंधळास आणि नुकसानीस वळूस जवाबदार धरले जाते ... आता वळू पकडणे म्हणजे गावात सत्ता प्रस्थापित करण्यासारखे अशा थरास प्रकरण गेले आहे आणि काही काठावरच्यांना वळू च्या निमिताने स्वतःचा स्वार्थ साधायचाय.
चित्रपटात दोन नेत्यांमधला संघर्ष,  ह्या सगळ्या घडामोडीत फुलणारी प्रेम कथा; एक माहितीपट करू इच्चीणारा हौशी नवशिक्या तरुण दिग्दर्शक ; एका धार्मिक कार्याप्रमाणे ह्या अनागोंदीचे नेतृत्व करणार फोरेस्ट  आणि वळूचे मन समजून असलेली गावाने बहिष्कार घातलेली  कोण एक वेडी  स्त्री ह्या सगळ्यांचा एक कोलाज आहे
 वळू मध्ये जीवन्या म्हणजे गिरीश कुलकर्णी हा सरपंचाचा 'नारायण' दाखवलाय.... गावाला वाहून घेतलेला जीवन्या,  .सरपंचाचा खास माणूस, पण एकदम सड कि फट, बोलताना कसली ही आणि कोणाची ही भीड बाळगणारा , साधारण अंदाज घेतला तर अशी माणसं असतात आपल्या अवती भवति , हा एकमेव प्राणी असा की ज्याला वळूच्या त्रासाच्या नावाखाली कसलं ही काम करून घ्यायचं नाही, फक्त गावाला असलेल्या वळूच्या त्रासातून मुक्त करायचं ..... पण हा जीवन्या जितक्या बेरक्या आहे तितकाच हळवा आहे  आणि एकदम मनाला भिडणारा आहे...अभिनेता म्हणून पहिलीच भूमिका सकारात असताना गिरीश कुलकर्णी जीवन्या इतका लाघवी केलाय की दिग्गजांच्या भाऊ गर्दीतही भावतो ...

सरपंच आणि त्यांची सौ हे आणखीन वल्ली ....गावाला पूर्णतः त्यांनी स्वतःच्या कह्यात ठेवलंय... विरोधकांना काही करून दाखवायची संधी ही नाही द्यायचीय ....म्हणूनच वळू चा मुद्दा ऐरणीवर आल्यावर ताबडतोब त्यांनी सरकार आणि वन विभागाची मदत मागितली आणि गावातला तरुण विरोधक आबा ह्याच्या परस्पर मुसक्या बांधल्या .... बरं एवढं सगळंअसून ही स्वतःला मिरवून घ्यायची हौस काही कमी नाही.... गावात documentry काढण्याचा कार्यक्रमाच्या आरंभी नारळ फोरेस्ट च्या हस्ते वाढवणार म्हटल्यावर ' आम्ही यायचं की नाही' हे वाक्य म्हणजे कळस आहे आणि हे वाक्य म्हणताना त्यांनी केलेला अभिनय निव्वळ दाद देण्याजोगा ... सत्तेमुळे आत्ममग्न झालेल्या व्यक्तीचं प्रतिबिम्बच... आणि त्यांच्या सौ, सरपंच बाई, एकूणच संसारातून निवृत्त झाल्यासारख्या (जे साधारण ५५-६०व्य वर्षी कुठल्याही संसारात होऊ शकतं) पण हातातून सुटत काही नाही आणि वय झालं तरी  मिरवणंही सुटत नाही ... त्या documentry च्या कार्यक्रमाच्या वेळी नारळ देताना बाई अगदी लहान नारळ शोधून काढतात आणि स्वतः देवळात स्वतःची घरी येत नाही म्हणून नथ बीथ घालून एखाद्या मंगल प्रसंगी जाव्या तशा स्वतः देवळात स्वतःची documentry काढायला जातात... अशाच एका प्रसंगी गावातला एक जण फिर्याद घेऊन येतो ....त्या वेळी सरपंच त्याला म्हणतात आपण चहा घेऊन जाऊ पण हा गडी गरम झाला  असल्याने चहा बिहा नको म्हणतो तेव्हा बाईंच चहा किती कप टाकायचा हा आलेला प्रश्न म्हणजे त्यांच्या कंजूस स्वभावाची झलक देऊन जातो आणि त्या थोड्याशा तणावाच्या प्रसंगी ही हास्याची लकेर उमटवून जातो.

एकंदरीतच documentry (वळू ला पकडण्या आधी त्याच्या विषयी माहिती काढण्याचा प्रयत्न) हा गावातल्या लोकांचा स्वभाव वैशिष्ट्य दाखवण्यासाठी उत्तम रीतीने वापरलाय आणि ती documentry वळू ची राहता ती गावकर्यांची documentry होऊन जाते.
आबा हे character म्हणजे अर्क आहे .... गावातलं 'तरुण नेतृत्व' ....सरपंचांचा विरोधक ...bullet आणि ray- ban ही खास ओळख आणि असं कोणीतरी गावात असतंच.... 'वळू'च्या राजकारणात आपण अण्णा (सरपंच) च्याआधी वळू ला पकडून अण्णाना शिकस्त देऊन गावाला आपल्या कह्यात आणावे म्हणून आबाचे प्रयत्न ...त्यासाठी खोटी अफवा उठव, स्वतःच दावे आणून रात्रीस (ray-ban सह) वळू ला पकडायला जा असले  कारनामे चालू असतात .... आबा हे पात्र नंदू माधव ने खास रंगवलंय....   फोरेस्ट आबाला 'लंगडी गाय' समजून  अगदी सहज पणे बोलून जातो उद्या सकाळी आपण मिळून वळू पकडू तेव्हा आबा ने 'ओके ना ' म्हणून जी प्रतिक्रिया दिलीय ती निव्वळ दाद देण्याजोगी ....त्याच्या सगळ्या भाव भावना एका वाक्यात समोरच्या पर्यंत (पक्षी प्रेक्षकापर्यंत) पोहोचतात ...climax च्या वेळी फोरेस्ट उत्साहात इंग्लिश मध्ये सूचना देत असतो आणि लोक थोडा गोंधळ घालत असतात त्या वेळी आबाला त्यांना आवरायला सांगतो त्या वेळी आबा हि एकदम उत्साहात आपल्या ला इंग्लिश येतं हे दाखवण्यासाठी hey don't बोलून  पुढे काही सुचल्याने थांबतो त्या वेळचा अभिनय  निव्वळ अप्रतिम ... तो प्रसंग मी किती तरी वेळा पाहिलाय त्याची कितीही आवरताना अजून होऊ शकतात .....

तसच गावातलं एकमेव ब्राम्हण कुटुंब  जे सर्वत्र पाहायला मिळतं त्या प्रमाणे सगळ्या पक्षांना सांभाळून असतं ..आणि साधारण ब्राम्हण कुटुंबात पाहायला मिळतं त्या प्रमाणे बायकोचा वरचष्मा असलेलं कुटुंब, तसाच तो सुरेश कामधंदा सोडून आबा ला वाहून घेतलेला आणि त्या मुले बायकोच्या रोषाला बळी पडलेला, आणि बायकोच्या इच्छेनुसार पोरीच्या नाकाची डॉकुमेंत्र्य व्हावी म्हणून अर्ध्या रात्रीत बाहेर पडलेला , संगी आणि शिवा हे गावातले love birds आणि त्यात ही स्वतःची शेती सोडून शहरात रिक्षा चालवून पैसा कमावण्याच्या विचारात असलेला  शिवा हे कुठेही गेलं तरी chatkan आढळू शकतात .... लपून छपून प्रेम करणारे bollywood  ने प्रेरित होऊन पळून जाण्याचा प्लान करणारे संगी शिवा काय किंवा जीवन्याची आई , वेडी जनी (कुठल्याही गावात एखादी तरी वेडी व्यक्ती असतेच आणि माणसांनी टाकून दिएल पण जनावरांनी साथ  दिल्याने त्यांच्यात रममाण झालेली) , गावातला सर्वर ज्येष्ट , आदरणीय मार्गदर्शक आजा ह्या व्यक्ती ही अगदीच common  कुठल्याही गावात आढळणाऱ्या .....आणि ह्या सर्व व्यक्ती आपल्याच अवतीभवती आढळतात थेट आपण रिलेट करू शकल्यामुळे कायम लक्षात राहिल्या ...

संपूर्ण चित्रपट पाहताना चेहऱ्यावर हास्यरेषा कायम राहते आणि ती मोठी होत जाते पण लहान कुठेच होती नाही खूपच वेगळा अनुभव ह्या सिनेमाने दिल्यामुळे माझ्या अत्यंत जवळच्या  चित्रपटांपैकी एक...

देऊळ मध्ये ही नानाचा आमदार, कळसूत्री बाहुली प्रमाणे असलेली सरपंच बाई, नवीन उभे राहणारे नेतृत्व, शहरात राहिलेला म्हणून शहाणा असं audience , गावच्या टपरीवर निव्वळ वेळ घालवणारी तरुण टाळकी , तरुण नेतृत्वास हवा देणारा पत्रकार ही नेहमीच आढळणारी माणसं, त्यांच्या विषयी पुन्हा केव्ह्तरी

अशी अविस्मरणीय व्यक्तिमत्व पु.लंच्या गणगोत किंवा व्यक्ती आणि वल्ली नंतर प्रथमतःच साकारली गेली असतील असं मी विधान केल्यास अतिशयोक्ती ठरू नये...


आणि म्हणूनच त्यांच्या Highway बद्दल खूप खूप उत्सुकता आहे पण थोडी कळ सहन करावी लागणार आहे  ह्याचा खेद ही  वाटतोय .... असो पण गिरीश आणि उमेश कुलकर्णी ह्यंच्या HIGHWAY वरील प्रवासास खूप खूप शुभेच्छा आणी ही सेल्फी नक्किच काळजात आरपार घुसेल ही अपेक्षा

Monday, 15 June 2015

अरण्यानुभव

माझ्या मित्राचा मेसेज आला की मे महिन्यात ते व्याघ्रगणती साठी नागझिरा अभयारण्यात जात आहेत आणि मी थोडा अस्वस्थ झालो ..... ओमान मध्ये आल्यापासून मी एक गोष्ट फार मिस करतोय ती म्हणजे भ्रमंती ..... भारतात असताना दर २-३ महिन्यातून कुठे न कुठे जाणे  व्हायचेच ...मित्रांबरोबर म्हणा, कुटुंबासमवेत म्हणा ... पण इथे त्या गोष्टीना आळा बसलाय ...एक तर फिरण्यासारखं फार नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच वाहन नाही अजूनपर्यंत तरी ...असो ....तर तो मेसेज वाचून फक्त पुढच्या वर्षी आपण परत जाऊ रे असं म्हणून समाधान करून घेण्याविषयी पर्याय नव्हता ... पुढचे दोन तीन दिवस मी माझ्या मागच्या जंगल सफरींच्या आठवणीत हरवून गेलो

लहानपणी मोगली पाहून साधारण प्रत्येकाच्याच मनात जंगलाविषयी एक उत्सुकता निर्माण होते आणि गोष्टी ही साधारण पक्षी - प्राण्यांच्या ऐकवल्या जायच्या...आणि जसे मोठे व्हायला लागतो तसे  Discovery आणि NGC ने wild life विषयी उत्कंठा पार शिगेला पोहोचते ..माझ्याही बाबतीत असे घडले पण हे सध्या कसे करता येईल ह्या विषयी फार माहिती नसल्याने म्हणा किंवा awareness नसल्याने म्हणा ह्या सर्व गोष्टी फक्त मनातच राहिल्या ...आणि मग  ती सगळी तहान  फक्त पुस्तकं/लेख  आणि tv ह्या वरच भागवू लागलो ....मग जस जसा स्वावलंबी झालो आणि जस जसे विश्व विस्तारत गेले  तसे सम आवड असणाऱ्या लोकांशी मैत्री वाढत गेली आणि अशाच काही मित्रांबरोबर एकदा कान्हाला जायची संधी मिळाली .... पहिलाच अनुभव खूप झकास होता... आम्ही जेमतेम एक दिवस जंगलात होतो आणि दोन सफारी (सफारी म्हणजे जंगलभ्रमंतीसाठी साठी सरकारतर्फे प्रश्क्षित आणि परवानाधारक चालक आणि guide अशा २ व्यक्तींनी सज्ज असे वाहन) बुक केल्या होत्या ...सकाळची आणि संध्याकाळची ....सकाळी तर हरणं, गवे आणि मोर ह्यांच्याशिवाय फार काही नजरेस नाही पडलं आणि संध्याकाळी ही जंगलच्या राजाने आम्हास हुलकावणीच द्यायचं ठरवलं होतं आणि जसजशी आमची जीप जंगलाच्या बाहेर पडायची वेळ जवळ आली  आणि मनात नैराश्य दाटू लागत असताना  चमत्कार घडावा  त्याप्रमाणे बिबट्या, साक्षात वाघोबा आणि जंगली कुत्रे ह्यांनी दर्शन दिले आणि नैराश्याची जागा शब्दातीत आनंदाने घेतली ...खूपच अविस्मरणीय अनुभव होता

पुनश्चः हा अनुभव घेता यावा व कुटुंबास ह्या आनंदात सहभागी करून घ्यावे ह्या उद्दिष्टाने परत एकदा कान्हास जायचे ठरवले ....तसे ही सौ. नी नवीन कॅमेरा भेट दिला होता व तो कॅमेरा मुक्तछंदात वापरण्यासाठी जंगलापेक्षा दुसरी उत्कृष्ट जागा नसावी आणि पक्षी प्रेमाचे ('पक्षी,' फोटोग्राफी) चे भरते आले होते आणि काही पक्षी ओळखावयास ही शिकलो होतो .... एकंदरीत कान्हास जाण्यासाठी बरीच कारण पाठीशी होती...
 कान्हास आमचा मुक्काम ३ दिवसांसाठी होता...आम्ही सकाळची जंगल सफारी घेतली होती आणि संध्याकाळी nature  walk , आदिवासी वस्तीस भेट, लोकनृत्य वगैरे साठी राखीव होती...साधारण सूर्योदयाच्या वेळेस आम्ही जंगलात भ्रमंतीसाठी निघायचो.... आमच्या बरोबर आमच्या जिप्सीत डच जोडपे होते... आम्ही राहिलेलो त्याच resort मध्ये  उतरले होते.. साधारण नोव्हेंबर महिना असेल एवढी कडाक्याची थंडी होती की विचारता सोय नाही,.... मुंबईत एवढ्या वर्षात कधीच अनुभवली नव्हती..आम्ही  घोंगडी घेऊन आणि गरम पाण्याच्या पिशव्या सोबत घेऊनच जायचो... तरी ही फोटो काढण्यास हात घोंगडीच्या बाहेर काढावयास धजावायचो नाही....आणि दाट  जंगल असल्याने सुर्य दर्शन व्हावयास किमान ८ तरी वाजायचे आणि थंडी कमी होण्यास १० तरी....आणि ११ पर्यंत तुम्ही जंगलातून बाहेर पडायचे असते....आमची अशी  अवस्था व्हयाची तर प्राण्याची काय सांगा.... थोडक्यात व्याघ्रदर्शन होणे कठीण च होते.... कारण जंगलात प्राणी पक्षी साधारण पाणवठ्यावर च दिसतात ..... थंडीच्या दिवसात ते तरी कशाला लवकर बाहेर पडतील...अगदीच एखादा भक्ष्याचा शोधात निघाला तर...


सफारीला निघण्याच्या आधी naturalist म्हणून रेसोर्त मध्ये असलेल्या देशपांडेनी प्राथमिक माहिती दिली आणि आमची उत्सुकता खूपच वाढवली .... मुन्ना नावाच्या वाघाविषयी त्यांनी फार उत्सुकता निर्माण केली....त्यच्या कपाळावर म्हणे cat  नाव तयार झालाय रेघानी .....एवढंच नव्हे तर कान्हातला लांबी ने सगळ्यात मोठा .. आम्हाला आता तर तो पाह्याचाच होता .... जंगलात जायचं ते वाघासाठीच हा समज पक्का आहे आणि तिथले गाईड आणि चालक पण वाघाच्याच माघावर निघतात ..... येणाऱ्या जाणाऱ्या गाईड्स आणि चालकांना विचारतात  ...त्यांच्या कडून माहिती काढायचा प्रयत्न करतात कि कुठे दिसला का..मग त्या अंदाजाने निघतात.... एखाद्या ठिकाणी १०-१५ मिनिटे वाट बघत थांबतात ....एखाद्या जिप्सीला वाघ दिसला असले तर विचारायची गरज च नसते ...त्यांचे चेहरेच सांगत असतात ....
ह्या चालक किंवा वाटाद्यांनी त्या भागात दिसणाऱ्या वाघांना नावं दिली आहेत त्या वाघांच्या दिसण्यावरून/सवयीवरून किंवा तत्सम प्रकारे आणि ते त्याच भाषेत बोलतात उदाहरणार्थ एका वाघाचा आपापसातील लढाईत कानाचा तुकडा निघालाय तो कनकटा, एक वाघीण सारखी पाण्यात असते तर ती मछली  वगैरे आणि सदहार्ण २ जिप्सी एकमेकांसमोर आल्या की संभाषण साधारण असे , 'दिखा क्या कोई?... नही रे ...बहादूर अभी अंदर गया है किंवा मुन्ना कि दहाड सुनाई दी शायद यही से आयेगा" वगैरे,  ऐकून खूप मज वाटते आपल्या आशा पल्लवित होतात आणि वाटते की जणू हे सर्व ह्यांचे पाळीव पशूच आहेत कि काय
एकंदरीत  २ दिवसाच्या सफारीत वाघ काही दिसला नाही पण नीलगाय, barking दीर वगैरे प्राण्यांनी दर्शन दिले

ह्या काळात पक्षी निरीक्षण मात्र समाधान कारक झाले ....फोटोही  बऱ्यापैकी काढता आले पण वाघोबांनी काही दर्शन दिले नाही....पण वाघ दिसला नाही ह्याचे आमच्यापेक्षा जास्त वाईट त्या रिसोर्ट मधल्या कर्मचारीवर्गालाच झाले असावे ... एकंदरीतच गावातली माणसं फार साधी असतात आणि पाहुणोपचार त्याच्ज्या कडून शिकवा असे माझे मत आहे ....माझ्या पहिल्या सफरीच्या वेळी मी अनुभवले होते आणि आता हि मी अनुभवले ....पहिल्या वेळी सकाळी आम्हास वाघ नाही दिसला तर आमच्या जिप्सीच्या चालकाने दुपारच्या सफरीस स्वतःच्या मुलीस आणले होते कारण ती असली कि वाघ दिसतोच हा त्याचा विश्वास आणि तो त्या वेळीही सार्थ ठरला ...माझ्या ह्या भ्रमंतीच्या वेळी आमचा कर्मचारी वर्ग हळहळलाच पण तिसऱ्या दिवशी आमच्याकडे मोकळा वेळ होता सकाळी कारण आम्ही दुपारी निघणार होतो तर त्यांनी आम्हास संगितले की सकाळच्या वेळेस तरी करून बघा परत एक सफारी करून... बारा एवढाच बोलून ते थांबले नाहीत तरत त्यांनी आम्हास सफारी मिळावी ह्या साठी प्रयत्न पण केले....म्हणजे साधारणतः सफरीच्या बुकिंग महिने - २ महिने आधीच झालेल्या असतात आणि आयत्या वेळी राखीव ५ (ज्या आमदार/खासदार किंवा तत्सम VIP लोकांसाठी राखीव असतात ते जर त्या दिवशी नाही आले तर मग जनसामान्यांसाठी खुले करतात) मध्ये जागा मिळावी म्हणून रात्रभर रांगेत उभे राहून आमच्यासाठी सफारी मिळवली .... पण आमचे नशीब मात्र साथ देण्यास राजी नव्हते ....
पण वाघाचे दर्शन वगळता अनुभव फार छान होता...अप्रतिम फोटो निघाले काही पक्ष्यांची ओळख झाली ...... माणुसकीचे दर्शन झाले आणि एक मात्र कळले की जंगल वर वर कितीही शांत दिसत असले तरी तिथे प्रत्येक क्षणाला काही न काही घडत असते आणि ते टिपण्यासाठी तुम्ही फारच सावध असले पाहिजे ...आणि मुख्य म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष न केंद्रित करता आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यास शिकले पाहिजे....

मगाशी वर उल्लेख केलेल्या देशपांडे विषयी .....रिसोर्ट वर रात्री जेवणानंतर कॅम्प फायर लावत आणि तिथे सर्व गोरी मंडळी (प्रामुख्याने गोरी मंडळीच रिसोर्ट मध्ये होती) मदिरेचे घुटके घेत चर्चा करत बसलेली असत .... आम्हीपण  उब घेण्यासाठी बसायचो तेव्हा ते देशपांडेहि आले आणि चर्चा करता करता सहज विचारले की पुण्याहून थेट मध्य प्रदेशात तेही अशा छोट्या गावी ...तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराने थोडे              व्हायला झाले ......त्यांच्या म्हणण्याप्रमाणे , बरोबरीचे मित्र खूप च पुढे गेले , मला हि कुटुंबाच्या बाबतीत तडजोड करावी लागते पण कामाच्या बाबतीत मात्र मी खूप समाधानी आहे ....ज्याची आवड आहे त्याच गोष्टीत काम करायला मिळतेय हि खूपच समाधानकारक बाब आहे ...हे वाक्य अजूनही जसेच्या तसे माझ्या लक्षात आहे ... आणि त्या देशपांडेचा हेवा वाटत राहतो

आम्ही अनुभवलेले अरण्य   

Saturday, 24 January 2015

आग्र्याहून सुटका

ना. स. इनामदारांची शहेनशाह वाचत असताना आग्र्याहून सुटका हा प्रसंग आला आणि आग्र्याहून सुटका होवोस्तोवर विचारांना बरेच खाद्य मिळाले.  ऐतिहासिक कादंबरी खुलवण्यात त्यांचा हातखंडा आहेच त्या विषयी काही दुमत नाही.... वाचताना विचारचक्र चालू होण्याचे प्रसंग अनेकदा आले पण त्याची उत्तरे पुढे जाताना मिळत गेली किंवा स्वतःला तर्कसंगती लावता आली पण इथे मात्र कोडं न सुटल्यात जमा आहे... कारण तसा काही दस्तऐवजच नाही किंवा माझ्या वाचनात आला नाही आणि अजून time machine  हा फक्त fantacy चा भाग असल्याने इतिहासात जाऊन शोधून काढू शकत नाही :)

तर महत्वाचा मुद्दा की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले म्हणजे पेटाऱ्यान्मधून पळाले हे खरोखरच घडले की ही निव्वळ दंतकथा आहे आणि आग्र्याहून सुटका औरंगझेबाने होऊ दिली (अप्रत्यक्षपणे) की मिर्झाराजे जयसिंघ ह्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे ..... कारण औरंगझेबाच्या कैदेतून पळून जाणे हि वाटते तेव्हढी आणि जितक्या सहज इतिहासाने सांगितली तेव्हढी सोपी गोष्ट नाही.....

औरंगझेब हा बाकी कसा ही असला तरी मुरलेला राजकारणी आणि हल्लीच्या भाषेत सांगायचे तर एकदम shrewed होता हे मान्य करावेच लागेल....त्याशिवाय दारा शुकोह आणि बाकीच्या 2 भावाचा बिमोड करून तख्त वर बसला होता आणि खास करून दारा शुकोहचे दिल्लीवर वर्चस्व असून आणि राजपुतांची साथ असून ही त्याचा त्याने व्यवस्थित बिमोड केला होता ....आणि औरंगझेब किती पाषाणहृदयी होता मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही .तख्तावर बसण्यासाठी आणि ते राखण्यासाठी तो काही ही करू शकत होता........एवढा सगळं असून ही महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन सटकले असे म्हणणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा होईल कदाचित कारण त्याला जाणीव होती की त्याच्या तख्ताला राहता राहिला धोका फक्त दक्खनच्या बगावतखोर जमीनदार सिवा (म्हणजे शिवाजी महाराज)  कडून आहे आणि ताक ही फुंकून पिणाऱ्या माणसाकडून दुधाचे भांडे सरळ तोंडाला लावले जाईल ह्यावर थोडा विश्वास बसने कठीण होतेय

मुळात शिवाजी महाराज आग्र्याला मिर्झा राजा जयसिंघाने जवाबदारी घेतल्याने औरंझेबाला भेटण्यास आले होते ... औरंझेबानेही त्यास परवानगी दिली ती निव्वळ मिर्झा राजांनी  एवढी मोठी कामगिरी बजावली (जी शाहिस्तेखान आणि औरंझेबाचे इतर मनसबदार ह्यांना  जमले नाही) तर त्यांना कसे दुखावणार आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराज दक्खन मधून बाहेर पडतील आणि जमल्यास काही दगा फटका करू  हा विचार ....

मग ती दरबारातील ऐतिहासिक घटना घडल्यावर औरंझेबाने राजांना दरबारात येण्यास मनाई केली आणि त्यांना जवळ जवळ नझरकैदेत टाकले ....मग तिथूनच त्यांना काबूलच्या कामगिरीवर पाठवण्याचा त्याचा हेतू होता ....म्हणजे तिथून परत आले नाही आले तरी तिथपर्यंत निर्नायकी परिस्थितीमुळे दक्खन मधल्या मराठ्यांना काबूत आणता येईल....

पण महाराज काही न काही कारण काढून जाणे टाळत राहिले आणि  औरंगझेब  कधी नव्हे ते त्यांचे बहाणे ऐकत राहिला....का???... त्यानंतर ही शिवाजी महाराज मुत्सद्देगिरीचा डाव मांडत राहिले कि मी घाबरलोय आणि मला दक्खन ला जाऊ द्यावे...तिथे राहून मी तुमची चाकरी करेन किंवा माझ्या ताब्यातले अजून गड मी द्यायला तयार आहे पण मला तिथे जाऊन ते हस्तांतरीत  करावे लागतील वगैरे वगैरे पण औरंगझेब हे सगळे ओळखून होता कारण अशाच प्रकारचा काहीसा डाव ते शाहीस्तेखानाबरोबर  खेळले होते आणि त्याला गाफील ठेऊन म हल्ला केला होता....आणि हे न ओळखायला औरंझेब काही शाहिस्तेखान नव्हता.... मग तो राजांच्या वेळखाऊ धोरणाला का बळी पडत होता किंवा तसे का दाखवत होता???

एकंदर पाहता, राजे नझर कैदेत होते म्हणजे मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग  ह्याचा महालात होते आणी तिथे रामसिंगचा पहार होता आणी राजांची आग्र्यात असतानाची सर्व जवाबदारी रामसिंग ने घेतली होती ..  काही दिवसांनी औरंगझेबाने फुलोद्खानाचाही पहारा बसवला आणी ही संधी साधून महाराजांनी रामसिंगला औरंगझेबकडे शब्द टाकून त्याने घेतलेल्या राजांच्या जवाबदारीतून  मुक्त व्हायला सांगितले  ..... रामसिंगने ही तसा अर्ज केला आणि औरंगझेबाने तो मान्य केला आणि असा अर्ज मान्य करण्यापूर्वी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नसेल??... रामसिंगला मुक्त करून तो महाराजांच्या सुटकेची वाटतर मोकळी करत नव्हता?? ...बरं फुलोद्खानाचाही पहारा त्याने का बसवला तर महाराजांच्या जीवाला आग्र्यात त्याच्याच पदरच्या शाहिस्तेखानच्या जवळच्या लोकांकडून धोका आहे हे तो जाणून होता आणि ते संकट त्यांच्यावर येऊ नये म्हणून औरंग्याने ही खबरदारी घेतली होती .........रामसिंग शी संधान साधून महाराज सुटू शकले असते पण फुलोद्खानाच्या पहार्य्तून हि निसटले आणि ते हि पेटाऱ्यातून???

एक वेळ महाराज कैदेतून हुलकावणी देऊन सुटून गेले हे मान्य केले तरी १४००-१५०० किमीच्या प्रवास ही निर्धोक पार पडला ते ही गुजरात पर्यंत मुघली सत्ता असताना??.... त्याचे हेर खाते एकदम जबरदस्त  असताना आणि विशेष असा पहाडी मुलुख नसताना ही ते दरमजल करत दक्खनला पोहोचले???  वेशभूषा बदलून आणि संन्यासी बिन्यासीच्या रुपात ते होते असा म्हटलं तरी असा अंदाज आहे कि त्याच्या हेरांनी संन्यासी , फकीर वगैरे कोणाला ही सोडले नव्हते ....सगळ्यांची झाडाझडती घेतली होती ....तरी ही सुटले????

हे प्रश्न पडण्याच कारण म्हणजे वाचताना जाणवतं की  ना. स. अडून अडून सुचवत आहेत की महाराजांच्या सुटकेमागे अप्रत्यक्षपणे औरंगझेबाचाच हात आहे .... आणि त्याचा वैचारिक सल्लागार नंतर त्याला विचारतो ही की जनतेला वाटतेय शिवाजीला तूच सुटू दिलाय कैदेतून पण औरंगझेब ह्या प्रश्नाच  उत्तर टाळताना दाखवलाय ... कदाचित इतिहासात असे काही पुरावे नसल्याने लेखकाने हा विषय फार नाही वाढवलाय ..... पण .... पण आपल्या डोक्यात मात्र विचारांचा भुंगा भुणभुण करायला  लागला आणि औरंगझेबाने त्यांना जाऊ देण्यामागे काय कारण असू शकेल किंवा माझ्या बुद्धीला काय वाटले ते सांगण्यासाठी म्हणून हा लेखप्रपंच

तर कारण म्हणजे मिर्झा राजा जयसिंघ हे ..... मिर्झा राजा जयसिंघने स्वताच्या जवाबदारी वर महाराजांना आग्र्यास पाठवले होते ....आणि औरंगझेबाच्या दरबारी असणाऱ्या राजपुतांमध्ये जयसिंघचे बर्यापैकी प्रस्थ होते....म्हणजे मिर्झा राजांना नाराज करून बाकीच्या राजपुतांची गैरमर्जी ओढवून घेण्याचा संभाव्य धोका त्याने ओळखला होता...तसेच जर मिर्झाराजांला दिलेला शब्द पाळला  नाही व त्यामुळे मिर्झा राजा रागावला असता आणि त्याने त्यामुळे आदिलशाही आणि कुतुबशाही आणि मराठे ह्यांची मोट बांधण्याचा संभाव्य धोका होता ज्यामुळे हिंदुस्तानभर राजवटीचे स्वप्न लयास गेले असते आणि परत दरबारातले इतर राजपूत ही मिर्झा राजास जाऊन मिळू शकले असते आणि हातचा राजपुताना ही जाऊ शकला असता....  तसेच हिंदुस्थानभर सत्ता स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळू शकले असते

आणि ह्या तर्कास पुष्टी मिळते म्हणजे शिवाजी राजांसारख्या शत्रूस (ज्यांच्य्मुळे औरंगझेबास दिल्लीच्याही तख्तास धोका वाटत होता) जेरबंद करून पाठवल्याबद्दल आणि २३ किल्ले जिंकल्यानंतर (जे त्याच्या नामांकित मनसबदारानाहॆ जमले नाही) वास्तविक मिर्झा राजांना त्याने कुठे ठेऊ न कुठे नको असे म्हणत डोक्यावर घेऊन नाचावयास हवे होते पण तसे न होता त्याने त्यांना बाजूला करत काबुलच्या मोहिमेवर पाठवले आणि बुऱ्हाणपूरच्या छावणीत विषप्रयोग करून काटाकाढला म्हणजे कोणालाच काही संशय नको.... आणि परत रामसिंघास हि मामुली सजा देऊन मोकळे केले ...वास्तविक त्याचा स्वभाव पाहता रामसिंघास त्याने जिवंतच सोडावयास नको होते ....

हेच जर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी च्या वेळेस मिर्झा राजा ही आग्र्यास उपस्थित असता तर कदाचित शिवाजी महाराज सुटणे कठीण होते कारण मिर्झा राजा त्याच्या टप्प्यात असले असते आणि त्यांना काबूत ठेवणे त्यास शक्य झाले असते ....

आपल्यास इतिहासाच्या पाठ्य पुस्तक  आणि तत्सम साहित्य किंवा मालिका, चित्रपट ह्यांनी आग्र्याहून सुटका पेटाऱ्यातूनच झाली हे असे बिम्बवलेय की आपण बाकी कसल्या गोष्टींचा म्हणजे शक्यता-अशक्यता , धोके वगैरे गोष्टींचा दुरान्वये ही विचार करत नाही ....हा लेख वाचून तुमच्या मनात विचारांचा भुंगा भुण भुण करायला लागला असल्यास ते माझ्या लेखाचे यश च म्हणावे लागेल :)

विशेष सूचना :- हा लेख पुढे कोणास पाठवू नये कारण हा कोन जहाल आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यान्सारख्या विचारवंत व्यक्तीच्या वाचनास आला आणि त्यास माझे विचार न पटल्यास ते माझ्या घराचे नुकसान करू शकतील :)

आणि हो

शिवाजी महाराज हे माझे दैवतच आहेत आणि त्यांना ह्या लेखातून त्यांचे थोरपण कमी करण्याचा अजिबात प्रयत्न नसून फक्त माझ्या सध्या रिकाम्या डोक्यात आलेले विचार कागदावर उतरवण्याचा आणि जमल्यास सम विचारी लोकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे ....