Sunday, 19 August 2018

नदाल - द अल्टिमेट वॉरियर

खेळातल्या काही रायवलऱीज अगदी परमोच्च दर्जाच्या असतात आणि दोन्ही प्रतिस्पर्धी अगदी तुल्यबळअसले तरी कौतुक, प्रसिद्धी मात्र एकाच्याच वाट्याला तुलनेने जास्ती येते. टेनिस मधलीच  फेडरल - नदाल ही जवळपास गेल्या दशकभरातील सुप्रसिद्ध रायवलऱी. पण नदाल पेक्षा फेडरर जास्ती प्रसिद्ध आणि लोकप्रिय. त्याच्या खेळातील सहजता,  स्विस अचूकता आणि त्यास लाभलेली नजाकतीची साथ, त्याची मैदानातील वागणूक, आणि जिंकल्यानंतर व्यक्त होण्याची पद्धत सगळे सभ्यता आणि शालीनतेला धरून. त्याचा खेळ बघताना हरखून जायला होते आणि त्यामुळे फेडरर आवडत नसलेला  टेनिसचा चाहता तसा दुर्मिळच. पण ह्यातले काहीच नसलेला,  एखाद्या योद्धयाप्रमाणे भासणारा, निर्दयी खेळ वाटणारा , जिंकण्यासाठी सर्वस्व देणारा आणि कधीही हार न मानणारा (अगदी चेअर मध्ये बसलेला पंच फायनल स्कोर सांगत नाही तो पर्यंत आशा न सोडणारा) तेवढाच तोडीस तोड नदाल मात्र काही प्रमाणात कमी लोकप्रिय, कमी प्रसिद्ध !!!

नदालच्या अस्तित्वाची टेनिस विश्व दाखल घ्यायला लागले तेव्हा फेडरर पहिल्या क्रमांकावर स्थिरस्थावर झाला होता आणि कोणीही त्याला आव्हान देऊ शकेल असे वाटत नव्हते इतक्या प्रचंड फॉर्म मध्ये होता तो! त्याच्या 'आर्टिस्टिक' खेळामुळे आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे लोकांच्या मनात स्थान मिळवले होते. सॅम्प्रास पोकळीही त्याने भरून काढली होती. आणि अशातच २००५ च्या फ्रेंच ओपन मध्ये त्याने फेडररला सेमी फायनल मध्ये हरवले आणि पुढे २ दिवसांनी फायनलही जिंकली ते ही अवघ्या १९व्या वर्षी (सॅम्प्रास नंतर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिलाच टीनएजर होण्याचं मान मिळवला). पुढे मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धात त्याला लक्षणीय कामगिरी करता नाही आली तरी त्याने वर्षअखेरीस २ ऱ्या स्थानावर झेप घेतली होती. पण तरीही त्याची दखल गांभीर्याने घेतली जात नव्हती. पुढच्या वर्षीही परत त्याने फेडररला फायनल मध्ये नमवत फ्रेंच ओपन जिंकली आणि विम्बल्डनच्या फायनल मध्ये फेडररला आव्हान दिले. आता मात्र तो सगळ्यांच्या नजरेत भरला होता मात्र मला तो कुठेतरी आवडायला लागला होता कारण प्रस्थापिताला सातत्याने आव्हान देणारा नदाल कुठे तरी आपल्या बॉलीवूड हिरोसारखा वाटत होता. अर्थात प्रस्थापित असला तरी फेडरर काही आपल्या बॉलीवूड फिल्म्स प्रमाणे व्हिलन नव्हता/नाही.  . विम्बल्डन फायनल मध्ये फेडररला आव्हान म्हणजे त्याच्याच राज्यात अगदी सिंहासनाला दिलेलं आव्हान वाटायला लागलेले कारण तोपर्यंत फेडरर विम्बल्डनचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. पण ती फायनल नदाल हरला पण पुढच्या वर्षीची फ्रेंच ओपन नियम असल्याप्रमाणे जिंकला होता. म्हणजे फेडरर ग्रास कोर्टचा अनभिषिक्त सम्राट तर नदाल क्ले कोर्टचा राजा असे सरळसरळ मालकी हक्क प्रस्थापित झाले होते. २००८ मात्र वेगळेच होते. त्या वर्षीही नदालने फेडररला फ्रेंच ओपन फायनल मध्ये सरळ सेट्स मध्ये हरवले आणि आता पुढच्या विम्बल्डन  फायनल मध्ये परत फेडरर आणि नदाल समोरासमोर आले. नदाल आता जास्त परिपक्व झाला होता, नुकतंच क्विन्स क्लब मध्ये त्याने आर्टोईस चॅम्पिअनशिप जिंकत ग्रास कोर्ट वरचं पहिला विजेतेपद पटकावलं होतं त्यामुळे आत्मविश्वास ही उंचावला होता. दबाव आता फेडरर वर होता त्याचं ग्रासकोर्ट वरचं सम्राटपद डावावर लागलं होतं. आणि ते दोघं  विम्बल्डनच्या इतिहासातली अजरामर, अद्वितीय अशी फायनल खेळले. दोन्ही खेळाडू शब्दशः जीवाचा रान करून खेळत होते.  सामना संपल्यावर त्यांना
स्ट्रेचरवरूनच घेऊन जावे लागेल की काय असे वाटावे एवढे दोघेही दमले होते पण नियतीच दान मात्र नदालच्या बाजूने पडले आणि नादालने ग्रास कोर्टलाही आपलेसे केले. एका प्रस्थापिताला बाजूला सारून तो सर्वोच्च पदावर  पोहोचला होता. (प्रस्थापितांना तुलनेत नवोदिताने आव्हान देण्याराला पाठिंबा देणं हा कदाचित आपल्या भारतीय मानसिकतेचा भाग असावा. अगदी ९० च्या दशकांपासून ते साधारण २१व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत आपले साहित्य म्हणा, आपले सिनेमे म्हणा थोडयाफार फरकाने ह्याच कथासूत्राभोवती फिरत असत अगदी लगान पर्यंत हेच असायचा. दिल चाहता है ने मात्र भारतीय सिनेमा बदलला. आपला क्रिकेट संघ विश्वविजेता असला तरी कसोटी मध्ये कधीच प्रस्थापित नव्हती म्हणून गांगुलीचा संघ जेव्हा परदेशात यजमान संघाना आव्हान द्यायला लागला तेव्हा सामना निश्चिती प्रकरणापासून दूर गेलेले क्रिकेट चाहते पुन्हा क्रिकेट कडे वळले. एवढाच कशाला नुकत्याच संपलेल्या फ़ुटबाँल विश्वचषक अंतिम सामन्यात बहुतांश जणांचा पाठिंबा क्रोएशियाला होता). हा तडाखा एवढा जबरदस्त होता की एका ग्रँडस्लॅम (महत्वाच्या ४ स्पर्धात) नदालला हरवण्यासाठी पुढचे जवळपास १० वर्ष फेडररला (२०१७ - ऑस्ट्रेलियन ओपन) वाट पाहावी लागली. फेडरर सारखं प्रतिभेचं देणं, बिनतोड म्हणावी अशी हुकुमी सर्विस नसताना जवळपास १५ वर्ष टेनिस विश्व गाजवत ठेवण्यासारखं काय आहे नदाल मध्ये???

द अल्टिमेट वॉरियर

टेनिस हा खरा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, प्रेक्षकांना दाद द्यायला, पाठिंबा दर्शवायला किंवा चीअर अप करण्यासाठी फक्त दोन पॉइंट्सच्या मधली वेळ आहे. एकदा खेळाडूने सर्विस साठी स्टान्स घेतला की पुन्हा शांतता. खेळाडूही तसे सभ्य असतात, सहसा जास्ती उत्तेजित होत नाहीत किंवा फ्रस्टरेशन ही फार दाखवत नाहीत (मॅकेन्रो, इवानसावीच असे काही अपवाद वगळता). सगळं कसा सभ्यतेला धरून. कपडे ही अगदी सभ्य लोकांना साजेसे (वेगवेगळ्या फॅशन करायचा तो काय आगास्सीचं). अशा खेळात बिन बाह्यांचे टी-शर्ट घालून स्वतःचे बायसेप्स दाखवणारा, गुडघ्यापर्यंत टाईट शॉर्ट्स घालणारा, डोक्याला हेडबँड बांधणारा नदाल एखाद्या योद्धयाप्रमाणे भासतो आणि त्याच्या फोरहँडच्या फटक्याची जी  फिनिशिंग मोव्हमेन्ट आहे त्याने तर तलवारबाजीचा भास होतो. त्याचे फटके ही बऱ्याचदा पाशवी असतात, समोरच्याचे मनोधैर्य कदाचित खच्ची करू शकणारे विशेषतः फोरहँड. एकंदरीत त्याचे व्यक्तिमत्व पाहता चुकीच्या जागी आलाय का तो असे वाटायचे. पण नदाल हे रसायनच वेगळे आहे. अगदी शेवटच्या पॉईंट पर्यंत तो त्याच जोमाने, त्याच जोशाने खेळत राहतो. प्रत्येक पॉईंटचा जिवाच्या आकांताने पाठलाग करत राहतो, कुठलाच पॉईंट सोडून दिलाय असे नादालच्या बाबतीत झालेले मला आठवत नाही. कितीही त्रास होवो, कितीही वेदना असो असे त्याने सामना सोडून दिलाय असे फार फार क्वचित बघायला मिळते. एखादा थकलेला शॉट किंवा रिटर्न त्याने दिलाय असे होतच नाही , रॅली हा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, रॅली खेळत राहून समोरच्याला दमवणे आणि त्याला चूक करायला भाग पडणे ही त्याची साधारण स्ट्रॅटेजि आहे आणि म्हणून 40 शॉटची एखादी रॅली झाल्यावरही एक्केचाळिसावा शॉट घेण्यासाठी तो तेवढाच फ्रेश वाटतो. तो जर पडला नसेल तर कोर्टच्या कोणत्याही कोपऱ्यातला पॉईंट धावून घेण्यावाचून त्याला कोणी अडवू शकत नाही. जर रोमन ग्लॅडिएटर्स कधी अवतरले तर नक्कीच त्याला ते पाठिंबा देतील असे मला वाटते किंबहुना त्यांच्यातलाच तो एक वाटतो.

 २०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनल मध्ये तो फेडररपेक्षा तब्बल ४ तास जास्ती खेळून फायनल मध्ये आला होता (हे त्याच्या हरण्याचं समर्थन नाही आणि नदाल स्वतः हे कारण कधी देईल असे वाटत नाही) . अंतिम सामन्यात ही तिसऱ्या सेट मध्ये फेडररने नदालचा ६-१ ने पाडाव केला होता, ते फक्त सेट जिंकणं नसतं, मानसिक खच्चीकरण असतं. नदाल सामन्यात पुनरागमन करेल असा कोणालाही वाटलं नव्हतं? पण सहजासहजी सामना सोडेल तो नदाल कसला? नदाल पुढचा सेट जिंकला आणि सामना पाचव्या सेट पर्यंत गेला.

अशी आख्यायिका त्याने स्वतःच्या बाबतीत करून ठेवलीय गेल्या दशकभरात. वेळोवेळी पिछाडीवर असताना सामन्यात दमदार पुनरागमन करत आणि काही काही वेळा तर अशक्यप्राय परिस्थितीतून विजयश्री खेचून आणलीय त्याने. २ सेट ची पिछाडी त्याच्यासाठी फार महत्वाची नाहीच. संख्या फलक ही फार महत्वाचा नाहीच. सामना निर्णायक पॉईंट वर असताना देखील तो त्याचे कुठेले फटके म्यान करत नाही की फटका साईड लाईनजवळ टाकत नाही असे होत नाही. तो आणि विजय ह्यात कोणीच उभे नाही असे वाटण्याजोगा एकदम बिनधास्त खेळात राहतो.

सध्या दुखापतींनी त्रस्त केलाय त्याला. त्याच्या रॅली गेम्स मुळेच त्याच्या शरीराला जास्ती कष्ट पडतात आणि प्रत्येक पॉईंट घेण्याच्या अट्टाहासाने काही काही वेळा शरीर असे  काही ट्विस्ट होते की ज्याची कधी सवय नसते. एखादा पॉईंट त्याच्या शरीराने सोडलेला असतो पण मनाने सोडलेला नसतो आणि मेंदू जेव्हा शरीरावर वर्चश्व गाजवायला लागतो तेव्हा शरीर त्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण करू शकत. ज्याप्रमाणे तुटलेला आरसा पुन्हा नाही सांधू शकत त्याप्रमाणे एखादी सांध्याला झालेली दुखापत नेहमीच कमकुवत राहते. त्याची बोटं टेप मध्ये गुंडाळलेली असतात. बाह्य दुखापत टेप ने झाकू शकतो पण दुखावलेले स्नायू किंवा tissues, ना टेप ने झाकू शकत ना कोणतं मलम आराम देत. पण ह्यातली एक ही गोष्ट खेळताना त्याच्या चेहऱ्यावर येत नाही, खेळताना फक्त मेंदू त्याला सूचना करत एखाद्या कुशल सारथ्य प्रमाणे शरीराला ड्राईव्ह करतो. वेदना फक्त आतमध्ये दबलेल्या राहतात. त्याचं शरीर वेदनांना कदाचित शरण जाईल ही पण  कणखर मनामुळे तो समोरच्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडतो.

आता फेडरर आणि नदाल दोघेही कदाचित त्यांच्या कारकिर्दीच्या मावळतीकडे आहेत (वय नदालचा प्लस पॉईंट आहे , पण शरीरावर पडलेल्या अतिरिक्त ताणामुळे ते किती साथ देईल सांगता येत नाही). अशातच त्यांच्यातल्या रायवलरिच्या इतिहासात अजून एक धडा लिहिला गेला असता नुकत्याच संपलेल्या विम्बल्डन मध्ये. दोघेही व्यवस्थित फॉर्म मध्ये होते आणि अंतिम सामना त्या दोघातच खेळवला जाईल असं वाटत होतं पण फेडरर चवथ्या फेरीत बाद झाला तर नदाल उपांत्य फेरीत. पण उपांत्य फेरीत बाद होण्याआधी तो विम्बल्डनच्या इतिहासातला अजून एक उत्कृष्ट सामना खेळूनच बाहेर गेला, त्याच्या स्वभावाला साजेसं शेवटपर्यंत निकराने लढून. नियतीने ह्या वेळेस जरी त्यांचा सामना होऊन नसेल दिला तरी त्यांच्या आयुष्याची गाठ मात्र कायमची घालून दिलीय. टेनिसच्या इतिहासात त्यांचं नाव एकत्र घेतलं जाईल, त्यांचे सामने स्पोर्ट्स वाहिन्यांवर क्लासिक म्हणून दाखवले जातील. फेडरर २०१७ ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतर म्हणलं होता की ही फायनल बरोबरीत सोडवण्यास मी आनंदाने संमती दिली असती. फेडररने नादालच्या खेळास ही दिलेली दादच म्हणावी लागेल. पण ज्याने नदालची चिकाटी आणि हिम्मत पाहिलीय त्याला माहित असेल की जर टेनिस मध्ये बरोबरी हा पर्याय असता तर नदाल कदाचित टेनिस खेळला नसता. विजय हा एकमेव मार्ग आहे आणि लक्ष्य ही नदालसाठी.

तळटीप - नादालची वृत्तीच कुठेतरी कोहली मध्ये असल्यासारखी वाटते आणि म्हणूनच नदाल इतकाच मे कोहलीचाही प्रचंड फॅन आहे.  

Friday, 22 June 2018

अजी म्या वाघ (male tiger) पाहीला


A tiger is a large-hearted gentleman with boundless courage and that when he is exterminated - as exterminated he will be unless public opinion rallies to his support - India will be the poorer by having lost the finest of her fauna. - Jim Corbett

कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे तर निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती बघण्याचा छंदच लागलाय सध्या. (माझे छंद ही चंचल आहेत, आधी ट्रेकिंगचा छंद होता, मग लॉन्ग ड्राईव्हचा आणि खादाडीचा मग पक्षी निरीक्षणाचा असे बरेच). व्याघ्र दर्शनाला जायचे म्हटलं की आनंद पोटात माझ्या माईना असं होतं. ह्या डोळ्यांची भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांची भटकंती सुरु असते. आतापर्यंत कान्हा, बांधवगड असे महाराष्ट्राच्या बाहेरचे व्याघ्र प्रकल्प फिरून झाले होते अन वाघांचे मनसोक्त असे नाही म्हणता येणार पण समाधानकारक दर्शन झाले होते (मन कधी भरेल व्याघ्र दर्शनाने असे वाटतच नाही. दर वेळी भरून झाले तरी अजून असे वाटत राहते). ह्या सगळ्यात उणीव एका गोष्टीची होती. मेल टायगरची.

एवढ्या सगळ्या सफारी करून अजून मेल टायगर (male tiger) काही दिसला नव्हता किंवा कुठे त्याचा मागमूस ही नव्हता. नाही म्हणायला रणथंबोरला सकाळी प्रवेश करता करता एका नराच्या पावलाचे ठसे आढळलेले. ते ताजे असले तरी तो दिसायची शक्यता नव्हती. मेल टायगर न दिसण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची टेरिटरी किंवा हद्द. साधारण ६० तो १०० चौ. किमी. ची हद्द एका मेल टायगरची असते आणि त्या पूर्ण territory चे रक्षण त्याला करावयाचे असते त्या उलट मादी. तिची territory फक्त २० चौ. किमी एवढीच असते आणि त्यात जर ती लेकुरवाळी असेल तर तिच्या परिसरातल्या पाणवठ्यावर जास्ती वावर असतो तिचा. त्यामागचे कारण ही सहजसुलभ म्हणजे  पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांपैकी एखाद्याला भक्ष्य करायचे म्हणजे फारसे प्रयास पडत नाहीत आणि दुसरे म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी त्यांना पाण्याची फारच गरज असते. त्यामुळे एखाद्या झोन मध्ये प्रवेश केल्यास आणि त्या परिसरात वाघीण आणि तिचे बछडे असल्यास निवांत पाणवठ्यावर बसून राहायचे. पाणवठ्यावर ते हमखास येणारच. पण नराचे तसे काही सांगता येत नाही एकतर तो एकटाच राहणे पसंत करतो आणि पूर्ण हद्द नियंत्रित करायला फिरत राहतो. फिरता फिरता मधेच कुठेह दाट झुडपे आणि थंडगार जागा आढळली की बसतो फतकल मारून किंवा लोळत पडत राहतो आणि एकदा पडला की किती काळ पडून राहील काही सांगता येत नाही. आणि वाघ झोपला असल्यास किंवा नुसता बसून राहिला असल्यास वानरं किंवा चितळ काही अलार्म कॉल्स देत नाहीत. त्यामुळे अगदी दृष्टीपथात असला तरी नजरेस पडत नाही!!!

तर ह्या उन्हाळ्यात our very own अशा महाराष्ट्रातल्या ताडोबात  जायचा बेत आखलेला. ताडोबा कधीच निराश नाही करत म्हणतात (पण असे सगळेच व्याघ्र प्रकल्पातले गाईड आणि ड्रायव्हर्स म्हणतात). ह्या वेळी मात्र लेडी लक आमच्यावर अक्षरशः फिदा होते.३ सफारी आणि तिन्ही वेळा वाघ दिसला होता आणि नुसतेच ओझरते दर्शन नाही तर  त्याचे मनसोक्त निरीक्षण करता आले होते.  पहिल्या वेळी शर्मिलीचा बच्चा जंगलात शिरत नाही तोच पाणवठ्यावर दिसला. अगदी समोर होता. आधी झुडपात बसून नुसतंच समोर लागलेल्या गाड्यांचं निरीक्षण चालू होतं. मग तहान लागली तास पाण्यात आला. मग बाहेर गेला, पुन्हा पाण्यात डुंबायला आला आणि तिथून सगळ्या गाड्यांवर कटाक्ष फिरवत होता. १ गवा जरा लांबून दिसला तास उठून पुन्हा आत झुडपांमध्ये गेला. बाहेर पडत पडत बिबळ्याचे ही ओझरते दर्शन झाले (बिबळ्या जंगलात सहसा दृष्टीस पडत नाही. फारच बुजरा प्राणी आहे तो पण त्याचेही ओझरते का होईना दर्शन  आले ते आमच्या ड्रायव्हरच्या कौशल्यामुळे. जंगलात वाघ दिसावायचा असल्यास तुमच्या नशिबाबरोबरच तुमचा ड्राइवर किंवा गाईड  तेवढाच निष्णात आणि अनुभवी असावयास लागतो, त्यावर पुन्हा कधीतरी). दुसऱ्या सफरीत लारा जस्ट मिस झाली पण माधुरीचा बछडा दिसला होता आणि तिसऱ्या सफरीत तर लारा अगदी हेड ऑन दिसली व माझ्या जिप्सीच्या बाजूने गेली अगदी म्हणतात तसे टचिंग डिस्टन्स वर होती. मनात आणले असते तर ती माझी तिच्या रात्रीच्या जेवणासाठी सहज निवड करू शकली असती पण पोट भरलेले असावे बहुदा :). (पुन्हा इथे ही वाघीण आणि बच्चेच, मेल टायगर नाहीच. माणसाने असमाधानी म्हणजे किती असावे ?? )

चौथी सफारी आमची कोअर झोन मध्ये होती. कोअर झोन शुष्क पानझडी वनाचा आहे आणि आम्ही कडक उन्हाळ्यात गेलेलो असल्याने सकाळी ७-७.१५ लाच उन्हाची तीव्रता जाणवू लागलेली आणि बफर प्रमाणे दाट वृक्षराजी नसल्याने रखरखाट जाणवू लागलेला. शिरस्त्याप्रमाणे जामनी, पंढरपौनी, एनबॉडी, ताडोबा लेक असे पाणवठे घेत चाललेलो पण पंढरपौनी लेक १ आणि लेक २ इथे मायाच्या पावलांचे ठसे वगळता फार कुठे खाणाखुणा दिसल्या नाहीत. पुढे पंचधारा म्हणून जागा आहे, रखरखीत प्रदेशात घनदाट वृक्षराजी आणि एक ओहोळ वाहत असलेली शांत आणि थंड जागा. भर दुपारी ही तिथे थंड आणि खूप शांत वाटतं.
त्या जागी चक्कर मारून येत असताना एकाला काही हालचाल जाणवली.  आम्हाला वाटलं बिबट्या असावा कारण बिबट्यासाठी आदर्श अशी जागा होती असा अंदाज. ड्रायव्हरला गाडी थोडी पाठी घ्यायला सांगितली आणि गाईडने मित्राने दिशेला न्याहाळत मटकासूर एवढेच म्हणाला मात्र आणि गाडीतले सगळे 'attention' पोझिशन मध्ये पंचधारा डोळ्यात प्राण आणून स्कॅन करायला लागले. आणि एकदाचा तो दिसला आणि ते राजबिंडे रूप आणि ती ऐटदार चाल बघत असताना आजी म्या ब्रह्म पहिले अशी अवस्था झाली. आजूबाजूच्या सगळ्या जगाचा विसर पडला. फक्त एकच गोष्ट डोक्यता होती, ती म्हणजे मटकासूर डोळ्यात आणि जमेल तितका कॅमेरा मध्ये  साठवून घ्यावा. अगदी धम्मक अशी नसली तरी पिवळी कांती, काळे पट्टे आणि रुबाबदार चाल असे हे सुंदर रूप पाहत असता नजरेस आणिक काही येत नव्हतं.फार धष्ट पुष्ट  नसावा, साधारण मध्यम साईझ म्हणता येईल असा पण त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राट असल्याच्या खाणाखुणा त्याच्या एकंदर हालचालीत जाणवत होत्या. अचानक शांत असलेल्या पंचधारा परिसराला जाग आली आणि घिसाडघाई जाणवायला लागली. आजूबाजूला एवढे सगळे होत असताना मटकासुर मात्र स्वतःच्या तंद्रीत आजूबाजूच्या जगाची तम ना बाळगता काही तरी मिशनवर असल्यासारखा पुढे पुढे येत होता. एवढ्या वेळ  पंचधारेत वावरत असलेल्या चितळांना ही मटकासूरची जाणीव झाली आणि शेपूट घालून पळून सुरक्षित अंतरावर जाऊन बघत बसले. एका पाण्याच्या ओहोळावर मटकाने थोडे पाणी प्यायले आणि तो तिथेच रेंगाळत बसेल असे वाटत असताना त्याला त्याच्या मिशनची आठवण झाले असावी आणि तो परत आजूबाजूच्या मर्त्य प्राण्यांकडे न पाहता पुढे निघाला. पंचधारेच्या पलीकडचा रस्ता पार करून तो आत झाडीत जाईल अशी जाणीव ड्राइवरला जाळी आणि त्याने गाडी पटकन पंचधारेच्या पलीकडे नेली. त्याचा अंदाज बरोबर निघाला. मटका रस्त्यावर आला. बाजूच्या २-३ गाड्यांकडे थोडे कुतूहलपूर्वक पहिले आणि परत मिशन वर निघाला आणि काही क्षणातच जसा आला तास अंतर्धान पावला. एवढे सगळे फार तर ५-७ मिनिटात घडले असेल पण हा प्रसंग मात्र आयुष्यभर लक्षात राहील असा. आमचा ड्राइवर आणि गाईडही म्हणाले ४-५ दिवस झाले मटकासूर दिसला नव्हता आणि आज दिसेल अशी अपेक्षा ही नव्हती  हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच आणि एवढे रोज वाघांना बघणारे ते ही मटकासूर पाहून हरखून गेले. (मेलचा aura  काही औरच असतो). आपण तर कधीतरी जाणारे, आपला आनंद काय वर्णावा? तो तर पोटात मावणारच नाही.
Royal Walk of Matkasur - Panchdhara

Matakur Crossing The Road

Matkasur - Looking Curiously towards Gypsies



आज ही इतक्या दिवसानंतर ताडोबातील हायलाईट म्हणून मटकासुराचे धावते दर्शनच आठवते. रणथंबोरची मछली किंवा ताडोबाची माधुरी ह्या सुपर मॉम म्हणून प्रसिद्ध आहेत.  गूगलरावांना त्यांच्या विषयी विचारल्यास मोस्ट फोटोग्राफ्ड टायग्रेस म्हणून ही त्या प्रसिद्ध आहेत असे जाणवते. सहज एक विचार आला, तसे ही स्त्री वर्गालाच फोटो काढून घ्याची हौस जास्ती असते आणि त्यातून मेल टायगर दिसायचेच नाव घेत नाहीत तर फोटो काढणे लांबच राहिले आणि मोस्ट फोटोग्राफ्ड असे बिरुद  मिरवणे म्हणजे तर अशक्यप्रायच!!


Saturday, 23 December 2017

कोहली आणि भारतीय मानसिकता

                                                    थोडा है थोडे की जरुरत है
                                                 जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है

ऐकायला खूप छान वाटतं पण मानवी प्रवृत्ती ह्याच्या अगदी विरुद्ध असते, जरा काही कमी असलेलं  चालत नाही. भारतीय क्रिकेटमधली तज्ज्ञ मंडळी तरी सध्या हे अनुभवत आहेत. आणि हे जरूरत असलेलं थोडं त्यांना डोंगऱ्याएवढ्या दुःखाइतकं भासतंय पण डोंगराएवढे सुख त्यांना जवाइतकं हे वाटत नाहीये. पण खरं पाहता त्या सुखामुळे क्रिकेट परत खूबसूरत वाटतंय. तर जरुरत असलेलं थोडं म्हणजे रहाणेचं सध्याचं अपयश. कारण ही तसेच आहे म्हणा, रहाणे हा भारतातील मध्यम वर्गाला  सध्याच्या भारतीय संघातला जवळचा वाटणारा खेळाडू आहे (ह्याची कारणीमिमांसा मी करत नाही, ज्याने त्याने आपल्या वाकुबी प्रमाणे ह्याचा अर्थ समजून घ्यावा).  रहाणेचं अपयश त्यांना खुपतंय स्वतः रहाणेपेक्षा ही कदाचित जास्त. विराट, पुजारा , विजय , धवन हे एवढे अफलातून खेळत आहेत पण ह्यांना चिंता लागून राहिलीय ती रहाणेच्या अपयशाची. त्यामुळेच सर्व मीडियामध्ये (इलेक्ट्रॉनिक म्हणा प्रिंट म्हणा किंवा सोशल म्हणा) सगळीकडे चर्चा आहे ती रहाणेच्या अपयशाची आणि त्यापेक्षाही त्याला डिफेन्ड करायची!! वर्तमानपत्रांचे, वेब साईटसचे रकाने आणि facebook वरचे uploads हेच सांगतायत की आफ्रिकेत रहाणे किती गरजेचा आहे?

पण मुळात हा प्रश्न आहे की रहाणेला येवढं डिफेन्ड करायची गरज का लागतेय आणि कोणापुढे डिफेन्ड करायचंय? निवडसमितीकडे की कर्णधार आणि प्रशिक्षकांकडे की फक्त आत्मसमाधानासाठी? निवडसमिती म्हणाल तर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या शब्दाबाहेर नाही. कर्णधाराचा तर त्याला किती पाठिंबा आहे हे त्याने करुण नायरच्या त्रिशतकानंतरही त्याला डच्चू देऊन रहाणेला संघात जागा देऊन दाखवून दिले होते.  तो संघाचा उपकर्णधारही आहे. हे सगळे असताना त्याला काढण्याची भीती का? बरं प्रेक्षक/रसिक कोणाकडून ही राहणेला काढा अशी मागणी होत नाही मग ही सगळी आकडेवारी आणि हे समर्थनाचे लेख का?

दुसरा प्रश्न असा की धवन, विजय अन राहुल हे चांगली कामगिरी करत आहेत. त्यातला धवन वगळता बाकीचे दोघं व्यायवस्थित तंत्र असलेले फलंदाज आहेत जे कुठल्याही खेळपट्टीवर उभे राहू शकतात, पुजारा ज्याला 'वॉल'च बिरुद चिटकवलं गेलंय तो द्रविडप्रमाणेच सातत्यपूर्ण कामगिरी करतोय आणि खुद्द विराट ज्याने सचिनची जागा कधी भरून काढली हे कळलं देखील नाही, तो दृष्ट लागावी अशी कामगिरी करत असताना, ते आफ्रिकेत अपयशी ठरतील अशी भीती का? की ते अपयशी ठरावेत ही सुप्त भावना आहे?

आणि ह्या सगळ्यात आपण विराटवर अन्याय करतोय ही जरा ही भावना नाही का? एवढे तो विक्रमांवर  विक्रम रचतोय, वामनाप्रमाणे दोन पावलात त्याने सचिनचे विक्रम जवळजवळ पादाक्रांत केलेत त्याची दखल नाही (का हेच जास्ती दुखतंय).  त्याची फलंदाजी बघत राहावी अश्या खेळी करतोय पण  त्याविषयी कौतुकाचे चुकून माकून एकाद दुसरे शब्द. बरं ते ही मुक्तकंठाने नाहीत. त्यात ही इंग्लंड, न्यूजीलँड, आफ्रिकेत  खेळू देत मग त्याच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब होईल वगैरे वगैरे. काय तथ्य आहे त्यात? पॉन्टिंग भारतात यशस्वी नव्हता म्हणून तो उत्कृष्ट फलंदाज नाही?  कोहलीला तशी अन्यायाची सवय आहेच म्हणा. त्याच्या पदार्पणापासूनच त्याला सचिन सारखं सहज स्वीकारलं गेलं नाहीच. कधी त्याच्या आक्रमक वृत्तीवर कधी अनुष्काला  दिलेल्या फ्लायिंग किस वरून तर अगदी ताजं म्हणजे कुंबळे वादावरून त्याला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय. एवढे बोल तर तारे  जमीन पर मध्ये ईशानच्या बापाने ईशानला हे लावले नसतील.  भारतीय मानसिकतेला दुसऱ्याने वागण्यात दाखवलेली  आक्रमकता आवडते पण आपण आक्रमकता दाखवली की पोटात दुखतं. ऑस्ट्रेलिया , पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्रमक वागणं,स्लेजिंग आवडतं पण तेच आपल्या खेळाडूने केलं की कशाला हवंय, आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं, आपल्या खेळाने प्रत्युत्तर द्यावं वगैरे शेलक्या प्रतिक्रिया तयार. अरे पण का ऐकून घ्यावं समोरच्याचं?? किंवा समोरच्याला त्याचाच डोस व्याजासकट परत दिल्यास काय बिघडतं? कोहली हे सगळं करतोच आणि यशस्वीही होतो हे आपल्या स्वभावाच्या  अगदी विरुद्ध आहे म्हणून कदाचित खुपत असावा. कुंबळे प्रकरणात ही चूक नक्की कोणाची होती हे काही समोर नाही आलं किंबहुना विराटने स्वतःची बाजू मांडलीच नाही पण कुंबळेच्या धीरगंभीर, सद्गृहस्थ ह्या प्रतिमेमुळे सहानुभूती सगळी त्यालाच. कुंबळे चुकू शकत नाही? पण आपल्या मालिकांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे मॉडर्न कपडे घालणाऱ्या स्त्रिया कुटील, कारस्थानी आणि साडीतल्या सोज्ज्वळ , त्याप्रमाणे फ्लॅशी राहणारा/वागणारा विराट चूक. (ह्या मालिका बघणं सोडलं पाहिजे). हर्षा भोगले म्हणतो त्याप्रमाणे कोहली खरंच 'फेरोशीअस' (Michael Atherton used the word "ferocity" to describe the Aussies. It is a word that goes well with Kohli too. It is a state of mind where you are constantly attacking the opponent and not conceding that inch.- हर्षा भोगले) अत्ता अत्ता पर्यंत आपण ऑस्ट्रलियन क्रिकेटचं उदाहरण द्यायचो आणि आता तशाच पद्धतीने विराट खेळतोय तर लागलं पोटात दुखायला?

वास्तविक पाहता कंमिटमेण्टच्या बाबतीत विराटचा हात धरणारा कोणीही नाही (कदाचित राहणेही नाही). टेम्पेरामेन्टची तुलना सचिनशीच होऊ शकेल कदाचित!!! (सहसा कोहली एकाच चुकीची पुनरावृत्ती करत नाही). फिटनेस म्हणाल तर आजच्या घडीला फिट क्रिकेट विश्वात अजून कोणी असेल असे वाटत नाही. त्याच्या अंगावर चरबीचा 'च' ही दिसत नाही एवढेच नव्हे तर फिटनेस बाबतीत जागरूकता आणण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. एवढा सगळं असताना फक्त आणि फक्त तो आक्रमक आहे किंवा एक्सप्रेससिव्ह म्हणून त्याला नावडतीचे नजरेने बघत राहण्यात काय अर्थ आहे? सहसा आपला तो बाब्या दुसऱ्याचंते कार्ट असा प्रकार असतो (आमच्या घरी वगळता :)), आपण कोहलीला आपला समजलोच नाही. मजरूह सुल्तानपुरींनी म्हटल्याप्रमाणे नेहमीच 'सदा तुमने ऐब देखा, हुनर  तो  ना  देखा'. आजच्या घडीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाच्या त्याची तुलना होते. शॉर्ट फॉरमॅट मधला तर तो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेच पण कसोटी क्रिकेट मध्ये ही तो त्याच मार्गाने चाललाय, चाललाय म्हणण्यापेक्षा धावतोय. त्याचे कर्तृत्व खरं पाहता त्याच्या खेळातूनच स्पष्ट होतंय (जसं आपल्या लोकांना हवं तसं, बॅट बोलतेय) पण ते स्वीकारण्याची आपली तयारी आहे का?

राहणे विषयी माझ्या मनात आकस नाही किंबहुना तो मुंबईचा म्हणून असलाच तर एक सॉफ्ट कॉर्नरच आहे पण उद्या चुकून कोहली अपयशी ठरलाच (तो ठरणार नाहीच हा ठाम विश्वास आहे तरी एक शक्यता म्हणून) तर ही तज्ज्ञ मंडळी विराटच्या किती पाठी उभी राहतील? मला राग आहे ह्या दुटप्पी वागणुकीचा आणि टिपिकल मानसिकतेचा बाकी काही नाही! तसं ही कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही. 

Sunday, 24 September 2017

तिन्ही सांजा.....

मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात,  पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो.
त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय.
 'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी. दूर कुठेतरी डोंगरांच्या रांगा एकमेकांमध्ये मिसळून गेलेल्या असाव्यात. मावळतीचा सूर्य बुडायला आलेला असावा. नदीसुद्धा एखाद्या नि:शब्द रेषेसारखी भासावी. हळूहळू श्वास घेणाऱ्या सावल्यांसारखी संध्याकाळ पसरत जावी, संपणाऱ्या दिवसाची जाणीव करून देत! नित्याची सगळी हालचाल थांबलेली असावी. एक अबोल, आर्त शांतता जाणवत असावी, इतकी की घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या रागांनीसुद्धा ती शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेतलेली असावी. हे चित्र आणि यमन रागाचं सोनेरी रूप माझ्या अंत:श्चक्षूंसमोर कायमचं कोरलं गेलं आहे.'

हे वर्णन वाचलं मात्र आणि कान्हाला अनुभवलेली अशीच एक संध्याकाळ माझ्या नजरेसमोर साकारायला लागली. सकाळी आम्ही जंगल सफारी केली होती, व्याघ्रदर्शन काही झाले नव्हते...दुपारची आम्ही सफारी नव्हती घेतली पण आम्ही 'नेचर ट्रेक' करून आलेलो.दिनकर नुकताच मावळलेला, रिसॉर्टच्या बाजूने शांत वाहत असलेल्या नदीच्या किनारी खुर्च्या टाकलेल्या आणि वाघ न दिसल्याची रुखरुख आणि दुसऱ्या दिवशीच्या सफरीत वाघ दिसेल की नाही ह्या विवंचनेत किंवा दिसावाच ही अपेक्षा. आधीची निराशा आणि उद्याची अपेक्षा व त्या अपेक्षांचं दडपण, अशी काहीशी मिश्र मनस्थिती आणि त्याला काहीसे साजेसे समोरचे वातावरण. जरी ती संध्याकाळ 'कॅमेरा' बद्ध केली असेल तरी ती शब्दबद्ध करता येत नव्हती.पण ती स्मरणात मात्र नेहमीच होती. वरील शब्दचित्र वाचलं मात्र आणि तीच संध्याकाळ अचानक स्मृतीपटलावर आली शब्दशः वर्णन केल्याप्रमाणे.  आता
पुस्तकातील त्या लेखातील त्या शब्दचित्रांशी ती संध्याकाळ जोडली गेली आहे किंबहुना तिन्ही सांजा ह्या गाण्याशी ही!!!

हीच ती संध्याकाळ
असाच माझा एक अनुभव घन तमी शुक्र बघ राज्य करी ह्या गाण्याशी निगडीत आहे. हायवे एक सेल्फी  आरपार ह्या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि रेणुका शहाणे दोन अनोळखी व्यक्ती योगायोगाने मुंबई पुणे प्रवास एकाच टॅक्सितून करत असतात आणि जेव्हा घाटातील ट्रॅफिक स्टॅन्ड स्टील होते तेव्हा एकमेकांशी गप्पा मारत बसलेले दाखवलेत. तेव्हा गिरीश कुलकर्णी रेणुका शहाणेला गाणं म्हणायची विनंती करतो (मधल्या प्रवासात तिला गुणगुणताना ऐकलेलं असतं).  तेव्हा ती हीच कविता म्हणते. त्याचे चित्रीकरण ही उत्तम केलंय. रात्रीची धीरगंभीर आणि निश्चल शांतता,  दिवसभराच्या दगदगीने आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्याने आणि ते सुटण्याची काही चिन्हे नसल्याने वैतागून शेवटी पेंगुळलेले जीव आणि बॅकग्राऊंड ला हे गाणे (कविता). हा प्रसंग मस्त झालाय. छान वाटतो. पण हे गाणं घेण्यामागचे प्रयोजन मला समजले नव्हते. पण हृदयगंधर्व वाचल्यावर बऱ्याचशा गाण्यांचं/कवितेचं पंडितजींचं निरूपण वाचायला मिळालं आणि बऱ्याचशा गाण्यांचे अर्थ नव्याने कळले. आणि हे गाणं ही हायवे मध्ये का घेतलंय  ह्याच उत्तर मिळालं. (ह्या गाण्याविषयी पुस्तकात फार लिहिलेलं नाही, पण पुस्तक वाचत असताना बरीचशी गाणी ऐकत गेलो आणि अर्थबोध होण्यासाठी त्यांचे lyrics  ही वाचत गेलो , त्यात ह्याचे ही lyrics लक्ष देऊन वाचले)

ह्या सिनेमातल्या १५-१६ व्यक्तिरेखा अशाच एका धावपळीच्या दिवसात वेगवेगळ्या कर्णनाने मुंबई पुणे प्रवासास निघतात आपापले प्रॉब्लेम सोबत घेऊनच. कोणी गरोदर बायकोस माहेरी सोडण्यासाठी, कोणी घर शिफ्ट करून सामानासकट, कोणी आजारी वडिलांना बघायला थेट अमेरिकेवरूनच आलेला, तर कोणी प्रतारणा केलेल्या नवऱ्याला जबरदस्तीने बांधून घेऊन चाललेला तर कोणी एका सेंट्रल अभिनेत्रीस एका कार्यक्रमासाठी घेऊन चाललेलं..ह्यातला प्रत्येकाला काही ना काही विवंचना  आहेतच आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यानांचयाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. अशा वेळी अचानक ट्रॅफिकमुळे मिळालेला स्वल्पविराम त्यांना घन तमी ह्या गाण्याप्रमाणे जीवनाकडे वेगळ्या , सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा  आणि नव्याने विचार करण्याचा वाव देतो आणि त्याक्षणी हे गाणं त्या प्रसांगात किती चपखल बसलाय ह्याची जाणीव करून देतं.

आता हायवेमधला तो प्रसंग आणि घन तमी  माझ्या अंत:श्चक्षूंसमोर कायमचं कोरलं गेलं आहे!

Monday, 21 November 2016

जिवाची दुबई - भाग ४ (अंतिम भाग)

बरेच दिवस झाले दुबई डायरी विषयीचे क्रमशः पूर्ण करायला काही मुहूर्तच लागत नव्हता पण काल दुबई कॅनॉलच्या उदघाटनाविषयी वाचलं आणि परत दुबई ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या. दुबई कॅनॉलचं बांधकाम आमच्या सिटी टूर मध्ये पाहिलं तेव्हा वाटलं होतं की लॉन्ग टर्म प्रोजेक्ट आहे ते ३ एक महिन्यात पूर्ण करून पर्यटकांसाठी खुले केले गेले. हुकूमशाही असल्याचा एकमेव फायदा असावा हा की तुमची कामं  ठरल्याप्रमाणे आणि ठरल्या वेळेत करून घेता येतात. उगाच कोणी केजरी सारखे विरोधक (जे फक्त विरोधासाठी विरोध करतात) किंवा पर्यावरण प्रेमी गळे नाही काढू शकत. इस्लामी देश असल्याने नाही म्हणायला मुल्ला/उलेमा (उर्फ धर्मगुरू) असतात पण तेथे त्यांना  फार आवाज नाही राहिलाय बहुदा अन्यथा दुबई ची एवढी प्रगती झाली नसती .असो आपला तो काही विषय नाही सध्या !
Aqua venture

तर शेवटच्या दिवशी आम्ही aqua venture ह्या दुबईच्या वॉटर पार्क मध्ये गेलो होतो त्याची तयारी आदल्या संध्याकाळ पासूनच चालू होती म्हणजे costume वगैरे. एवढे केल्यावर ही तिथे आम्हाला पैसे टाकावे लागलेच आणि थोडे थोडके नाहीत तर तब्बल २ हजार रुपये केवळ नायलॉनच्या हाल्फ पॅंट साठी कारण हले आदल्या दिवशी आम्ही खरेदी केली होती पण ट्रायल नव्हती घेतली हो . मग काय ..आलीया भोगासी . असो तर हे वॉटर पार्क अगदी धमाल आहे. त्याची रचनाच अफलातून आहे, म्हणजे ह्या वॉटर पार्क मध्ये काही नाही अस नाही. वॉटर पार्क च्या सुरवातीला लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्लाईडस आहेत आणि तिथेच लहान मुलांसाठी बीच सारखं केलाय आणि तिथेच पालकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणून रिकलाइनर आहेत. समोरच मोठ्यांसाठी बीच, कॅबाना  आणि रिकलाइनरची व्यवस्था केली आहे. मनमुराद तिथे पहुडून वातावरणातल्या उत्साहाचा आनंद उपभोगू शकता. तिथेच स्लाईडस साठीच्या ट्यूब्स  मिळतात आणि तिथेच वॉटर पार्कच्या खऱ्या अनुभवाची सुरवात होते. पहिल्यांदाच सामोरा येतो टॉवर ऑफ नेपचून.

टॉवर ऑफ नेपचून म्हणजे multi स्लाईडस  असलेला एक तीन मजली टॉवर आहे आणि प्रत्येक मजल्यावर २ अशा एकूण ६ स्लाईडस आहेत. पहिल्या मजल्यावरच्या स्लाईडस एवढ्या थ्रिल्लिंग नाहीत पण दुसऱ्या मजल्यावरच्या स्लाईडस पासून थ्रिल ला सुरवात होते. दुसऱ्या मजल्यावर एक शार्क अटॅक म्हणून एक स्लाईड आहे. ही स्लाईड खूप अंधारी आणि बरीचशी नागमोडी आहे आणि मध्ये मध्ये वॉटर जेट्स ने पाण्याचा मारा करतात त्यामुळे खूप मजा येते  आणि ही स्लाईड शेवटी २ मोठ्या फिश टँक्स च्या मधून जाते आणि आजूबाजूला शार्क, स्टिंग रे वगैरे मोठे मोठे मासे दिसतात. खूप छान वाटतं ...तिसऱ्या मजल्यावरची एक वॉटर कोस्टर स्लाईड आहे  जिथे तुम्ही बऱ्याच वेळा वर खाली होता आणि खाली येताना पोटात मोठा गोळा येतो आणि ही स्लाईड ही एका टनेल मधून पास होत कॅनॉल मध्ये एक्सिट होते.
Shark Attack

Tower of Neptune & Leap of Faith Slide
इथल्या प्रत्येक स्लाईडचा एक्सिट  अक्ख्या aquaventure मधून वाहणाऱ्या कॅनॉल ज्याला lazy  river असे नाव आहे त्यात होतो आणि त्या lazy river  मध्ये ट्यूब्स मध्ये बसू आरामात वाहत जाण्याचा अनुभव खासच ...परत त्या रिव्हर/कॅनॉल मध्ये रॅपिड/torrent /wtarefall असे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत जे त्या रिव्हर राईडस ची मजा वाढवतात आणि त्या मुळे स्लाईडस मध्ये गर्दी कमी होते.
View of Lazy River

 Serene & Calm Lazy River Passes through tunnels, Torrents , Wtarefalls etc. 


टॉवर ऑफ नेपचूनच वैशिष्ट्य म्हणता येईल अशी स्लाईड म्हणजे The Leap Of Faith ... जरी हा तिसरा मजला असला तरी त्याची उंची ९ मजल्याइतकी भरते ह्या स्लाईड च्या जवळ आणि जवळपास vertical drop आहे ही स्लाईड म्हणजे...माझी सुरवातीला हिम्मतच होत नव्हती कारण व्हर्टिगोचा त्रास नसला तरी उंचीची भीती वाटते मजला (म्हणूनच एवढा ग्रॉउंडेड असेन मी :) ) इथे बरीच मोठी रांग असते आणि जसे जसे पुढे सरकतो तस तशी जीवाची कालवाकालव वाढत असते, आणि उडी मारणारे खाली जाताना जीवाच्या आकांताने ओरडतात आणि ते ऐकून तर काळजाचं पाणी पाणी होत असतं..तरी ही कशी बशी हिम्मत करून पुढे जात होतो. रांगेत उभी असलेली लोकं ही मनातून घाबरलेली असतात पण दुसर्यांना मात्र चीअर अप करत असतात.. आमच्या जरा पुढे एक इंग्लिश फॅमिली होती , नवरा , बायको आणि मुलगी ... पहिले त्या बाईने उडी मारली , मग मुलीचा नंबर होता पण त्या मुलीची काही हिम्मत होईना, पण बाप्या मात्र तिला हिम्मत कर म्हणून सांगत होता, पण मुलगी काही तयार होईना ...रांगेतल्या लोकांनी मग तिला टाळ्या वगैरे वाजवून प्रोत्साहन दिले. मग ती वडिलांना म्हणाली तुम्ही आधी जा मग मी येते. त्या बाप्याने मात्र कमालीच्या सहजतेने उडी मारली, त्या मुलीने मग पुढची उडी मारली टाळ्यांच्या गजरात. त्या मुलीचे मला कौतुक वाटले. मी जर असतो तिच्या जागी तर वडिलांनी उडी मारल्यावर गपचूप रांगेतून बाहेर येऊन खाली निघून गेलो असतो.


Leap of Faith 

जस जसा आमचा नंबर जवळ येत गेला तसतसे आपण बाहेर पडावे की काय ही भावना बळावत गेली पण एकदाची हिम्मत करून त्या स्लाईडच्या गेट जवळ आलो , जरा त्या गार्ड शी बोललो आणि उसने अवसान आणत एकदाची दैवावर हवाला ठेवून मारली उडी.. एकंदर २० सेकंदाची स्लाईड आहे पण तेवढ्या वेळेत ढगात जाऊन आल्यासारखे वाटले. पहिल्या ३-४ सेकंदात तर बस्स हा शेवटचा श्वास असे वाटले, मग पाठीला त्या स्लाईडचा आधार मिळाला तेवढ्यात पाण्याचा मारा झाला आणि परत २-३ सेकंड सुन्न.आणि मग तो व्हर्टिकल ड्रॉप संपतो आणि ती स्लाईड आडवी होते पण  त्या आडव्या स्लाईड वर हि आपण वेगात पुढे जातो तो मोमेंटम असल्याकारणाने आणि काही कळायला लागत असताना स्लाईड संपत आपण पाण्यात .आणि आत्तापर्यंत सावरायला वेळ मिळालेला नसल्याने पाण्यात ही आपण व्यवस्थित पडत नाही, मग इथेही पाणी नाका तोंडात आणि जीव शरीराप्रमाणेच गटांगळ्या खात असतो. पण ते क्षणिकच कारण तो पूल काही फार काही खोल नाही, मग सावरून स्वतःला gather  करू शकतो. हे सगळं २०-२५ सेकंदात घडतं. अक्षरशः थ्रिल्लिंग!!!अजून ही ती ३० सेकंड डोळ्यासमोरून जात नाहीत. परत मला कोणी ती उडी मारायला सांगितली तर मी तयार होईन काय शंकाच आहे.आमच्या कुटुंबाने ही उडी मारली. त्या आमच्या पेक्षा काकणभर अशा adventure sportsच्या बाबतीत सरस आहेत. त्यांना skydive आणि bungy jumping ही करायचीय.ते तर माझ्याकडून कदापि शक्य नाही

एवढ्या स्लाईडस, रिव्हर राईडस करेस्तोवर बराच वेळ गेला नाही म्हटलं तरी ३-४ तास. आता तहान - भुकेची जाणीव व्हायला लागली पण आमच्याकडे wallet नव्हतं. ते लॉकर मध्ये ठेवलेलं  आणि लॉकर आम्ही २ फॅमिली मध्ये मिळून एक घेतलेलं आणि ते त्यांच्या नावावर डिजिटली register असल्याने  मी काहीच करू शकत  नव्हतो. प्रोबेबल ठिकाणी त्यांचा शोध घेतला, customer care ला ही विनंती करून पहिली  पण no means no एवढंच ऐकायला मिळालं. आता एवढ्या मोठ्या aqua venture मध्ये कुठे शोधणार? मोबाईल्स ही लॉकर मधेच म्हणून कॉल्स पण करता येईना. अगदी तहान भुकेने व्याकुळ नव्हतो झालो पण हवं होतं. समोर एवढं पाणी पण पिऊ शकत नव्हतो, कोणा कडे मागावंतर मागणार कसं हा प्रश्न, शेवटी शॉवरच पाणी पिऊन तहान भागवली आणि The Tower Of Poseidon कडे निघालो. The Tower Of Poseidon हा टॉवर ऑफ नेपचूनचा मोठा अवतार..टॉवर ऑफ नेपचून पासून पुढे Tower Of Poseidon कडे नेण्यासाठी बॅटरी कार्स आहेत..Tower Of Poseidon  मधली स्लीथेरीन सोडली तर बाकीच्या सगळ्याच स्लाईडस भन्नाट आहेत..स्लीथेरीन ही नॉर्मल स्लाईड सारखी आहे पण तिथे २ स्लाईडस शेजारी शेजारी आहेत आणि तिथे स्लायडिंग ची वेळ मोजता येते...एक प्रकारे शर्यतच आहे म्हणा ना!

The Tower Of Poseidon
Zoomerengo
Zoomerengo

झूमरांगो म्हणून एक फॅमिली स्लाईड आहे. एकावेळी ५-६ जण त्या टब मध्ये बसू शकतात..सुरवातीला साधारण कोस्टर स्लाईड सारखी असणाऱ्या ह्या स्लाईडमध्ये आपण थोडे सैलावतो न तोच एकदम व्हर्टिकल ड्रॉप येतो..अनपेक्षितरित्या पडत असताना पोटात मोठा खड्डा पडतो आणि तुमच्याकडे ओरडण्याशिवाय अजून काही पर्याय नसतो तेवढ्यात झोपल्याप्रमाणे टब स्लाईडच्या दुसऱ्या टोकाला उंचावर जातो आणि परत तिथून व्हर्टिकल ड्रॉप...अशी काही धमाल आहे ह्या स्लाईड मध्ये की बस्स!.अनुभवायलाच  हवी.. आम्ही २-३ वेळा ह्या स्लाईड चा अनुभव घेतला...मग Poseidon’s Revenge कडे आमच्या सौंनी मोर्चा वळवला... मी तर हे करणारच नव्हतो...Poseidon’s Revenge मध्ये चेंबर मध्ये बंद करतात आणि पायाखालची प्लेट/फ्लोअर काढून घेतात .चेंबर मधून डायरेक्ट खाली..पायाखालची जमीन सरकते म्हणजे हे काय शब्दशः अनुभवायचे असेल तर आणि तरच ह्या स्लाईडच्या वाटेल जावे.शक्यच नाही असं काही करणं!!..आमचे कुटुंब २-३ वेळा चेंबर मध्ये प्रवेश करते झाले पण ती प्लेट काढून घेण्याच्या काही सेकंड्स आधी बाहेर पडले. नाही हो साध्या सुध्याच काम नोहे हे.. आम्हाला तरी नंतर २-३ लोकं ज्यांनी leap of faith आणि Poseidon’s Revenge ह्या दोन्ही स्लाईडस केल्या ते बोलले, 'leap of faith जास्ती कठीण आहे, ती तुम्ही केलीत आणि ह्याला काय घाबरता?' पण नाही आम्ही पुढे नाही सरसावलो..मग मी परत ती झेपेल अशी स्लीथेरीन स्लाईड वरून आलो आणि सौंनी झूमरांगो  सारखी ऍनाकोंडा स्लाईडची मजा घेतली.
 Poseidon’s Revenge - The Chamber where it begins


The Chamber gets locked & Plate/Floor beneath the feet slides &journey begins
The Slide is passing through the floors & as 1 can see its almost vertical Drop


आता परत आम्ही लेझी रिव्हर मध्ये पडून फक्त प्रवाहाबरोबर वाहण्याच्या विचारात होतो कारण पूर्ण  गळपटलो होतो. तहान व्यवस्थित भागली नव्हती आणि भूक आता मरायच्या मार्गावर होती तेवढ्यात ती फॅमिली आम्हाला शोधत शोधत The Tower Of Poseidon कडे आले आणि आमच्या खाण्या पिण्याची सोया झाली. एक नमूद करावेसे वाटते म्हणजे काहीही हेवी फूड त्यांनी ठेवले नाहीये. सगळॆ हलके पदार्थ आणि liquid म्हणजे Juices, कोल्डड्रिंक्स आणि बर्फाचा गोळा , Ice cream वगैरेचे स्टॉल्स म्हणजे व्यवस्थित हे पदार्थ घेऊन dehydration होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल. उगाच आपल्या रिसॉर्ट सारखे हेवी बुफ्फे घेऊन सगळीकडे रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या जाणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनीच घेतलीय. परत इस्लामिक देश असल्याने दारू उघड्यावर घेण्यास बंदी आणि येणारी लोकं ही व्यवस्थित असतात . उगीच चिप क्राउड येऊन लोकांचा रसभंग झालाय असं कुठे ही झाला नाही. परत चोख सुरक्षा व्यवस्था. पावलापावलावर गार्डस आहेत. लेझी रिव्हर च्या काठी दर १०० फुटावर गार्डस बसवलेत, त्यामुळे आपण एकदम निश्चिन्त असतो. Aqua venture चे वॉटर पार्क आणि आपले वॉटर पार्क तुलनाच नाही होऊ शकत.किंबहुना वॉटर किंग्डमला ही ह्यांची सर नाही.

आम्ही आता खाऊन पिऊन मग पुन्हा The Tower Of  Neptune कडे आलो. शार्क अटॅक वगैरे अशा २-३ स्लाईडस मधली मजा पुनस्श्च अनुभवली आणि लेझी रिव्हर मध्ये मनसोक्त वाहून घेतलं, लाटा अंगावर घेतल्या , रॅपिड मध्ये वेगाने वाहत गेलो , तरी बाहेर यावेसे वाटत नव्हते पण वेळेची गणितं शाळेत ऑप्शनला टाकली तर प्रत्यक्ष जीवनात काटेकोरपणे पाळावी लागतात. एका दिवसात aqua venture काही पूर्ण अनुभवता येत नाही. प्रायव्हेट बीच, शार्क सफारी, डॉल्फिन ऍडव्हेंचर वगैरे तर आम्ही ऑप्शनला टाकले होते. मग कपडे वगैरे बदलून लॉस्ट चेंबर aquarium ला धावती भेट दिली आणि  पाल्म अटलांटिस हे पंचतारांकित हॉटेल ही जमेल तेवढे पाहून घेतले आणि  पाल्म अटलांटिसच्या अद्भुत बेटावरून परत यायला निघालो,फक्त शरीराने , मन तर पुढचे कैक दिवस तेथेच घुटमळत होते.
The Magical World of Palm Atlantis 
Click @ link for more photos of Palm Atlantis Jhumeira Road & Palm Atlantis


पुढच्या दिवशी दुबईला राम राम करून ओमान कडे पुनश्च प्रस्थान केले पण परत दुबईच्या मायावी जगात जीवाची दुबई करायला यायचे असे ठरवूनच!!!! Dubai - Its Truly Connecting the World.

तळटीप - दुबईला जाताना एक दिवस aqua venture साठी खास राखून ठेवावा कारण कोणीच ट्रॅव्हल एजन्ट सहसा हे ऑफर करत नाहीत आणि आपण एका अद्भुत अशा अनुभवाला मुकतो !!!

Monday, 24 October 2016

खेल कबड्डी

जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया,
प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया

टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी .. कबड्डी हा आपण जगाला दिलेला खेळ पण आपल्या कडेच मागे पडत चालला होता (परदेश सारख्या एखाद्या सिनेमात स्वयंवर म्हणून हिरो हा खेळ खेळला होता . तेवढीच काय ती कबड्डीशी राहिलेली ओळख). प्रोकबड्डी लीगने ह्या खेळाला संजीवनी दिली आणि क्रिकेट इतका नाही तरी कबड्डी बऱ्यापैकी लोकप्रिय झाला.

माझी कबड्डीशी आत्मीयता साधारण शालेय जीवनापासून म्हणजे पाचवी - सहावी पासून आहे ..म्हणजे शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धात कबड्डी आणि खो-खो हे दोन सांघिक खेळ असायचे आणि ह्या खेळाचे विजेतेपद म्हणजे फुकटचा भाव खायला मिळायचा..त्यामुळे दर वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नापास कोण झालेय ह्याकडे आमचे लक्ष असायचे म्हणजे एखादा धटिंगण वगैरे नापास झाला असेल तर त्यास संघात सामील करून विजेतेपदाकडे डोळे लागायचे आणि असे दोघे तिघे एकदम गचकले तर बास, आमची गाडी हवेतूनच चालायची..मी कबड्डीच्या संघात नव्हतो कारण शाळेत असताना मी अगदी पाप्याचे पितर  होतो (पाप्याचे पितर कबड्डीत का चालत नाहीत हे थायलंडचे इंडिया-इराण ह्यांच्या बरोबरचे सामने पाहून कळले असेलच) पण चीअर लीडर म्हणून आपली खास ओळख होती.खास आमंत्रण असायचे तेव्हा अशा सामन्यांना  चीअरउप करण्यासाठी . तेव्हा चाळीत राहायचो आम्ही ...त्या चाळीच्या गच्चीवर बाकीच्या बऱ्याच गेम्स सोबत कबड्डीही चालायची ...लॉबी, हाल्फ लाईन, टच लाईन , बोनस लाईन असे काही नियम असायचे त्या खेळात , फक्त सर्विस आणि पकड एवढंच .पण त्यात ही खूप मजा वाटायची ..मग गच्चीच्या खालच्या मजल्यावरचे लोकं तक्रारी करायला लागले आवाजाच्या वगैरे आणि मग गच्चीवरचे खेळ संपले ..मग जवळच्या मैदानात आम्ही जायला लागलो पण तिथे एकमेव खेळ चालायचा क्रिकेट!!!

शाळा संपली तसं बाकीच्या बऱ्याच गोष्टींसोबत कबड्डीही संपली ...डिप्लोमाला फारसं आठवत नाही की कबड्डी असायची की नाही कारण तेव्हा मी हुशार मुलांच्या संगतीत होतो आणि क्रीडास्पर्धा पाहायला डोंबिवली वरून ठाण्याला येतील ही अशक्यकोटीतली गोष्ट.आणि  मी ही एकटा जायचा कंटाळा करायचो.

पुढे डिग्रीला क्रिकेट हाच वार्षिक स्पर्धांमधला marqee इवेंट होता (under-arm आणि over-arm) आणि त्या खालोखाल Volleyball. कबड्डीही असायची पण नावडतीचे पोर , त्यात आमच्या बॅचमध्ये कोणी कब्बडीपटू नसल्याने कोणी ढुंकून ही जायचं नाही कबड्डी सामन्यांना. कारण निकाल माहीत असायचाच.

त्यानंतर तर कबड्डी पार विस्मृतीत गेला. क्वचित पेपरच्या क्रीडा सदरात ओझरता उल्लेख असायचा..पण तो ही दुर्लक्षितच.अचानक कबड्डीने लक्ष वेधून घेतले ते आम्ही ऑफिसचे मित्र पिकनिकला जात असताना .नुकतीच प्रोकबड्डी लीग चालू झालेली .. टोनी दा ढाबा वर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो.टीव्ही वर कबड्डीचा सामना चालू होता ..यू मुंबा विरुद्ध कोणीतरी आणि फार उत्कंटावर्धक सामना झाला तो ..त्यात ज्या पॅशनने  ते खेळत होते व पॉईंट घेतल्यावरच त्यांचे सेलेब्रेशन ..वाह ..मजा आली बघताना..त्यानंतर मात्र प्रो कबड्डी लीग मी सतत फॉलो करतोय

प्रो कबड्डी लीग मध्ये एकापेक्षा एक भारतीय खेळाडू आहेतच पण इराण आणि कोरियाचे ही सर्वोत्तम खेळाडू आहेत.अशातच कबड्डी विश्वचषकाची घोषणा झाली आणि फार उत्सुकता वाढली,  संघ निवडीपासून ते पुढे draw आणि वेळापत्रक सर्वच बाबतीत. खरी उत्सुकता होती संघ निवडीची .कारण साधारण 100 उत्कृष्ठ खेळाडूंमधून 14 सर्वोत्कृष्ठ खेळाडू निवडायचे ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही भारतीय कबड्डी महासंघाने व्यवस्थित निवड केली होती .नाव ठेवायला जागा नव्हती . जगातल्या 6 खंडातले 12 संघ होते.surgical strike मुळे पाकिस्तानच्या  सहभागाबाबत मात्र खात्री नव्हती .शेवटी त्यांना काही स्पर्धेत थारा दिला गेला नाही.त्यांना बाहेर काढल्यावर ते सवयीप्रमाणे बरळलेच "कबड्डी विश्वचषक हा पाकिस्तानशिवाय विश्वचषक असूच शकत नाही". तरी आत्तापर्यंत झालेल्या 2 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते धडक मारू शकले नाहीत की 2014 सालच्या आशियाई गेम्स मध्ये ही  ते अंतिम फेरीत पोहोचले  नव्हते . आपल्याला खरं आव्हान होतं इराणचे.. 2014 सालच्या अंतिम सामन्यात ही त्यांनी वर्चस्व गाजवले होते ते ही इतपत की तेव्हाच आपला कर्णधार राकेश कुमार सामन्यानंतर म्हणाला देखील की हा सामना इराणनेच जिंकायला हवा होता आणि आता आपल्याला ह्या पुढे खरा धोका  असेल इराण कडूनच ! साहजिकच ते 2014 चा वचपा काढायला उतरले होते.आणि draw हे असे होते की इराण आणि आपण अंतिम सामन्यातच भेटलो असतो

स्पर्धेला सुरवात मात्र अनपेक्षित आणि सनसनाटी निकालाने झाली ..कोरियाने आपल्याला हरवले साधारण 36 मिनिट्स आपण आघाडीवर होतो पण शेवटच्या 4 मिनटात कोरियाने बाजी  पालटवली.आपण आघाडीवर असताना सामना किल नाही केला .आपण उगाच बचावात्मक पवित्रा घेतला ...आणि पहिल्या सामन्यात कदाचित अंतिम 7 जणांची निवड चुकली असावी .अजय ठाकूर हा रेडर बाहेरच होता किंवा जसवीर सिंग संघात असणे वगैरे .ह्या पराभवानंतर आपला पूर्ण संघ stunned झाला होता .त्यांचे चेहरेच सगळं काही सांगून जात होते .त्या पराभवानंतर मात्र आपला संघ  जखमी वाघाप्रमाणे चवताळून उठून अंतिम फेरी पर्यंत प्रत्येक संघाला दयामाया ना दाखवता दे माय धरणी ठाय करून सोडले. तिथे आपण पहिल्या सामन्यात हरल्याने इराण आपल्याला उपांत्य फेरीतच आडवा आला असता .पण त्यांना ही कदाचित आपण उपांत्य फेरीत नको असल्याने ते पोलंड विरुद्धचा सामना हरले असावेत (शक्यता  व्यक्त करतोय कारण पुरावे काही नाहीत)

अंतिम सामना मात्र खूपच उत्कंठावर्धक झाला . इराण बदलाच्या आगीत होरपळत होतेच आणि अंतिम सामन्याचे आपल्याला ही दडपण आले असावे ...त्या मुळेच पहिल्या सत्रात इराणने आपल्याला लोण देऊन आघाडी ही घेतली ..मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सकारात्मक सुरवात केली.अजय ठाकूर आणि तोमरने एक सो एक चढाया केल्या आणि आपला डिफेन्स ही कडक पकडी करत गुण मिळवायला  लागला .सुरजीत , सुरिंदर , संदीप ह्यांनी उत्कृष्ट पकडी केल्या आणि इराण वर दोनदा लोण चढवले आणि अप्रतिम असा comeback करत आपण इराणचे आव्हान 38-29 ने परतवून लावले आणि जीत ली दुनिया!!!








जाता जाता खेळाडूंविषयी थोडेसे :- 

अनुप कुमार (कर्णधार) :- Captain cool ही उपाधी खूप चपखल बसते.गेल्या 4 प्रो कबड्डीच्या seasons  मध्ये   त्याला एकदा ही desperate  झालेले पाहिलेले नाही ...game अचूक रीड करतो आणि खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरी करवून घेतो .माझा वैयक्तिकरित्या आवडता खेळाडू आणि भारतीय कबड्डीचा पोश्टर बॉय!!

अनुप कुमार 


सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर (डावा - उजवा कॉर्नर) - भारतीय कॉर्नरचे भवितव्य, ह्यांची जोडी एवढी डेडली आहे की बस्स. एकवेळ डॉन पकडला जाऊ शकेल पण ह्यांच्या पकडीतून सुटणे नामुनकीनआणि दोघांचा ताळमेळ खूपच अप्रतिम. त्यातून नाडाचा ankle hold एवढा प्रभावी  की HOLD IT LIKE NADA असेच म्हणावेसे वाटते.चिल्लर हा प्रो कबड्डी लीग मधला  सर्वात महागडा  खेळाडू अन  दोघे ही माझे आवडते!

नाडाचा Ankle Hold आणि मोहितचे कव्हर 


मोहीतचा Thigh Hold






अंतिम सामन्यातील नाडा आणि मोहितचे Super Tackle



प्रदीप नरवाल, अजय ठाकूर आणि राहुल चौधरी - पहिले दोघेही उत्कृष्ट रेडर.  प्रदीपने पाटणाला एक हाती विजेतेपद मिळवून दिले ह्या वर्षी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अजय ठाकूर विषयी माझे मत फारसे चांगले नव्हते आणि तो आमच्या arch rivals कडून खेळतो म्हटल्यावर तर शक्यच नाही. पण अंतिम सामन्याचा खरा शिल्पकार तोच! खास करून प्रदीप आणि राहुल चौधरी चालत नसताना पट्ठ्याने खरंच कमाल केली. राहुल चौधरीच खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि प्रो कबड्डीचा सगळ्यात  यशस्वी  रेडर ही पण मला ओव्हररेटेड वाटतो.

Rahul Chaudhary in Action


Ajay Thakur Celerating Crucial Point
Pradeep Narwal - Raid Machine

मनजीत चिल्लर, संदीप नरवाल (all- rounders) आणि सुरजीत (डिफेंडर) - संदीपने कॉर्नर म्हणून चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात आपले गुणांचे खाते त्यानेच उघडले होते .डॅश मध्ये ही कडक आहे . मनजीतचा तर खूप दबदबा आहे. Thigh hold आणि block ही त्याची वैशिष्ट्ये.अंतिम सामन्यात दुर्दैवाने तो चालला नाही पण अशा वेळी चालला तो सुरजीत विश्वचषकातील unsung हिरो .अंतिम सामन्यातील त्यांच्या पकडी बघण्यासारख्या होत्या.

Manjeet, Sandeep & Surjeet - Men @ Work

Manjeet's Mighty Block


दीपक हुडा, जसवीर , परमार , चेरलाथन आणि तोमर  -  पहिले दोघे रेडर, दुसरे दोघे डिफेंडर तर तोमर  all -rounder , ह्यातल्या तोमरला बदली खेळाडू म्हणून स्पर्धेत यशस्वीरित्या खेळवले आणि त्यानेही प्रत्येक संधीचे सोने केले.अंतिम सामन्यात ही त्याने मोक्याच्या क्षणी चढायांवर गुण मिळवून दिले. हुडा हा एक चांगला खेळाडू आहे आणि चेरलाथन ही. परमार का संघात होता माहित नाही आणि जसवीर कदाचित पूर्व पुण्याईवर!
Tomar - An able Rounder in Defensive Duties


आणि 

भारतीय प्रशिक्षक बलवान सिंग - खूप नावाजलेले खेळाडू आणि प्रशिक्षक . अनुभवी तसेच उत्साही. त्यांच्या देहबोलीवरूनच जाणवत होते की हा विश्वचषक त्यांना 'उरी' तील शहिदांसाठी  जिंकायचा आहे आणि तसे ते वागले आणि करून ही दाखवले.









कबड्डी ह्या आपल्या खेळात आपला दबदबा कायम राखत विश्वविजेतेपद कायम राखल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! 

proud  2 say 

 "जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!"

Saturday, 1 October 2016

अशी मालिका मनास ताप बाई !!!

हल्ली संध्यकाळ मोकळीच असते म्हणजे क्रिकेट , कबड्डी वगैरे काहीच चालू असल्याने  वेगवेगळ्या मालिका पाहायचे सौभाग्य लाभले...पण ह्या सगळ्यात एका मालिकेने चित्त वेधून घेतले ... कलर्स  का कोणत्याशा वाहिनी वरील अस्सं सासर सुरेख बाई!! (झी वगळता बाकीच्या मराठी वाहिन्या का आहेत?.. कोणी पाहतं का?)

आता तुम्ही म्हणाल नाव तर टिपिकल आहे , त्यात काय चित्त वेधून घेण्यासारखं???  स्टार कास्ट .अगदी तगडी स्टार कास्ट आहे . 1 नव्हे 2 -2 परदेशी अभिनेते लाभले आहेत मालिकेला ..झी मराठीलाही शक्य नव्ह्त झालं परदेशी अभिनेते आणणं!..  संतोष जुवेकर आणि अविनाश  नारकर (चला हवा येऊ द्या वाले जुवेकरला परदेशी अभिनेता म्हणतात कारण तो काय बोलतो काही कळत नाही  म्हणे...चला हवा येऊ द्या वाल्यांचं काय एवढं मनावर घ्यायचं??... त्याला खर्जातला का काय असा काहीसा आवाज म्हणतात ...नारकर ही तसेच बोलतात ..मग एकट्या जुवेकरलाच काय म्हणून हा मान? ..म्हणून आम्ही दोघांना ही समान पारड्यात तोलून 'परदेशी अभिनेते' अशी संभावना करतो..असो) . अलका कुबल ह्यांच्या तिसऱ्या पिढीतली मृणाल दुसानिस ही प्रमुख अभिनेत्री (मधल्या पिढीतल्या ऐश्वर्या नारकर नाहीयेत ह्या मध्ये...पण त्या ही पुढेमागे येऊ शकतील कारण ऐश्वर्या-अविनाश  हे पॅकेज मध्येच येतात अशी वदंता आहे). आणि ह्यांच्या जोडीला कलर्स वर नियमित आढळणारे अभिजीत चव्हाण आणि इतर!!

कथासूत्र ही अगदीच कडक ... म्हणजे आम्ही पहिल्यापासून पाहिली नाही मालिका पण डेली सोपच वैशिट्य आहे की तुम्ही कुठूनही पहा तुम्हाला लगेच कळते .तर कथासूत्र म्हणजे पृथ्वी कन्स्ट्रक्शन नामक अगदी इंडिया बुल्स , हिरानंदानी , लोढा ह्यांच्या पंक्तीत बसणाऱ्या बिल्डरच्या ऑफिस मध्ये इंजिनीयर म्हणून कामास असणाऱ्या व चाळीत एकत्र कुटुंबात राहाणाऱ्या कर्तबगार होतकरू तरुणाचे मालकाच्या मुलीवर प्रेम जडते ज्यास तिच्या वडिलांचानैसर्गिकरित्या विरोध असतो पण पोरीच्या हट्टापुढे तो नमते घेतो आणि लग्नास तयार होतो .. आणि इथून पुढे मालिकेला खरी सुरवात झाली ...म्हणजे बघा जिथे बाकीच्या कथा संपतात तिथे ह्या मालिकेची सुरवात झाली... आहे की नाही सैराट स्टोरी (हो पण इथे ऑनर किलींग  वगैरे नाही...सैराट आम्ही जबरदस्त ह्या अर्थी वापरलाय). तर मालिकेचे कथानक श्रीमंत बापाचा पैशाचा माज विरुद्ध चंद्रमौळी घरातले एकत्र कुटुंबातले सुख!!..बापाचा पैशाचा माज तोडू शकेल का पोरींचे  सुरेख सासर??

आणि सादरीकरण ..विचारूच नका.. अगदीच कमाल आहे !! म्हणजे बाप (अर्थातच मुलीचा) कसा काय होईना लग्नास तयार होतो पण त्यांचं एकच म्हणणं असतं की त्यांचं घर जावई व्हावं पण हे भाऊ पडले स्वाभिमानी! त्यामुळे ते काही ह्या गोष्टीला तयार होत नाही आणि  वडिलांच्या कंपनीत CEO असलेली तुळस नवऱ्याबरोबर चाळीत राहायला येते.(एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की एवढी CEO पण,  ऑफिस मध्ये अजिबात लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब वगैरे काही नाही हा ...म्हणजे एकदम साधी राहणी हुच्च विचारसरणी)..बरं ही एवढी श्रीमंत घरात वाढलेली पण संस्कार विचाराल तर अक्षरशः आपल्या  बाबूजींचीच (अलोकनाथ हो)  मुलगी वाटावी  (आता आम्ही तिचं नाव तुळस ठेवलंय म्हटल्यावर ओघाने आलेच).सासरी आल्या आल्या ती चक्क साडीत वावरतेय.तिच्या मोठ्या बहिणी वेस्टर्न कपडे वापरतात (ते वापरणारच म्हणा ..ते थोडे खल वृत्तीचे दाखवलेत म्हटल्यावर..आपल्या इथे संकेतच आहे ना की mod /westernized  वगैरे आगाऊ आणि खल प्रवृत्तीचे असतात) पण ह्या आपल्या परदेशी अभिनेत्याची बहीण ही तसे कॅसुअल्स वापरते (म्हणजे घरात बंदी नसावी पण हिचे संस्कार)..चक्क पाचला उठून ऑफिसला जाण्याआधी स्वयंपाकास मदत करून मग कामावर जाते..ह्या त्यातल्या काही छोट्या गोष्टी ..पण 2-3 प्रसंग इतके कमालीचे सादर केले की आम्हास दाद देण्यावाचून राहवले नाही आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मालिका पोहोचविण्याच्या उद्दात्त हेतूने आम्ही लेखास सुरवात केली...ते प्रसंग उद्धृत करणे गरजेचे आहे कारण तरच तुम्ही संभाव्य प्रेक्षक व्हाल आणि मालिकेस उचलून धराल ना??

प्रसंग 1 :- तिच्या सासरकडच्यांना साधारण जाणीव होते की हे तर कुठे मधुचंद्राला गेले नाहीत (का? कदाचित हा ही संस्कारांचाच भाग असावा).. तर आपण ह्यांना जरा मोकळेपणा द्यावा, म्हणून एका सुट्टीच्या दिवशी ते काही ना काही कारण काढून बाहेर जाताना दाखवलेत .(पण ह्या संस्कारीबाई च्या डोक्यात प्रकाश पडेल तर शपथ..असो) तर ही बाई घरची साफ सफाई करताना दाखवलीय त्या दिवशी ). साफसफाई म्हटली की रद्दी आलीच. रद्दीवाल्याला बोलावते आणि CEO बाई चक्क रद्दीवाल्याशी भाव करते भैय्या इसका तो लास्ट वक्त 40 हुआ था..आज 30 ही दे रहे हो वगैरे...बघा किती गृहकर्तव्यदक्ष आहे? अहो CEO असूनही बारीक सारीक गोष्टीत लक्ष आहे आणि उधळपट्टी तर जाऊ द्या पण रद्दीचे पैसे ही सोडत नाही..  तिचे पिताश्री तेवढ्यात येतात  आणि हे सगळे बघून 'हेचि फळ काय मम् तपाला' का तत्सम भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात ! पण त्यांचं काय हो ..जन्मजात श्रीमंत आहेत ते .. त्याना काय कळणार रद्दीच्या पैशांचे मोल?

प्रसंग 2 :- आपली नायिका CEO आहे हे माहितीच आहे ..पण आता चाळीत राहत असल्याने घर ते ऑफिस असा प्रवास तिला पब्लिक ट्रान्सपोर्ट ने करावा लागतो .. आता तुम्हा आम्हाला माहितीच आहे की
पब्लिक ट्रान्सपोर्ट किती तापदायक आहे .त्यात ती श्रीमंत घरात वाढलेली, तिला तर सवयच नाही , पण ही इतकी शोषिक की एक चकार शब्द नाही ह्याबद्दल . बापाला तिच्या ह्या गोष्टीची  जाणीव होते आणि पितृहृदयच ते, कळवळते! आणि मग मुलीचा त्रास टाळण्यासाठी मुलीला गाडी भेट देतो..पण हे आपले स्वाभिमानी जावई गाडी कडे पाहत ही नाहीत मग आपली पतिव्रता तुळस कसा स्वीकार करेल ह्या भेटीचा? ती आपली पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करते (तब्बल आठवडा काढला हो त्यांनी  ह्या गोष्टीवर) ..बर ती गाडीने जात नाही तरी ही ऑफिसला लवकर पोहोचते..ह्या वर तिचे पिताश्री , तिची एक कर्मचारी कम मैत्रीण कम मानलेली नणंद (म्हणजे हिरोची मानलेली बहीण हो) वेगवेगळ्या समयी वेगवेगळ्या प्रकारे विचारतात. बरं हे नात्यातले म्हणता येतील पण एक कर्मचारी येऊन गाडी कुठे पार्क केली आहे ? दिसत नाहीये वगैरे विचारतो म्हणजे हे तर बँकेतल्या कॅशियर किंवा तत्सम माणसाने चंदा खोचरला विचारण्यासारखं  झालं  (एवढा डायरेक्ट ऍक्सेस असतो?)..नाही पण आपली तुळस खेळीमेळीचे वातावरण कंपनी मध्ये तयार करण्यात यशस्वी झालीय आणि मालक - कर्मचारी असा भेदच नाही ठेवलाय ..सगळे आपलं म्हणूनच काम करतात..म्हणून तर पृथ्वी कन्स्ट्रक्शन एवढी नावारूपास आलीय..

माझ्या मनात उगाच एक शंका आली की हे एवढे स्वाभिमानी वगैरे मग बापाच्या कंपनीतली  नोकरी कशी काय चालते ब्वा! एवढंच असेल तर तीही द्यावी सोडून आणि शोधावी दुसरीकडे ...हुशार वगैरे ती आहेच , तिला काय पायघड्या टाकुन लोकं बोलावतील ..असो आमच्या मनात उगाच शंका ..सगळ्याच  गोष्टींची आपल्याला माहिती नसते..असती तर इथे असतो काय!!

बाकी जुवेकर आणि नारकर ह्यांच्याविषयी काही लिहिले नाही कारण परदेशी भाषा आम्हास फारशी ज्ञात नाही .. ज्याचे फारसे आकलन होत नाही, त्याविषयी काय बोलणार?

तळटीप :- तर हे सगळं वाचून तुमची मालिकेविषयी उत्कंठा वाढली असेलच... मग आता  तुम्हीच शोधून काढा टाईमिंग आणि पहा अस्सं सासर सुरेख बाई!...मनस्ताप झाल्यास आमची जवाबदारी नाही!!!

मोठी तळटीप - लेखकास हे सर्व लिहिताना भाषेवर मोठ्या प्रयासाने नियंत्रण ठेवावे लागले आहे ! उद्या र प्रत्यक्ष चर्चा करायाची वेळ असल्यास त्यांचा बांध फुटून भडका उडू शकतो ह्याची जाणीव ठेवून मगच चर्चेस सामोरे जावे