Monday, 15 August 2016

#Rio 2016 :Real Meaning of #Feeling Proud

बरेचसे इंग्लिश शब्द/वाक्य आपण अगदी सहजगत्या त्या शब्द/वाक्यांमागच्या भावनेचा विचार न करता फेकत (पक्षी:वापरत) असतो जसे की सॉरी, थँक यू आणि असेच ...त्याच पठडीतले एक वाक्य म्हणजे "U make us feel proud/feeling proud  " .... त्या मागे बहुतेकदा औपचारिकताच जास्ती असते..खऱ्या अभिमानाची भावना  फारच कमी वेळा असते . पण परवाच्या  दिवशी रिओ ओलीम्पिक्स मधली थाळीफेकीची स्पर्धा पाहत असताना मात्र हे वाक्य आणि  त्या मागच्या भावना अनुभवल्या....

बोल्टचा त्या दिवशी इव्हेंट होता (अर्थात 100mtr ची पात्रता फेरी) म्हणून ऑलिम्पिक बघत होतो आणि मध्ये मध्ये थाळी फेक ही दाखवत होते.... मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा  विजेता पोलंडचा मलचोवस्की हा पहिल्या 4 फेकीपर्यंत पुढे होता आणि त्याचे सुवर्ण पदक जवळपास निश्चित होते ....पण जर्मनीच्या हर्टींगने शेवटच्या फेकीत 68 मीटर लांब थाळी फेकत जवळपास सुवर्ण निश्चित केले ...मलचोवस्कीकडे अजून एक संधी होती पण त्या संधी आधी तो बहुदा पराभव पत्करून आलेला ,...त्याच्या हावभावावरुन जाणवत होते...तो मान हलवतच आला आणि अपेक्षेप्रमाणे हर्टींग च्या पुढे जाऊ शकला नाही आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले ...

हर्टींगचे नेत्रसुखद विजयाचे सेलेब्रेशन चालू होते. आता पदके प्रदान करण्यासाठी त्यांना पोडियम वर बोलावले (अजून पर्यंत ऑलिम्पिक मधील पदक प्रदान सोहळा मी थेट पाहिला नव्हता) .... तिघांना पदके दिल्यावर त्यांच्या देशाचे झेंडे फडकवण्यात आले आणि राष्ट्रगीत वाजवण्यात आले ..... जर्मनीचा झेंडा वर घेताना हर्टींग चे expressions  आणि आपोआप रुंद झालेली छाती पाहून माझ्याही भावना त्या क्षणी उफाळून आल्या आणि  अचानक त्या "feeling proud" ह्या वाक्या मागचा खरा अर्थ उमगला..जर एका दुसऱ्या देशातल्या खेळाडूला पदक स्विकारताना पाहून एवढे भरून येते तर आपल्याच देशातील खेळाडूला पदक स्विकारताना आई तिरंगा वर येताना किती अभिमान वाटेल!!
हार्टिग राष्ठ्रध्वजाकडे अभिमानाने पाहताना 

बाकी कुठल्याही स्पर्धांमध्ये हे असे घडत नाही (क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस इत्यादी स्पर्धामध्ये तरी किमान)... आता हाच अर्थ मला तिरंगा वर घेताना अनुभवायचाय...आता पर्यंत भारतीय खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केलेच पण आता उरलेल्या दिवसांसाठी अन स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा !!

Monday, 1 August 2016

जिवाची दुबई (भाग 2)

King's Palace (Entrance)
 पाल्म अटलांटिस मधून बाहेर आल्यावर आता दुबई मॉल ला जात होतो ... वाटेत म्हणजे थोडी वाट वाकडी करून दुबईच्या राजाचा प्रासाद  (अर्थात बाहेरूनच) दाखवला..साधारण  अर्ध्या पाऊण किलोमीटर वरून तो प्रासाद न्याहाळत होतो तरी ही तो डोळ्यात सामावत नव्ह्ता ह्या वरून त्याच्या भव्यतेची कल्पना यावी ....तिथूनच आम्हाला बुर्ज खलिफाची पहिली झलक पाहायला मिळाली ..अरब जगाचं गंडस्थळ आहे बुर्ज खलिफा .. तो ईदचा दिवस असल्याने राजकुटुंबाला ईदच्या सदिच्छा द्याव्यात का असा विचार आला पण राणी अजून उठली नाहीये आणि ती उठून तयार होईस्तोवर फार उशीर होईल अशी भावेश ने जाणीव करून दिली आणि तसे ही तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला आमची ओळख माहित नसल्याने आम्हाला त्या उन्हात ताटकळत ठेवले असते ...परत कधीतरी  असा विचार करून आम्ही तिथून निघालो... पुनश्च त्याने आम्हास दुबई मरिनापाशी आणून सोडले .... दुपारच्या टळटळीत उन्हात ही त्या मरिनाच्या टोलेजंग आणि वेगवेगळ्या आकाराच्या इमारतीचे सौंदर्य उठून  दिसत होते ...थोडा वेळ फोटो वगैरे काढल्यावर पोटातल्या कावळ्यांची कावकाव ऐकू यायला लागली ... आता तिथून थेट दुबई मॉलला आणून सोडले .... तिथेच त्या भावेश भाईने आम्हास जुजबी माहिती दिली अन बुर्ज खलिफाची तिकिट्सही....
First Sight of Burj Khalifa
Marina

Marina 




दुबई मॉल हा जगातला सगळ्यात मोठा मॉल आहे ... हा मॉल फक्त  फिरायला किमान 1 संपूर्ण  दिवस हाताशी हवा ... जगातल्या सगळ्यात मोठ्या मॉलच्या पाठी जगातली सगळ्यात उंच मानवनिर्मित इमारत .... काय कॉम्बिनेशन आहे.... दुबई मॉलच सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते तिथले aquarium आणि फाऊंटन शो ... शो साधारण 4 नंतर चालू होतो ,.... दुबई मॉलच्या खाऊ गल्लीत जगातल्या विविध पदार्थांची रेलचेल होती.. आम्ही मेक्सिकन पद्धतीचे जेवण घेतले नि पोटोबा केला... आमच्याकडे अजून साधारण अडीच तीन तास होते ... दुबई मॉल चे aquarium बाहेरून जेवढे दिसते तेवढेच पाहायचा आमचा विचार होता कारण aquaventure ला ही aquarium पाहायचेच होते ... म परत इथे कशाला पैसे घालवा असा विचार करून आम्ही सुरवातीलाच पॅकेज मधून हे काढले होते आणि तिथले ऍड केले होते.... खाली आल्यावर मात्र तिथल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसचे दरफलक पाहून आम्हास त्यातली एखादी तरी करावी असे प्रकर्षाने जाणवायला लागले.... त्या aquarium मध्ये माशांचे विवीध प्रकार आहेतच ... ते कुठेही असतात ... पण त्या aquarium मध्ये स्कुबा डायविंग ही आहे ...मॉल मधल्या aquarium मध्ये स्कुबा डायविंग .. हेच वास्तविक आपणास अशक्य वाटते पण त्यांनी ते शक्य केलेय .... पुन्हा त्या aquarium मधल्या शार्क किंवा स्टिंग रे जातीच्या माशांबरोबर एन्काऊंटर असे धाडसी खेळ किंवा त्यांच्या अंडरवॉटर झू ची सफर ....अन  हे ही कमी म्हणून की काय एक किंग क्रोक म्हणून 750 kg वजनाची आणि 5 मीटर लांबीची जगातल्या सगळ्यात मोठ्या मगरींपैकी एक मगर आणून वसवलीय ....येवढा आवाका पाहून  ह्यातलं काहीतरी करावं असं आम्हाला वाटायला लागलं आणि  वेळ काळ व खिसा ह्याचा विचार करून आम्ही अंडरवॉटर झू निवडलं ... सुरवातीस त्यांनी आम्हास आत घेऊन एक छोटी 3-d फिल्म दाखवली आणि आम्हाला अक्षरशः फसगत झाल्यासारखे वाटू लागले...म्हटलं एवढे 4 एक हजार भरून  फक्त ही 3-d फिल्म??.. पण तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी पुढे जाण्यास सांगितल्यावर जरा हायसे वाटले... तिथे एक चक्क काचेचा तळ असलेली  बोट होती आणि त्या बोटीतून एक छोटी राऊंड मारायची होती ... त्या बोटीतून प्रवास करता एवढे वेगेवेगळ्या प्रकारचे मासे शार्क आणि स्टिंग रे सकट अगदी जवळून पाहताना ह्या अरबांचे प्रचंड कौतुक वाटले .... बोटीतून छोटी परिक्रमा झाल्यावर ते झू पाहता पाहता साक्षात किंग croc च्या दालनाकडे आलो आणि त्यांच्या समोरच peguin दालन... तोंडात फक्त बोटं घालायची बाकी होती

Dubai Mall & Underwater Zoo (Click on the link for more pictures)




  दुबईच्या ह्या शेखांच्या भव्य दिव्यतेच्या हव्यासाची आपण फक्त कल्पना करू शकतो ... आता त्यांच्या अजून एका भव्य निर्मितीकडे जायची ओढ लागली होती ... जवळपास 4.30 होऊ गेलेले आणि आता आम्हाला चहाची पण तल्लफ आलेली आणि खलिफाचीही .. मग आम्ही झू आवरते घेतले .. पटापट बाहेर आलो चहा घेतला, फ्रेश झालो आना पावले चालायला लागली खलिफाची वाट ...जगातली सगळ्यात उंच मानव निर्मित इमारत... एक वेगळाच उत्साह होता ... दुबई मॉल मधूनच खलिफाला जायला  रस्ता आहे ... वाटेत सर्वत्र खलिफाचे बांधकाम (construction) कसे झाले...  बांधकामातले  milestones  आणि  बांधकामाच्या वेळी प्रस्थापित होत असलेले रेकॉर्डस् ह्याची चित्रफीत, hoardings  पाहायला मिळतात ..बुर्ज खलिफाची निर्मितीच मुळात दुबईच्या पर्यटनास जागतिक ओळख मिळावी ह्या साठी केली गेली आहे...खलिफाच्या नावामागचा इतिहास ही रंजक आहे...ह्या टॉवरचे नाव बुर्ज दुबई असे असणार होते पण  ह्याचे बांधकाम चालू असताना दुबईची अर्थव्यवस्था डबघाईस आली होती व त्या वेळेस अबुधाबीच्या राजाने दुबईस पैसे देऊन ह्या संकटातून बाहेर काढले होते म्हणून सन्मानार्थ ह्या tower ला त्याचे नाव देण्यात आले ....जगातल्या सगळ्या खंडातील लोकांचा ह्याच्या निर्मितीत काहीना काही हातभार आहेच ... तसे ते दुबईच्या विकासातही आहेच ...ही सगळॆ माहिती साठवत आम्ही लिफ्ट समोर आलो .... ही लिफ्ट मोजून 60 सेकंदात आपल्यायाला 125 व्या मजल्यावर घेऊन जाते आणि तुमच्या पोटातले पाणी सुद्धा हालत नाही .. लिफ्ट च्या दरवाज्यावर प्रत्येक सेकंड डिजिटली डिस्प्ले करतात ...तुम्ही तुमचे घड्याळ लावून हे पाहू शकता  ... आयफेल tower जे जगात उंचीच्या बाबतीत 10 व्या क्रमांकावर आहे ...ती लिफ्ट ही इतक्या कमी वेळात वर नेत नाही ....मध्ये एकदा लिफ्ट बदलावी लागते ... तर 60 व्या सेकंदाला आम्ही 125 व्या मजल्यावर होतो आणि तिथून जे दुबई चे दर्शन घडते ते मांडायला शब्द नाहीत.. आपण एका अरबी देशात आणि ते ही वाळवंटी देशात आहोत ह्याची जाणीव फक्त दूरवरचे वाळवंट दिसते तेव्हाच होते ...खालील दुबई मॉल, दुबई डाउन टाउन हा परिसर आई दुबई मरिना चा परिसर ह्याचे सौंदर्य निव्वळ शब्दातीत... दुबई चे जे काही दर्शन होते त्याने अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायला होते ... फक्त वातावरण थोडे hazy असल्याने फोटोस मनासारखे येत नव्हते ... पण तसे ही ह्या गोष्टी डोळ्यांनी मनात साठवून ठेवायच्या असतात ..फोटो कृत्रिम (स)आठवण ...आम्ही prime time चे तिकीट काढले असल्याने सूर्यास्तापूर्वी  व  सूर्यास्तानंतर आजूबाजूचा परिसर ह्या दोहोंचा छान अनुभव  घेता आला ....फॉऊंटन शो ही आम्ही 2-3 वेळा वरून  पाहिला ...अगदी जबरदस्त ... चुकवू नये असा हा शो आहे....  आम्ही जवळपास 2 तास काढून ही आम्हास खाली यावेसे वाटत नव्हते ,.... तसे ही उंचावरून कोणालाच खाली यायचे नसते .. आता मात्र 7 वाजता पुनःश्च एकदा 125 व्या मजल्यावरून (555 मीटर) दुबई 360 डिग्री डोळ्यात साठवून घेतलं आणि आता फौंटन शो दुबई मॉल मधून पाहण्यासाठी खाली उतरलो ... लिफ्ट एका मिनिटात वर आलो होती तशीच 1 मिनिटात खाली उतरली..बघायला आता खूप गर्दी झाली होती ....ईद असल्यामुळे सगळ्यांना खास करून कामगार वर्गाला सुट्टी होती आई सगळे बांगलादेशी , पाकिस्तानी कामगार घोळक्या घोळक्याने आले होते ..

फौंटन शो  मधले फौंटन आणि रोषणाई,  संगीताशी अशी काही सिन्क केलीय की खासच.. एवढे परफेक्ट सिन्क माणसाला ही होता येईल का ह्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही ... दुबई मॉलच्या आकर्षणांपैकी एक आकर्षण  निश्चितच फौंटन शो आहे आई तो ही चकटफू ... आणि चकटफू असूनही दर्जाच्या बाबतीत कुठेच तडजोड नाही .... जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम  फौंटन शो पैकी एक असावा ...
फौंटन शो संपल्यावर मात्र दिवसभराच्या थकव्याची आठवण  झाली आणि आम्ही पटापट निघालो ... मीनाबाजार मध्ये रात्रीचे उदरभरण  करून निद्रादेवी ला जवळ केले ...दुसऱ्या दिवशीच्या डोल्फिन शो आणि स्की दुबईच्या अनुभवासाठी सज्ज व्हायला

At The Top Burj Khalifa (Click on the link for more pictures)
















 क्रमशः

Friday, 15 July 2016

जिवाची दुबई (भाग 1)

गल्फमधे नोकरीला आलं की एक टार्गेट असतं दुबई बघायचं, त्या शिवाय तुमच्या गल्फ वारीची पूर्तता होत नाही... आता साधारण दोन वर्ष होत आलीत इथल्या वाळवंटात येऊन पण अजून काही दुबई वारीचा योग नव्हता आला ... म्हणजे एकतर पहिल्या वर्षात आर्थिक दृष्ट्या थोडा स्थिरस्थावर व्हायचा असतं न दुसरं म्हणजे सुट्टी आली की किंवा वार्षिक रजेच्या वेळी आपला मोहन भार्गव होऊन जातो आणि कधी एकदा स्वदेशला पाय लागतात असे होऊन जाते..ह्या ही वर्षी योग दिसत नव्हता पण सध्या वाळवंटातले वारे खराब वाहत आहेत मग ईदच्या सुट्टीसाठी घरी जायचा विचारच नाही आणला मनात आणि आयत्या वेळी विमान कंपन्या एवढी किंमत वाढवतात की तिकिट विकत घ्यायची आपली ऐपत राहत नाही....त्यात ऑफिसमधल्या एकाने पिल्लू सोडलं की सुट्टीत काय करणार 5 दिवस चला दुबईला जाऊ  मग जाऊन आलेल्या एकाने असं काही वर्णन केलं की मग इलाही मेरा दिल चाहे सुरू झालं ... मग काय माहिती, चौकशी आणि चर्चा सुरू झाल्या ...

शेवटी भावेश भाई म्हणून एक दुबईच्या eclipse tourism च्या सेल रेप्रेसेंटेटिव्हला गाठले ...आमच्या कंपनीतली बरीचशी लोक त्याच्या कडून जाऊन आल्याने न त्यांचा त्याच्याबद्दल फीडबॅक चांगला होता ज्याचा अनुभव आम्हाला आलाच पुढे ... पण negotiate करताना फार नाकीनऊ आणले...जायच्या 3 दिवस आधीपर्यंत जायच बुकिंग नव्हत बाकी सगळं तयार होत,  म्हणजे हॉटेल बुकिंग, दुबई प्रोग्राम आणि व्हिसाही .. शेवटी सर्वच दृष्ट्या सोयीस्कर (आर्थिक वगळता) fly dubai  ने fly करायचा ठरवलं .... दुबईच्या भव्य दिव्याच्या हव्यासाची प्रचिती fly dubai च्या टर्मिनल वर आल्या आल्याच येते... म्हणजे fly  dubai ही low cost aviation company असून ही तिचे स्वतःचे एक टर्मिनल आहे.. ओमान - दुबई हा विमान प्रवास फार तर 1 तासाचा .... दुपारी आम्ही हॉटेल वर होतो...पहिल्या दिवशी आमची मरीना dhow cruise होती ....dhow cruise ची 2 तासांची निवांत सफर नव्या दुबईच्या स्कायलाईनचे दर्शन घडवते आणि दुबईच्या ह्या पहिल्याच दर्शनाने माणूस अचंबीत होऊन जातो आणि प्रेमात पडतो..  dhow cruise च्या धक्क्यावर आम्ही आल्या आल्याचं किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते पण त्या धक्कयावर फारच आर्द्रता असल्याने कॅमेराच्या लेन्सवर लगेच बाष्प जमायचे आणि फोटो धूसर येत होते... शेवटी कॅमेरा बंद करून ठेवला पण सुदैवाने आमची  cruise येईस्तोवर आर्द्रता कमी झाली आणि मनासारखे फोटो काढता आले ....वेगवेगळ्या आकाराच्या आणि उंच उंच बिल्डींग्स पाहून इथल्या अराबांविषयी कमाल वाटू लागली .... architect ने फक्त त्याच्या डोक्यातली कल्पना कागदावर उतरवावी आणि ह्या अरबांनी ते करून टाकावे अशातला प्रकार ... खास करून muscat वरून आल्यावर तर दुबई निशब्दच करून टाकते...(फोटोसाठी ह्या साखळी वर टिचकी मारा Dubai Diary : Day 1 @ Marina Dhow Cruise)

जगातल्या सगळ्या प्रमुख शहरात त्यांची स्कायलाईन दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलीय...बाकीच्या देशांनी त्यांच्या नैसर्गिक स्रोतांचा उत्तम प्रकारे वापर केलाय... दुबई ने तर क्रीक बांधून त्यात समुद्राचे पाणी खेळवलेय आणि आणि अशा डिनर cruises आयोजित केल्यात ...पण दुर्दैवाने आपल्याकडे ह्यातली काही व्यवस्था नाही ... कारण इच्छाशक्ती नाही ... आहे त्या स्रोतांची गटारं करून टाकलीत आणि नवीन बांधायचे तर तशी इच्छाशक्ती नाही आणि चुकून उसने अवसान आणलेच तर पर्यावरणवादी वगैरे त्याला पन्नास फाटे फोडणार ...त्यामुळे आपण फक्त अचंबित व्हायचे

दुसऱ्या दिवशी आमची दुबई सिटी टूर , दुबई मॉल आणि अरबांचे प्रतिष्टेचे प्रतीक बुर्ज खलिफा चे दर्शन असणार होते... प्रत्यक्षात हा सगळं कार्यक्रम तिसऱ्या दिवशी होत आपण आम्हाला बुर्ज खलिफाचे तिसऱ्या दिवशीचे prime time तिकिट नव्हते मिळाले आणि दुसऱ्या दिवशीचे मिळत असल्याने हा छोटासा बदल करण्यात आला...

दुबई टूर च्या वेळी तो भावेश भाई स्वतः ही होता दुबई ची माहिती द्यायला....जुनं दुबई (बर दुबई  आणि डेहरा दुबई) दाखवलं... मीरा बाजार मधून ही फिरवलं ....मीरा बाजार म्हणजे तर चक्क मुंबईतला भेंडी बाजारच आणून बसवलाय ... सगळॆ भारतीय आणि पाकड्यांची दुकानं  त्यांचीच वस्ती... अरब त्या भागात औषधाला ही सापडत नाहीत ...इव्हन वडा पाव आणि पाणी पुरी ही मिळते आणि मीना बाजार आमच्या हॉटेल पासून 5-10 मिनीटाच्याच अंतरावर असल्याने आम्हाला रात्रीच्या जेवण्याचा काही प्रश्नच उरला नाही ,... मीना बाजार अजून एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे ब्रँडेड घडाळ्यांची first copy ... rado , tag  heuer , michael kors , armani birmani असल्या महागडया घडाळ्यांची first कॉपिय मिळते आणि अक्षरशः काही ही फरक नाही ओरिजिनल आणि कॉपिय मध्ये (फक्त आत मधला मशीन सिको वगैरे लोकल कंपन्यांचे बसवतात) ते घेताना मात्र तुमची ओळख पाहिजे आणि bargaining skills , ते असले तर 2500$ ची घड्याळ तुम्ही 50$ मध्ये मिळवू शकता ... डेहरा दुबई मध्ये गोल्ड souq आहे .. souq म्हणजे मार्केट किंवा बाजार.... सोन्याची दुकानं अशी शेकड्यात लागून आहेत...नशिबाने तो ईद चा दिवस असल्याने दुकानं बंद होती आणि आमच्या खिशाला काही चाट नाही पडली ... ते झाल्यावर दुबईच्या जुमेरा भागातून फिरलो हा  जुमेरा भाग म्हणजे  आपली दक्षिण मुंबई ... अति श्रीमंतांचा भाग... तिकडे एक भागात काही सरकारी बंगले आहेत ...त्यांच्याविषयी सांगितलं जातं की ते बंगले सरकारने गरिबांसाठी बांधले होते (बघा गरिबांसाठी ही बंगले आणि आपण गरिबांना अन्न वस्त्र आणि निवारा ही देताना मारामार) तर त्यांच्याकडे असे काही अर्ज च नाही आले मग सरकारने ते श्रीमंतांना घ्यायची विनंती केली तर श्रीमंतांनी घेतले नाहीत कारण ते बांधले होते गरिबांसाठी म्हणजे त्यांची गणती गरीबांमध्ये ...शेवटी त्या श्रीमंतांनी ते घेऊन त्यांच्या कंपन्यांमध्ये कामाला असलेल्या expatschi राहायची व्यवस्था केलीय ...

तिथूनच पुढे बुर्ज अल-अरब म्हणून 7 स्टार हॉटेल आहे...त्या बुर्ज अल-अरब च्या स्काय लॉन्ज मध्ये म्हणे सोन्याच्या ग्लासातून मदिरा दिली जाते आणि दारू पिऊन झाल्यावर तो ग्लास तुम्हाला भेट दिला जातो...आता ह्या सगळ्या आख्यायिकाच असाव्यात कारण कोण जाऊन पाहणार खरे काय नि खोटे काय ते... त्याच पाल्म जुमेरा वर पुढे वेगवेगळी थिम हॉटेल्स आहेत ...एक तर चक्क व्हेनिस च्या धर्तीवर बांधलय म्हणजे तिथल्या वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये जायच तर जलवाहतूक करून ... जल वाहतुकीवरून लक्षात आला... सध्या तिथे 33 km क्रीक बांधायचा काम चालू आहे ... जलवाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी .. चालना देणं हा शब्द वापरलाय खरा पण तो अजिबात उचित नाही कारण चालना अशा गोष्टींना देतात के जेणे करून पर्यटक आकर्षित होतील आणि तिथल्या लोकांना काही रोजगार मिळेल...पण दुबई हे तर खरंच जगात प्रसिद्ध पावलंय पर्यटनासाठी ... आणि वर्षाचे 12 महिने 24 काळ दुबई हे टूरिस्ट्स ने भरून अखंड वाहत असतं... असो तर त्या क्रीक मधून पाणी खेळवून शेवटी ते समुद्रात नेऊन सोडणार ...त्या पाण्याचा उपयोग जलवाहतूक आणि पर्यटनासाठी ...बर दुबई आणि डेहरा दुबई ह्या छोटयाशा अंतरासाठी ही जल वाहतूक चालते आणि एकदम स्वस्तात ... आपल्या इथे पाण्याचा उपयोग फक्त पेटवण्यासाठी (लोकांची मने) केला जातो.. असो ...

तिथून पुढेच पाल्म जुमेरा ही जगप्रसिद्ध कृत्रिम बेटांची कॉलोनी आहे आणि त्याच्या शेवटी पाल्म अटलांटिस हे 7 स्टार हॉटेल (इथेच Happy  New  Year ह्या फराह खान आणि शाहरुख ह्या जोडगोळीला अत्यंत टुकार चित्रपटाचं शूटिंग झाल होतं)..  तर ह्या पाल्म जुमेरा बेटांचा आकार पाल्म तरी आणि त्याच्या फांद्यांसारखा आहे आणि प्रत्येक फांदीच्या मधून सेन्ट्रल रोड पर्यंत पाणी खेळवलंय आणि त्या फांद्या म्हणजे एक एक गल्लीच असल्यासारखा आहे आणि त्या गल्ल्यामंध्ये private villas ... आणि त्या प्रत्येक villa ला परिवते बेच असल्यासारखा आहे ...फक्त aerial  view मधून त्याची उत्तम कल्पना येऊ शकते ..जुमेरा रोड ते पाल्म जुमेरा आणि अटलांटिस हॉटेल ह्यांना जोडणारी मोनोरेल आहे जी गल्फ मधली सगळ्यात पहिली मोनोरेल ... ह्या मोनोरेल ने आम्ही अटलांटिस हॉटेल पर्यंत प्रवास केला...ह्या मोनोरेल ने पाल्म जुमेराच वैभव पाहत प्रवास करणे हे शब्दातीतच ...कुठल्याही क्षणी आपण गल्फच्या वाळवंटात आहोत ही जाणीव मनाला स्पर्श करूनदेत नाही....खरंच ह्या अरबांची कमाल वाटते...पैसा आहे हे मान्य पण त्या पैशांच्या जोरावर वेगळीच दुनिया उभारणं ह्या साठी प्रचंड इच्छाशक्ती लागते ... ह्यांच्या हातात असतं तर वातावरणावर ही ताबा मळवून कायम pleasant temperature maintain केलं असतं... ह्या पाल्म अटलांटिस ला आम्हाला यायचंच आहे परवा aquaventure मध्ये दिवस घालवायला पण तेव्हा रोड मार्गे...म्हणून आज ही मोनोरेल ची सफर....

क्रमशः

Saturday, 28 November 2015

देऊळ बंद

मस्कत मध्ये पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित (म्हणजे एकमेव शो) होण्याचा मान देऊळ बंद ह्या चित्रपटाला मिळाला. वास्तविक ह्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला जाऊन ह्या उपक्रमास पाठींबा द्यायचं प्रयोजन होतं पण आम्ही काही जाऊ शकलो नाही, पण असो तो काही मुद्दा नाही. देऊळ बंद हा चित्रपट आणि त्या चित्रपटाचा नंतर राहिलेला प्रभाव आणि त्यानंतर केलेली पारायणं ह्या मुळे त्या चित्रपटाविषयीच्या भावना लिहून काढाव्याशा वाटल्या.

मुळात देऊळ बंद ह्या  नावावरून आणि त्याच्या प्रसारासाठी whatsapp  वरून फिरणाऱ्या मेसेजेस मुळे तरी फार कोणी (ज्येष्ट नागरिक आणि श्रद्धावान लोक वगळता) आकर्षित झाले असतील ह्या चित्रपटाकडे असे वाटत नाही. माझा ही साधारण तोच प्रकार.  म्हणजे त्याची प्रिंट आमच्या ऑफिस मधे येउन ही जमाना झाला आणि सरावाने वीकेंड ला पाहण्याच्या उद्देशाने ती मी घरी आणली पण पाहणे काही झाले नाही म्हणजे हा काय चित्रपट पाहायचा असा काहीसा दृष्टीकोन. आणि त्यातून आमचे आई-बाबा  मायदेशात चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहून आले आणि त्यांना फार आवडला.  त्यांना चित्रपट आवडला म्हणजे आपल्यासाठी तर तो नक्कीच नसावा असे माझे गृहीतक (ह्या गृहितका मागे साधारण generation gap कारणीभूत असावी)

पण  एका 'वीकेंड'ला काहीच कार्यक्रम नसल्याने काय करायचे हा प्रश्न होता . म हो नाही करता करता शेवटी देऊळबंद पहायचे ठरले आणि पुढचे ३  तास आम्ही अक्षरशः जागेवरून उठलो नाहीत. ह्याचे कारण सर्वच पात्रांचा अभिनय, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले किंवा सादरीकरण . कथा तर whatsapp  वर फोरवर्ड झाल्या प्रमाणे नासाचा संशोधक (नास्तिक) इस्रोच्या विनंती वरून  दहशतवाद्यांच्या हालचाली (साधारण समुद्री हालचाली) वेळीच टिपून त्यावर वेळीच योग्य ती पावले उचलण्यात मदत हवी ह्या हेतूने त्याने विकसित केलेली frequency  इंस्टाल करण्यासाठी येतो.  त्याची राहण्याची व्यवस्था ज्या संकुलात केलेली असते तिथे स्वामींचे एक देऊळ दाखवलेय आणि तिथे दिवस रात्र त्यांच्या सेवे निमित्त  कार्यक्रम होत असतात ज्याने तो थोडा विचलित झालेला असतो आणि त्यात गुरुपोर्णिमेनिमित्त जे विशेष कार्यक्रम होतात त्याने त्याचा संयम सुटतो आणि तो वरच्या लेवेल ची सूत्र हलवून देऊळ बंद करवतो आणि इथून पुढे चालू होतो आस्तिक आणि नास्तिकाचे द्वंद्व आणि  पुढे काय होणार चा खेळ जो आपल्याला शेवट पर्यंत गुंतवून ठेवतो.

गश्मिर महाजनीने नासा चा संशोधक  अप्रतिम साकारलाय. त्याचे व्यक्तिमत्त्व ही खूप चांगले आहे. मराठीत बऱ्याच दिवसांनी चांगला दिसणारा आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व असणारा आणि चांगला अभिनय करणारा अभिनेता गवसलाय असे म्हणून शकतो. राघव शास्त्री (संशोधक) हे खलनायकी पात्र होऊ शकले असते पण त्याने अजिबात तोल ढासळू दिला नाही. उलट उत्तरार्धात त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. मुळात तो नास्तिक नसून त्याचा स्वामींवर राग असावा असे वाटते आणि त्यांच्या वरील रागातून बाकीच्या देवांचे ही अस्तित्व नाकारतो असे काहीसे असावे.

काही काही गोष्टी चित्रपटात खटकण्यासारख्या आहेत पण त्या दुर्लक्षित करता येण्या सारख्या आहेत. उत्तरार्ध मात्र खूपच उत्कंठावर्धक आहे आणि मोहन जोशींनी स्वामी समर्थ अप्रतिम साकारलेत, म्हणजे आजच्या पिढीशी आजच्या पिढीच्या भाषेत स्वामी समर्थ (पोशाखासाहित) त्यांच्याच भाषेत संवाद साधतात ही कल्पना तर खूप अप्रतिम. तसे बघायला गेले तर एखाद्या विशिष्ट देव-देवतेची महती सांगणारे खूप च चित्रपट येउन गेलेत, येउन जात ही असतात पण त्यांचा दर्जा मात्र तितकासा उत्तम नसतो पण हा चित्रपट मात्र भक्तीपट ह्या पातळीवर राहत नाही आणि एक उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान देतो.


चित्रपट पाहिल्यावर साधारण डोक्यात विचारचक्र  चालू  होते  की दृष्टांत वगैरे  घटना असाव्यात का किंवा  प्रचीती वगैरे अशा गोष्टी शक्य  आहेत  का?  आताच्या काळाला सुसंगत असा विचार केला तर त्याचे उत्तर कदाचित नाही असे असणे शक्य आहे पण हेच जर आपल्या मागच्या पिढीला विचारले तर ते कैक उदाहरणं उभी करतील. माझ्या स्वतःच्या घरात आमचे आई-बाबा ४-५ उदाहरणं बोलता बोलता सांगतील. कारण काही घटना अशक्य कोटीतून घडलेल्या असतात आणि त्याच्या मागे निव्वळ योगायोग असू शकतो पण त्याच्या पाठी काही तर्कसंगती न लावता आल्याने तय योगायोगाला प्रचीती आली वगैरे म्हणणं  शक्य आहे . उदाहरण  द्यायचे झाले तर माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. रात्री २ वाजता ची गोष्ट!!! २ वाजता कुठलेही वाहन मिळण्याची शक्यता दुरापास्त आणि मला कोणाला (शेजारी पाजारी किंवा मित्र) मुद्दाम त्रास देणे सोयीस्कर वाटत नव्हते.  मी खाली काही वाहन मिळते का बघायला उतरलो आणि त्याच वेळेला नेमका बाजूच्या सोसायटीमधे एक कॅब  सोडायला  आली होती आणि तो आम्हाला इस्पितालापर्यंत घेऊन जायला तयार झाला. आता जर तो कॅब वाला नसता आला तर मित्राला वगैरे बोलावणे गरजेचे होते आणि तसे केले गेले ही असते पण योगायोगाने कॅब मिळाली.  आता हे आई - बाबांना विचारल्यास स्वामी पाठीशी होते म्हणून लगेच कॅब मिळाली अशा शब्दात मांडून कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा विचार करता त्यात काही चुकीचे नाही. पण आपण त्याचा अर्थ काय लावावा?  शेवटी बराच विचार केल्यावर मी एक सोप्पे उत्तर शोधले शेवटी श्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ज्याने त्याने आपल्या बुद्धी आणि अनुभवाप्रमाणे त्याचा अर्थ लावावा कारण काही गोष्टीना वैश्विक परिमाण लावता येत नाही हेच खरे!!!!!

Monday, 19 October 2015

सासुलीचा योगी श्री सावत्या!!!

लाह्या व्हाया, लाह्या व्हाया!!!असा काहीसा आवाज बस मध्ये ऐकायला आला की आम्हास समजायचे बेलापूर आलेले आहे आणि पाच एक मिनिटात ऑफिस मध्ये पोहोचणार,  किंवा अचानक रेड्याचा आवाज ऐकायला यायला लागला की आम्हास समजायचे आता पांडवकडा आलाय . आणि मग आम्ही आमची झोप आवरायला लागायचो.असले उद्योग कोण करणार .सावत्याच.आमचे बस मधले घड्याळच म्हणा.फक्त यांत्रिक घड्याळ आणि हे मानवी घड्याळ ह्यातला फरक की ह्याचा आवाज ऐकला की आमच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर नकळत उमटायची.

सावत्याची आणि माझी ओळख गेल्या २-२.५ वर्षातीलच आणि तशी  ही अनावधानानेच झालेली ....माझ्यावर lead  पणाची नवीन वस्त्र चढवण्यात आली होती आणि त्या प्रोजेक्ट ची सुरवात होती. सिविल मधला एक designer चांडेल म्हणून, त्याचे माझ्याविषयी फार चांगले मत होते (वास्तविक सिविल आणि माझे department  एकमेकांना पाण्यात बघतात). पण तो त्याच्या department  मध्ये नवीन होता आणि तिथे त्याला फारशी कोणाची मदत मिळायची नाही बहुदा. तर त्याच सुमारास हा सावत्या ही रुजू झाला आणि त्या चांडेलने सावत्याशी माझी ओळख करून दिली. सुरवातीला मी त्याच्या कडे दुर्लक्ष करायचो  कारण तो चांडेल मला 'सर' म्हणायचा आणि माझ्या टीम मधले बाकीचे ही आणि हा सावत्या मात्र चक्क अरे तुरे. नाही म्हटलं तरी जो काही खरा खोटा , फुकाचा अहंकार होता तो त्या मुळे डिवचला गेला होता. त्याला गावावरून येउन बहुदा फार महिने उलटले नव्हते. गावचा अघळ पघळ  पणा  आहे तो त्याच्या वागण्याबोलण्यात असायचा आणि मग आपोआप अशा लोकांना आपण परीट घडीचे लोक सहसा जवळ उभं करीत नाही, त्यातलाच तो प्रकार.त्याला फार जाणवू दिलं नाही पण त्यातलेच. त्यात पुन्हा तो बस मध्ये पाठी येउन बसायला लागला आणि माझ्या आधीच्या stop वर चढायचा आणि माझी नेहमीची जागा बळकावायचा. मग खिडकी साठी लोकांच्या मिनतवाऱ्या मला काढाव्या लागायच्या.  आता तो अजूनच डोक्यात गेला होता. पण एकदा संध्याकाळी बस मधून येताना work pressure विषयी आमची चर्चा सत्र घडत होती आणि खूप शॉट लागला होता डोक्याला! तेव्हा मध्ये पडून सावत्याने फारच करमणूक केली आणि वातावरण निवळल. मग  जरा जाणीव झाली की सावत्या हे रसायन काही वेगळं आहे. मग त्या रसायनाचे पृथक्करण करून गुणधर्म जाणून घ्यावेसे वाटू लागले. माझं पृथक्करण सांगत एकदम पारदर्शक माणूस.आत एक बाहेर एक असं असणं शक्यच नाही आणि सदानकदा हसरा  चेहरा. त्याच्या बरोबर असताना dull  वाटणारच नाही. आणि म्हणून कदाचित माणसांचा त्याच्या भोवती गराडा आढळून येईल. एक उत्तम कलाकार, उत्तम वक्ता. पूर्ण गुणधर्म मांडायचे तर कदाचित ग्रंथ लिहावा लागेल पण आवर्जून सांगायचे म्हणजे उपमा देण्याच्या बाबतीत तर त्याचा हात कोणी ही धरू शकत नाही. कोटीच्या बाबतीत तो थोडा कमी आहे ..पण राहिला असता थोडे दिवस माझ्याबरोबर तर ते हि शिकला असता ;). त्याची बडबड ऐकली म्हणजे माणूस उदास राहूच शकत नाही. अचानक आपल्यात ही उर्जा येते .उर्जेचा स्त्रोतच जणू !!!!


हयाच्याकडे सांगण्यासारखे किस्से बरेच असायचे. त्यातून हा कलाकार माणूस , त्यामुळे तो हातवारे करून विलक्षण रीतीने रंगवून सांगायचा (थोडक्यात भूमिकेत शिरला की  आवरणे कठीण जायचे). त्या किस्श्यापैन्की दशावतारी नाटकात घडलेले ;अवंती पुरी नगरीतील राजाचा' आणि 'ठो' हे किस्से तर अजून ही  आठवले तरी हसून दमछाक होते. त्याच्या किस्स्यांमुळे सावत्या एकदम प्रसिद्ध झाला आणि हळू हळू तर अक्खी बस सावत्याचे किस्से ऐकण्यास पाठी गर्दी करू लागली. सावत्याकडचे किस्से हळूहळू संपत आले आणि आमची अजूनची भूक काही मिटत नव्हती मग आम्ही काही न काही (म्हणजे मी, पाटील न गिरीश नामक व्यक्तिमत्व) कारण काढून  किंवा काही विषय काढून सावत्या ला गिऱ्हाईक करू लागलो . ९५-९६% हा  खेळी मेळीने समोर जायचा आणि १ तासाचा कंटाळवाणा आमचा प्रवास  सुखकारक व्हायचा.
रडणं आणि दारुड्याचा अभिनय तर हुकमी.  एकदा असेच आम्ही barbeque  nation  मध्ये जिभेचे चोचले पुरवायला गेलो होतो.  तेव्हा इतर कोणाचा तरी वाढदिवस असावा आणि त्यांनी केक कापल्यावर barbeque  nation  वाल्यांनी  "Happy  Birthday to you " हे गाणं वाजवलं आणि हा भाई अचानक देह भान आणि जागा विसरून नाचायला लागला. लोकांना वाटलं दारूचा अंमल चढला असावा म्हणून विचित्र आणि सहानुभूतीपूर्वक नजरेने लोक त्याच्याकडे आणि कोणत्या ग्रुप बरोबर आलाय म्हणून आमच्याकडे पाहायला लागले आणि आम्हास एकदम मेल्याहून मेल्यासारखे झाले. ते बेअरिंग त्याने शेवट पर्यंत कायम ठेवले आणि ते एवढे हुबेहूब वाटले होते की आम्ही हॉटेलच्या खाली बिल भरून येणार्यांची वाट पाहत होतो आणि एक जोडपे बिल भरून खाली आले आणि त्यातल्या बाप्याला काही विसरल्याने परत वरती जावे लागले आणि तो खाली येईपर्यंत त्या बाईने सावत्याचा अभिनय पाहिला असावा. आम्हाला पास होताना ती बिचारी नवऱ्याला बिलगून आणि सावत्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून पाहत जात होती. माझी हसून हसून वाट लागली आणि जाऊन त्या बाईला सांगावेसे वाटले की अहो त्याने अजिबात घेतली नाहीये फक्त तो अभिनय करतोय. आयुष्यभर हा प्रसंग विसरू शकत नाही.

प्राणीमात्रांविषयी त्याचे प्रेम तर एवढे अफाट आहे की शब्द नाहीत. खास करून त्याच्या गावच्या घराच्या आसपास किंवा त्यांचे पाळीव प्राणी ह्यांच्या विषयी. म्हणजे गाई- म्हशी, रेडे, कुत्रे इत्यादी इत्यादी. ह्यातल्या कुठल्याही प्राण्याला लांबून पाहूनच तो त्यांना काय झालाय किंवा त्यांचा मूड काय आहे वगैरे व्यवस्थित सांगू शकतो. आमच्या ऑफिसच्या जवळच एक टपरी आहे चहाची. तिथे आम्ही कधी चहा प्यायला गेलो की आजूबाजूचे कुत्रे  जमा होतात सावत्याच्या भोवताली (म्हणजे ते भूतदया अंगात भिनवलेले गुज्जू, बिस्कीट घेऊन आले कि जसे जमतात तशातला प्रकार नाही बरं का). प्राण्यांना म्हणे sixth sense  असतो. त्या sixth  sense  मुळेच असेल कदाचित त्यांना त्यांचा स्वामीच आल्यासारखे वाटत असावे ... म्हणूनच आम्हीपण सावत्याला 'दत्तगुरू' म्हणतो. सध्या तो मोरोकको ला गेलाय. त्याला तिथल्या सगळ्याच गोष्टी आवडल्या असणार आणि तिथे तो रुळला ही व्यवस्थित पण तिथली एक गोष्ट त्याला खटकतेय (तो बोलला नाही कोणाला पण मला नक्की माहितेय) की तिथे त्याचे सवंगडी नाहीत.त्यांचा तिथे मुक्त वावर नाही, पण नक्कीच तो पुष्पक मधील कमल हसन प्रमाणे त्यांचे आवाज ऐकत असणार आणि दर्शन घेत असणार.

आम्ही त्याला परोपरीने समजावून सांगतो की त्याचं क्षेत्र चुकलंय .बरेचसे वेगवेगळे option ही सुचवतो पण तो त्याला आमची नेहमीची फालतुगिरी समजतो आणि सोडून देतो. ओमानला आल्यापासून मी मिस करत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सावत्या आणि इतर BAGPACKERS बरोबर केलेली धमाल. बाकीच्या सगळ्यांना प्रत्येक भेटीत भेटणं शक्य झालंय पण सावत्या महाराजांचं काही न काही कारणाने अजून दर्शन झालेलं नाही आणि पुढील भेटीत ही होईल असा वाटत नाही.

सूर्याचे वर्णन काजवा काय करणार. काजव्याचा प्रकाश लिहून लिहून कमी होत चाललाय म्हणून इथेच आटोपते घेतो.


सावत्या महाराजांचा आज प्रकट दिन आहे त्यानिमित्त हा लेख त्यांना समर्पित आणि प्रकट दिनाच्या ह्याच शुभेच्छा की बेलापूर - jacobs प्रमाणे Morocco - Jacobs मध्ये ही सावत्या महाराज प्रसिद्धीस पावतील ..आता त्यांच्यातील मोठे पणास अनुसरून ते म्हणतील  की आता मक्या तू नाही मग मला प्रसिद्धी कोण देणार पण त्यास माझे इतुकेच म्हणणे आहे की 'हिऱ्याची चकाकी काही लपून राहत नाही'

Sunday, 30 August 2015

वळू (Highway च्या निमित्ताने पुनच्छ)

हायवे च्या प्रसिद्धी च्या निमित्ताने कुलकर्णी बंधू (आडनाव बंधू फक्त) चला हवा येऊ द्या (CHYD ) मध्ये आले होते (सध्या tv वर हाच  कार्यक्रम माझ्या दृष्टीने बघण्यालायक आहे) ... त्यांच्या आधीच्या सिनेमांवर CHYD च्या टीम ने विडंबन केले होते देवळू आणि आणि अजून एकदा त्या सिनेमांचे पारायण करण्यात आले... हे दोन्ही सिनेमे माझे अत्यंत आवडीचे आहेत आणि एकमेव कारण म्हणजे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या खेडेगावातील जीवनाची आणि व्यक्तिरेखांची अत्यंत मिश्किल पद्धतीने पेश केलेली अदाकारी .... त्यातल्या त्यात ही वळू माझ्या जास्ती जवळ आहे म्हणूनच ह्यातील काही पात्रांवर मला लिह्सावेसे वाटले कारण आपले म्हणणे लिखित किंवा चर्चित (म्हणजे गप्पांच्या) स्वरुपात समोर पोहोचवता येते त्यातील एका समुद्रापार गेल्याने चर्चित हा पर्याय सध्या बंद आहे .....म्हणून हा दुसरा (sorry पहिला) पर्याय .... आणी हे वाचल्यावर कदाचित तुम्हाला हे वळू पहायची इच्चा झाली तर माझे लिखाण यशस्वी ह्या प्रकारात मोडेल आणि समीक्षक म्हणून काम करण्याचा पर्याय हि माझ्यासमोर उभा राहील ;) ;)
थोडक्यात वळूचं कथासार म्हणजे कुसवडे  गावात, एक वळू आहे,  बैल, जो सहसा एक पवित्र आणि देवाला वाहिलेला असतो ज्याची जवाबदारी गावावर असते... पण अलीकडे, वळू फार आक्रमक झालाय   गावात घडणाऱ्या प्रत्येक गोंधळास आणि नुकसानीस वळूस जवाबदार धरले जाते ... आता वळू पकडणे म्हणजे गावात सत्ता प्रस्थापित करण्यासारखे अशा थरास प्रकरण गेले आहे आणि काही काठावरच्यांना वळू च्या निमिताने स्वतःचा स्वार्थ साधायचाय.
चित्रपटात दोन नेत्यांमधला संघर्ष,  ह्या सगळ्या घडामोडीत फुलणारी प्रेम कथा; एक माहितीपट करू इच्चीणारा हौशी नवशिक्या तरुण दिग्दर्शक ; एका धार्मिक कार्याप्रमाणे ह्या अनागोंदीचे नेतृत्व करणार फोरेस्ट  आणि वळूचे मन समजून असलेली गावाने बहिष्कार घातलेली  कोण एक वेडी  स्त्री ह्या सगळ्यांचा एक कोलाज आहे
 वळू मध्ये जीवन्या म्हणजे गिरीश कुलकर्णी हा सरपंचाचा 'नारायण' दाखवलाय.... गावाला वाहून घेतलेला जीवन्या,  .सरपंचाचा खास माणूस, पण एकदम सड कि फट, बोलताना कसली ही आणि कोणाची ही भीड बाळगणारा , साधारण अंदाज घेतला तर अशी माणसं असतात आपल्या अवती भवति , हा एकमेव प्राणी असा की ज्याला वळूच्या त्रासाच्या नावाखाली कसलं ही काम करून घ्यायचं नाही, फक्त गावाला असलेल्या वळूच्या त्रासातून मुक्त करायचं ..... पण हा जीवन्या जितक्या बेरक्या आहे तितकाच हळवा आहे  आणि एकदम मनाला भिडणारा आहे...अभिनेता म्हणून पहिलीच भूमिका सकारात असताना गिरीश कुलकर्णी जीवन्या इतका लाघवी केलाय की दिग्गजांच्या भाऊ गर्दीतही भावतो ...

सरपंच आणि त्यांची सौ हे आणखीन वल्ली ....गावाला पूर्णतः त्यांनी स्वतःच्या कह्यात ठेवलंय... विरोधकांना काही करून दाखवायची संधी ही नाही द्यायचीय ....म्हणूनच वळू चा मुद्दा ऐरणीवर आल्यावर ताबडतोब त्यांनी सरकार आणि वन विभागाची मदत मागितली आणि गावातला तरुण विरोधक आबा ह्याच्या परस्पर मुसक्या बांधल्या .... बरं एवढं सगळंअसून ही स्वतःला मिरवून घ्यायची हौस काही कमी नाही.... गावात documentry काढण्याचा कार्यक्रमाच्या आरंभी नारळ फोरेस्ट च्या हस्ते वाढवणार म्हटल्यावर ' आम्ही यायचं की नाही' हे वाक्य म्हणजे कळस आहे आणि हे वाक्य म्हणताना त्यांनी केलेला अभिनय निव्वळ दाद देण्याजोगा ... सत्तेमुळे आत्ममग्न झालेल्या व्यक्तीचं प्रतिबिम्बच... आणि त्यांच्या सौ, सरपंच बाई, एकूणच संसारातून निवृत्त झाल्यासारख्या (जे साधारण ५५-६०व्य वर्षी कुठल्याही संसारात होऊ शकतं) पण हातातून सुटत काही नाही आणि वय झालं तरी  मिरवणंही सुटत नाही ... त्या documentry च्या कार्यक्रमाच्या वेळी नारळ देताना बाई अगदी लहान नारळ शोधून काढतात आणि स्वतः देवळात स्वतःची घरी येत नाही म्हणून नथ बीथ घालून एखाद्या मंगल प्रसंगी जाव्या तशा स्वतः देवळात स्वतःची documentry काढायला जातात... अशाच एका प्रसंगी गावातला एक जण फिर्याद घेऊन येतो ....त्या वेळी सरपंच त्याला म्हणतात आपण चहा घेऊन जाऊ पण हा गडी गरम झाला  असल्याने चहा बिहा नको म्हणतो तेव्हा बाईंच चहा किती कप टाकायचा हा आलेला प्रश्न म्हणजे त्यांच्या कंजूस स्वभावाची झलक देऊन जातो आणि त्या थोड्याशा तणावाच्या प्रसंगी ही हास्याची लकेर उमटवून जातो.

एकंदरीतच documentry (वळू ला पकडण्या आधी त्याच्या विषयी माहिती काढण्याचा प्रयत्न) हा गावातल्या लोकांचा स्वभाव वैशिष्ट्य दाखवण्यासाठी उत्तम रीतीने वापरलाय आणि ती documentry वळू ची राहता ती गावकर्यांची documentry होऊन जाते.
आबा हे character म्हणजे अर्क आहे .... गावातलं 'तरुण नेतृत्व' ....सरपंचांचा विरोधक ...bullet आणि ray- ban ही खास ओळख आणि असं कोणीतरी गावात असतंच.... 'वळू'च्या राजकारणात आपण अण्णा (सरपंच) च्याआधी वळू ला पकडून अण्णाना शिकस्त देऊन गावाला आपल्या कह्यात आणावे म्हणून आबाचे प्रयत्न ...त्यासाठी खोटी अफवा उठव, स्वतःच दावे आणून रात्रीस (ray-ban सह) वळू ला पकडायला जा असले  कारनामे चालू असतात .... आबा हे पात्र नंदू माधव ने खास रंगवलंय....   फोरेस्ट आबाला 'लंगडी गाय' समजून  अगदी सहज पणे बोलून जातो उद्या सकाळी आपण मिळून वळू पकडू तेव्हा आबा ने 'ओके ना ' म्हणून जी प्रतिक्रिया दिलीय ती निव्वळ दाद देण्याजोगी ....त्याच्या सगळ्या भाव भावना एका वाक्यात समोरच्या पर्यंत (पक्षी प्रेक्षकापर्यंत) पोहोचतात ...climax च्या वेळी फोरेस्ट उत्साहात इंग्लिश मध्ये सूचना देत असतो आणि लोक थोडा गोंधळ घालत असतात त्या वेळी आबाला त्यांना आवरायला सांगतो त्या वेळी आबा हि एकदम उत्साहात आपल्या ला इंग्लिश येतं हे दाखवण्यासाठी hey don't बोलून  पुढे काही सुचल्याने थांबतो त्या वेळचा अभिनय  निव्वळ अप्रतिम ... तो प्रसंग मी किती तरी वेळा पाहिलाय त्याची कितीही आवरताना अजून होऊ शकतात .....

तसच गावातलं एकमेव ब्राम्हण कुटुंब  जे सर्वत्र पाहायला मिळतं त्या प्रमाणे सगळ्या पक्षांना सांभाळून असतं ..आणि साधारण ब्राम्हण कुटुंबात पाहायला मिळतं त्या प्रमाणे बायकोचा वरचष्मा असलेलं कुटुंब, तसाच तो सुरेश कामधंदा सोडून आबा ला वाहून घेतलेला आणि त्या मुले बायकोच्या रोषाला बळी पडलेला, आणि बायकोच्या इच्छेनुसार पोरीच्या नाकाची डॉकुमेंत्र्य व्हावी म्हणून अर्ध्या रात्रीत बाहेर पडलेला , संगी आणि शिवा हे गावातले love birds आणि त्यात ही स्वतःची शेती सोडून शहरात रिक्षा चालवून पैसा कमावण्याच्या विचारात असलेला  शिवा हे कुठेही गेलं तरी chatkan आढळू शकतात .... लपून छपून प्रेम करणारे bollywood  ने प्रेरित होऊन पळून जाण्याचा प्लान करणारे संगी शिवा काय किंवा जीवन्याची आई , वेडी जनी (कुठल्याही गावात एखादी तरी वेडी व्यक्ती असतेच आणि माणसांनी टाकून दिएल पण जनावरांनी साथ  दिल्याने त्यांच्यात रममाण झालेली) , गावातला सर्वर ज्येष्ट , आदरणीय मार्गदर्शक आजा ह्या व्यक्ती ही अगदीच common  कुठल्याही गावात आढळणाऱ्या .....आणि ह्या सर्व व्यक्ती आपल्याच अवतीभवती आढळतात थेट आपण रिलेट करू शकल्यामुळे कायम लक्षात राहिल्या ...

संपूर्ण चित्रपट पाहताना चेहऱ्यावर हास्यरेषा कायम राहते आणि ती मोठी होत जाते पण लहान कुठेच होती नाही खूपच वेगळा अनुभव ह्या सिनेमाने दिल्यामुळे माझ्या अत्यंत जवळच्या  चित्रपटांपैकी एक...

देऊळ मध्ये ही नानाचा आमदार, कळसूत्री बाहुली प्रमाणे असलेली सरपंच बाई, नवीन उभे राहणारे नेतृत्व, शहरात राहिलेला म्हणून शहाणा असं audience , गावच्या टपरीवर निव्वळ वेळ घालवणारी तरुण टाळकी , तरुण नेतृत्वास हवा देणारा पत्रकार ही नेहमीच आढळणारी माणसं, त्यांच्या विषयी पुन्हा केव्ह्तरी

अशी अविस्मरणीय व्यक्तिमत्व पु.लंच्या गणगोत किंवा व्यक्ती आणि वल्ली नंतर प्रथमतःच साकारली गेली असतील असं मी विधान केल्यास अतिशयोक्ती ठरू नये...


आणि म्हणूनच त्यांच्या Highway बद्दल खूप खूप उत्सुकता आहे पण थोडी कळ सहन करावी लागणार आहे  ह्याचा खेद ही  वाटतोय .... असो पण गिरीश आणि उमेश कुलकर्णी ह्यंच्या HIGHWAY वरील प्रवासास खूप खूप शुभेच्छा आणी ही सेल्फी नक्किच काळजात आरपार घुसेल ही अपेक्षा